यावर्षीचा लालबागच्या राजाचा देखावा नितीन देसाईंसाठी स्पेशल होता…पण…

लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार…!

स्वतःचं आयुष्य संपवताना नितीन देसाई यांनी काही ऑडीओ क्लिप्स रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. त्या ऑडीओ क्लिपची सुरुवातच त्यांनी याच शब्दांनी केली होती. यावरूनच त्यांच्यासाठी लालबागच्या राजाचं स्थान काय होतं हे लक्षात येतं. मराठीतच नाही तर हिंदीत सुद्धा त्यांनी लगान, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम सारखे मोठे प्रोजेक्ट्स केले आहेत. एक कला दिग्दर्शक म्हणून त्यांचं नेहमीच कौतुक केलं गेलं. पण दरवर्षी त्यांचं काम जवळून पहायची संधी मिळायची ती लालबागच्या राजाच्या देखाव्यात.

यावर्षी लालबागच्या राजाचं ९०वं वर्ष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची सुद्धा ३५० वर्षं पूर्ण होत आहेत. या दोन्ही गोष्टींचा सोहळा म्हणून यावर्षी लालबागच्या राजाच्या देखाव्यात शिवराज्याभिषेक दाखवण्यात येणार आहे. ४ जुलै पासून लालबागच्या राजाच्या देखाव्याची तयारी सुद्धा सुरु झाली होती. मंडपाचं पूजन आणि देखाव्याचा श्रीगणेशा नितीन देसाईंच्याच हातून झाला होता.

नितीन देसाईंनी त्यांना लालबागच्या राजाच्या प्रती वाटणारी आत्मीयता नेहमी बोलून दाखवली होती. त्याच आत्मीयतेने ते लालबागच्या राजाचा ‘सेट डिझाईन’ करायचे.

ती संपूर्ण प्रोसेस आणि त्यांचं लालबागच्या राजाशी असणारं नातं याविषयी आपण जाणून घेऊ.

२००८ हे लालबागच्या राजाचं अमृत मोहोत्सवी वर्ष होतं. तेव्हाच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात एक फोन येतो. फोन वर होते नितीन चंद्रकांत देसाई. लालबागच्या राजाच्या अमृत मोहोत्सवानिमित्त लालबागच्या राजासाठी देखावा उभा करण्याची त्यांची इच्छा असल्याचं त्यांनी फोन वर सांगितलं. तेव्हापासून ते आजतागायत गेली १५ वर्ष नितीन देसाई लालबागच्या राजाशी जोडले गेले आहेत. कला दिग्दर्शक म्हणून बरेच हिट सिनेमे दिल्यानंतर लालबागच्या राजाच्या देखाव्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणं हीच बाब नितीन देसाईंना मोठं बनवते.

त्यावर्षी नितीन देसाईंनी हत्तींचा सेट उभा केला होता. त्यांनतर प्रत्येकवर्षी त्यांनी लालबागच्या राजासाठी वेगवेगळे देखावे उभे केले. गेल्यावर्षीचं अयोध्येचं राम मंदिर उभारलं होतं, त्याच्या आधी चांद्रयान २ चा देखावा उभा केला होता, एकदा तर संपूर्ण शिशमहालच उभा केला होता. म्हणजे लालबागच्या राजाची मूर्ती जेवढी भव्य आणि दिव्य असते तेवढाच भव्य आणि दिव्य राजाचा देखावा असतो. १५ वर्षांपासून नितीन देसाईंशी मंडळाचं एक भावनिक नातं जुळलं होतं.

नितीन देसाईंना लालबागच्या राजाची सेवा करताना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने त्यांना खूप जवळून पाहिलं आहे. याचविषयी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवे यांनी बोल भिडूशी बोलताना नितीन देसाईंच्या काही आठवणींना उजाळा दिला. यंदा गणपतीला कोणता देखावा उभारायचा हे वर्षभरापूर्वीच ठरायचं. त्या हीशोबाने नितीन देसाई लालबागच्या राजाचा देखावा स्वतः डिझाईन करायचे. प्रत्येक देखावा एकापेक्षा एक असण्याकडे त्यांचं लक्ष असायचं.

एवढे मोठे कलादिग्दर्शक होते पण त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कलाकारांशी वागताना ते नेहमी अदबीनं वागायचे. काम करताना एकदम शांततेने काम करायचे.

जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, हरिश्चंद्राची फॅक्टरी सारखे भले मोठे सेट त्यांनी उभे केले होते आणि लालबागचा स्टेज त्यामानाने लहानच. त्या लहानशा स्टेजवर पण आपली मोठी संकल्पना कशी उतरवायची यात नितीन देसाईंचा हातखंड होता.

