आद्यक्रांतिवीर नोवसाजी नाईक यांच्या पराक्रमाचा इंग्लंडमधल्या पुस्तकातदेखील उल्लेख आहे

महाराष्ट्र हि वीरांची भूमी समजली जाते. स्वातंत्र्याची प्रबळ इच्छाशक्ती इथल्या मातीची देणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे मावळे या भूमीची शान आहे. कुठल्याही परकीय शक्तीचा आपल्यावरचा दबाव झुगारून देणे महाराष्ट्राच्या रक्तात आहे.

हेच कारण आहे की कधीही सूर्य मावळत नाही अशी ओळख असलेल्या इंग्रजी साम्राज्याला पहिली धडक मराठी मातीने दिली.

१८१८ साली पेशवाई संपुष्टात आली आणि संपूर्ण भारतावर इंग्रजांचा एक छत्री अंमल सुरु झाला. आधुनिक शस्त्रास्त्रे वापरणाऱ्या इंग्लिश पलटणीची दहशत देशभरात पसरली होती. अनेक पराक्रमी राजघराणी घाबरून अथवा पराभूत होऊन त्यांच्या मांडलिकवत्व स्वीकारत होती.

पण नांदेड जवळचा ५२ गावांचा हटकर राजा नोवासजी नाईक मात्र पाय रोवून ब्रिटिशांशी लढण्यासाठी उभा होता.   

छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळात पराक्रम गाजवलेल्या हाटकर वीरांचा हा वंशज. निजामाने त्याच्या पराक्रमामुळे खुश होऊन नोव्हा(लोहा) या गावची जहागिरी दिली होती. सुभेदार मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श घेतलेल्या नोवसाजी यांनी शेतकरी व कष्टकरी रयतेच्या हिताचे राज्य चालवले होते. 

त्याकाळी मराठवाडाचा बहुतांश भाग हैद्राबादच्या निजामाच्या आख्त्यारितीखाली येत होता. भारतातील त्याकाळचे हे सर्वात मोठे संस्थान पण या बलशाली निजामाने देखील ब्रिटिशांशी तैनाती फौजेचा करार करून त्यांची गुलामी स्वीकारली. 

नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यात मात्र नोवासजी नाईक यांनी मात्र कोणाचेही मांडलिक होण्यास नकार दिला. त्यांनी स्वतःला स्वतंत्र राजा घोषित केले आणि निजामाच्या विरुद्ध बंड पुकारले. 

परिसरातील मस्के नाईक, पोले नाईक, गडदे नाईक व अनेक ज्ञात अज्ञात हाटकर वीर आणि शेतकरी तरुण त्यांना सामील झाले. याशिवाय आपल्या पदरी ४०० अरब सैनिकांची नेमणूक केली. अन्यायी ब्रिटिश सत्तेचा कोणताही हल्ला आला तर लढा देण्यास नोवसाजी नाईक व त्यांचे पठ्ठे तयार होते.

निजामाने त्यांची तक्रार कंपनी सरकारकडे केली. मेजर ‘आर. जी. बर्टन’ हा ब्रिटिश अधिकाऱ्याने या उठावाबद्दल आपल्या पुस्तकात लिहिलंय,

“नांदेड, परभणी आणि पैनगंगा नदीच्या पलीकडच्या भागात एक भयानक असा हटकर समाज राहतो, त्यांनी २० वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्यांचा पराक्रमी सेनापती नोवसाजी नाईक याच्या नेतृत्वावर तिथे लष्कर तयार केलंय. नांदेड आणि बेरर जिल्ह्यातील पक्के किल्ले, गढी त्यांच्याच ताब्यात आहेत.”

कंपनी सरकारने हे बंड मोडून काढायचं ठरवलं.

८ जानेवारी १८१९ साली अचानक नोवाहच्या गढीवर इंग्रजांनी हल्ला केला. मेजर पिट्सन, कॅप्टन इव्हान, कॅप्टन टेलर यांसह ५ हजारांचे कॉन्टिन्जेन्ट सैन्य पूर्ण तयारीनिशी आले होते.  

