सासरच्या घरावर बुलडोझर फिरवण्याची हिंमत गडकरीच करू शकतात…

नितीन गडकरी म्हणजे दिलखुलास माणूस. मनात एक पोटात एक असं काही त्यांचं नसतं. मूळचे नागपूरचे असल्यामुळे अघळपघळ व्यक्तिमत्व. कधी स्कुटरवरून बाहेर पडतील कधी पाणीपुरीच्या ठेल्यावर दिसतील सांगता येत नाही.

म्हणूनच दिल्लीत मोठमोठ्या पदावर पोहचले असले तरी त्यांचा ग्रासरूट लेव्हलवर सर्वसामान्य माणसांशी कनेक्ट तुटलेला नाही.ना ते आपल्या भूतकाळाबद्दल विसरतात. जे काही आहे ते थेट सांगून टाकतात.

म्हणूनच त्यांनी सांगितलेलेले किस्से तुफान फेमस होतात…

नितीन गडकरींनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितलेला हा किस्सा त्यावेळचा आहे जेव्हा त्यांचं नवीन नवीन लग्न झालं होतं.. तर विषय बुलडोझरच्या संदर्भातला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात बुलडोझर खूप चर्चेत आहेत. बातम्या असोत, मीम्स असोत किंवा मग राजकारण असो… 

आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या बुलडोझरला चुकले नाहीत. त्यांच्या आयुष्यात बुलडोझरशी संबंधित एक इंटरेस्टिंग प्रसंग घडला होता. 

महाराष्ट्रातील रामटेक तालुक्यात एका रस्त्यासाठी रस्त्याचं बांधकाम सुरु होतं. गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. रस्त्याच्या बांधकामात जी -जी ​​घरे येत होती त्यावर अतिक्रमण कायद्यांतर्गत कारवाई करावी लागत होती.

याच घरात एक घर गडकरींच्या सासऱ्याचं होतं. 

त्यावेळी गडकरींचे नवीन नवीन लग्न झाले होते. आता सासुरवाडी म्हणल्यावर गडकरींना काही कळेनाच काय करावं. एकीकडे गडकरी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तर दुसरीकडे सासुरवाडीचं टेन्शन होतं.

झालं कर्तव्यनिष्ठ असलेल्या गडकरींनी आपल्या मंत्रिपदाच्या शपथेची जाणीव ठेवत मोठ्या हिंमतीने निर्णय घेतला.

त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले कि, अतिक्रमणाच्यात जी काही घरं येतील मग त्यात कुणाचंही घर का असेना ती सर्व हटवा. हा आदेश त्यांनी दिला खरा मात्र आपल्या पत्नीला त्याची भनकही पडू दिली नाही. अखेर सासरच्या घरावर बुलडोझर फिरवला आणि रस्त्याचं बांधकाम पार पाडलं. 

भले मंत्री असोत मात्र सासरच्या घरावर बुलडोझर फिरवण्याची हिंमत गडकरीच करू शकतात..आता यातला विनोदाचा भाग सोडला तर अतिक्रमण करणाऱ्यांवर दया दाखवण्याचं पाप नेत्यांनी करू नये, असे त्यांचे मत आहे.

म्हणूनच त्यांना नावाने नाही तर कामाने ओळखला जाणारा नेता म्हणलं जातं. जेव्हापासून त्यांच्याकडे हे खातं आलं तसं त्यांनी देशात रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं टार्गेटच हाती घेतलं. मग ते टार्गेट गाठण्यासाठी ते योग्य ते निर्णयन मोठ्या हिंमतीने घेत असतात.  त्यांच्या याच कामगिरीमुळे गडकरींना ‘रोडकरी’ नाव पडलंय.

अलीकडच्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते लोकसभेत बोलतांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आमच्या रस्ते वाहतूक विभागाने रस्तेनिर्मितीमध्ये ४ वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत आणि त्याची यादी देखील त्यांनी वाचून दाखवली होती…

आता सासरवाडीच्या घरावर बुलडोझर फिरवणं असू देत किंव्हा रस्ते बांधणीत वर्ल्ड रेकॉर्ड बनवणं असू देत दोन्ही कामं सोपी नाहीयेत काही…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.