पूर्ण सेट तयार झाला की, त्याला नितीन देसाईंचाचं फिनिशिंग टच असायचा आणि त्याबद्दल ते कधीच कोणाला सांगत नसत. म्हणजे कधी झुंबर लावायचा कधी नक्षीकाम केलेले स्तंभ उभारायचे. हे निर्णय ते अगदी शेवटी घ्यायचे आणि त्यामुळे लालबागच्या गणपतीच्या स्टेजचं रुपडंच पालटून जायचं.

त्यामुळे नितीन देसाईंचा ‘फायनल टच’ मंडळात खूप फेमस होता. देखावा पूर्ण झाल्यावर त्यात नितीन देसाईंचा एक एलिमेंट येणार हे फिक्स असायचं.

दरवर्षी लालबागच्या राजाचा देखावा कसा असेल यावर लालबाग राजाचं मंडळ आणि नितीन देसाई यांच्यात चर्चा व्हायची. यावर्षी सुद्धा चर्चा झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा उभा करण्याचं ठरलं.

यंदाच्या गणपतीच्या देखाव्याची पाहणी करण्यासाठी नितीन देसाई रविवारी ३० जुलैला लालबागच्या राजाच्या मंडळात गेले होते. तेव्हाची आठवण सुद्धा सुधीर दळवी यांनी सांगितली. ते रविवारी सकाळी १० वाजता आले. चहा नाश्ता सगळं स्टेजवरच केलं आणि स्वतः जातीने लक्ष घालून संपूर्ण देखाव्याचं काम करून घेतलं.

रविवारी त्यांनी दुपारी दीड-दोन पर्यंत थांबून जवळ जवळ ६०% काम पूर्ण करून घेतलं आणि आपल्या कारागिरांना पुढे काय करायचं हे सुद्धा समजावून सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज हे नितीन देसाईंसाठी देव होते हे सगळ्यांनाच माहित आहे. लालबागचा राजा आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही दैवातांसाठी आपल्याकडून सेवा घडतेय यासाठी ते रविवारी खूप उत्साहित होते. यावर्षीचा शिवराज्याभिषेकाचा देखावा कसा भव्य उभारायचा याचविषयी ते सतत बोलत होते.

गणपतीचा देखावा आणि गणपतीची मूर्ती याचं समीकरण जुळवण्यात सुद्धा नितीन देसाई यांचा हातभार असायचा.

संतोष कांबळी हे लालबागच्या राजाचे मूर्तिकार. त्यामुळे नितीन देसाईसोबत त्यांनी सुद्धा गेली १५ वर्ष काम केलं आहे. गणपतीचा सेट डिझाईन करताना गणपतीची मूर्ती कशी असली पाहिजे यावर नितीन देसाई आणि संतोष कांबळी यांच्यात तासंतास चर्चा होत असंत.

देखाव्यावरून गणपतीचं सिंहासन कसं असलं पाहिजे. त्याची रंगसंगती कशी असेल, गणपतीचा शेला आणि उपरणं कोणत्या रंगाचे असतील यासाठी सुद्धा नितीन देसाई संतोष कांबळी यांना गाईड करायचे. ३० जुलैला जेव्हा नितीन देसाई लालबागच्या राजाच्या स्टेजवर आले होते तेव्हा सुद्धा त्यांनी संतोष कांबळी यांच्याशी गणपतीच्या देखाव्याविषयी आणि लालबागचा राजाची मूर्ती कशी असेल याविषयी तासभर चर्चा केली.

काहीवेळा नितीन देसाई यांनी केलेल्या चित्रपटांची छाप लालबागच्या राजाच्या देखाव्यात दिसून आली आहे. जसं की, २००८ मध्ये जोधा अकबर चित्रपट आला होता. तेव्हा हत्तींचा भला मोठा सेट उभारला होता. २०१९ मध्ये उभारण्यात आलेला शिश महाल हा प्रेम रतन धन पायो चित्रपटातल्या शिश महाल सारखा उभारण्यात आला होता.

यंदा लालबागच्या राजाच्या देखाव्याचं काम ६०% पूर्ण झालं आहे आणि नितीन देसाई यांच्या निधनानंतर उर्वरित काम कोण करेल असा सगळ्यांना प्रश्न पडला होता.

पण नितीन देसाईंनी आपली संकल्पना आपल्या कारागिरांना सांगितली आहे आणि त्यांचे कारागीर सुद्धा त्यांच्यासारखे हुशार आणि विश्वासातले आहेत. त्यामुळे देखाव्याचं उरलेलं ४०% काम हे नितीन देसाई यांच्या हाताखाली काम करणारे कारागीरच पूर्ण करतील, असं मंडळाचे सचिव सुधील साळवी यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितलं आहे.

पण तरी दरवर्षीचा लालबागच्या राजाच्या देखाव्याला असलेला नितीन देसाई यांचा ‘फायनल टच’ मात्र यंदा देखाव्यात मिसिंग असेल, हे मात्र खरं….नितीन देसाई यांना अखेरचा नमस्कार !

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.