जवळपास महिनाभर त्यांनी नोवाहच्या किल्ल्याला वेढा घातला. पण या हाटकर योध्द्यांनी त्यांना दाद दिली नाही. ब्रिटिशांच्यावर गढीतून हल्ला चालूच ठेवला, शिवाय आसपासच्या गावातून हि पराक्रमी तरुण ब्रिटिशांची रसद तोडण्याचा प्रयत्न करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी  दिलेल्या गनिमी काव्याचा वापर नोवसाजीचे योद्धे योग्य प्रकारे करत होते.

अगदी एक दोन दिवसात हे बंड मोडून काढू या आत्मविश्वासाने आलेले ब्रिटिश अधिकारी जसे जसे दिवस वाढू लागले तसे तसे गर्भगळीत झाले.

२१ जानेवारी ला हाटकरांच्या उठावासंबंधी लेफ्टनंट रौबर्ट पिटमन याने ब्रिटीश अधिकारी हेन्री रसेलला लिहिलेल्या पत्रात नोवासाजी नाईकांच्या गनिमी युद्धनीतीचा उल्लेख केला आहे.

“१९ तारखेच्या रात्री १० वाजता नोवसाजीच्या सैन्यातील २०० घोडेस्वार अचानक आले आणि त्यांनी माझ्या लष्करी छावणीच्या मागील बाजूस असलेल्या रक्षकावर गोळीबार केला. ते हल्ला परतवत होते, लेफ्टनंट सुथरलैंड यांनी त्वरित काही स्वार जमवून छोटे दल तयार केले, आणि काही मैलांपर्यंत त्यांचा पाठलाग केला, परंतु रात्रीच्या अंधारात ते दिसेनासे झाले.”

गोऱ्या इंग्रजांच्या कवायती पलटणी विरुद्ध नोवसाजी यांनी तुंबळ युद्ध केले. अखेर ब्रिटिश तोफांपुढे त्यांना हार मानावी लागली. ३१ जानेवारी १८१९ रोजी नोवाहचे युद्ध संपले. नोवसाजी नाईक यांचे ४३९ योद्धे धारातीर्थी पडले. तर सरकारकडचे १८० सैनिक जखमी आणि २४ मारले गेले. जखमींमध्ये ६ युरोपीय अधिकारी होते.

सुदैवाने नोवसाजी नाईक हे इंग्रजांच्या कचाट्यातून पळाले. जे हाटकर नाईक सापडले त्यांना पकडून फासावर चढवण्यात आलं. नोवसाजी नाईक याना पकडण्यासाठी देखील एक मोठी तुकडी रवाना झाली.

पुढे दगा फटका झाला व नोवासाजी नाईक इंग्रजांच्या हाती सापडले. त्यांना पेंढाऱ्यांच्या छावणी मध्ये ठेवण्यात आलं होतं . याच छावणीमध्ये त्यांचा कॉलरामुळे मृत्यू झाला. ब्रिटिशांच्या दृष्टीकोनातुन हे युध्द इतके महत्त्वपूर्ण होते कि नंतर रेजिमेंटमध्ये युद्धाच्या विजयानंतर पदक वाटली गेली.

या छोट्याशा जहागीरदाराच्या स्वातंत्र्य लढ्याची चर्चा इंग्लंड पर्यंत पोचली. मेजर बर्टन यांनी आपल्या A History of the Hyderabad Contingent या पुस्तकात या बंडाचा विशेष उल्लेख केला आहे. मात्र दुर्दैवाने भारतीय इतिहासात या वीर योद्धयाचा त्यांच्या लढ्याचा उल्लेख आढळत नाही.

संदर्भ- सुमितराव लोखंडे पाटील (मरहट्टी संशोधन विकास मंडळ )

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Sachin Naik says

    #पैनगंगेच्या तीरी नाद घुमतो वारंवार ,
    #शौर्य गाजवून गेली #नोवसाजी राजे नाईकांची तलवार…!!⚔️💐🚩

Leave A Reply

Your email address will not be published.