पॉंटिंगनं भारताची बॉलिंग तोडली आणि सगळ्या जगाला समजलं, ऑस्ट्रेलियाचा पॅटर्नच वेगळाय
बरोबर २० वर्षांपूर्वीचा तो दिवस, तारीख २३ मार्च २००३, वार रविवार. त्याकाळात काय मोबाईल आणि सोशल मीडिया नव्हतं, त्यामुळं कॉईनबॉक्सवरुन पाहुण्यांच्या किंवा मित्रांच्या लँडलाईनवर फोन करुन प्लॅन ठरले होते. अभ्यास नाय केला तरी कुठलेच मदर-फादर आज हाणणार नव्हते आणि देवासमोर कधी हात न जोडणाऱ्या पोरांनी उदबत्त्यांचं निम्मं पाकीट संपवलं होतं. विषय ना रिझल्टचा होता, ना प्रपोझ केल्यावर पोरीच्या उत्तराचा…
विषय होता क्रिकेटचा, वर्ल्डकप फायनलचा आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा
मॅच फिक्सिंग आणि टीममधल्या टीममध्ये झालेले राडे यामुळं लई जनतेचा क्रिकेटमधला इंटरेस्ट गेला होता. पण ज्यादिवशी दादा गांगुलीनं लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट काढून फिरवला. तेव्हापासून भारतीय क्रिकेटची भाषाच बदलली. या नव्या पोरांमध्ये दम आहे, हा सगळ्या भारताला समजलं होतं.
हाच दम सिद्ध करण्याची संधी होती, २००३ च्या वर्ल्डकपमध्ये.
भारताच्या टीमनं कुणालाच अपेक्षित नसताना फायनल गाठली होती. आशिष नेहराच्या इंग्लंड विरुद्धच्या विकेट असतील किंवा सचिननं महाशिवरात्रीच्या दिवशी पाकिस्तानला दिलेले फटके भारत वर्ल्डकप जिंकू शिकतो असं वाटायला या दोन गोष्टीच पुरेशा होत्या.
कट तू फायनलचा दिवस, भारतानं टॉस जिंकला. इतक्या महत्त्वाच्या मॅचमध्ये पहिलंच पारडं भारताच्या बाजुनं पडलं होतं. कॅप्टन गांगुलीनं बॉलिंग घेण्याचा निर्णय घेतला.
भारताचं आशास्थान झहीर बॉलिंगला आला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्यानं १५ रन्स खाल्ले, लाईन-लेंथ आणि पाऊल इतकं चुकत होतं की, झहीरनं त्या ओव्हरमध्ये १० बॉल्स टाकले. तिथून भारताची गाडी रुळावरुन घसरली ती घसरलीच. ऑस्ट्रेलियानं १४ ओव्हरमध्येच पन्नाशी गाठली. गिलख्रिस्ट तर गल्लीतल्या बॉलर्सला हाणावं तशे हाल करत होता. शेवटी भज्जीनं त्याची विकेट काढली. पन्नास मारुन गिलख्रिस्ट आऊट झाला, जरासा आनंद मिळाला.
सॅक्रेड गेम्समध्ये जेव्हा ‘अतापी और वतापी दोनो दैत्य भाई थे’ हा डायलॉग कानावर पडतो, तेव्हा हमखास पॉन्टिंग-हेडन या जोडीची आठवण होते.
गिलख्रिस्टनंतर हे ‘हाण की बडीव’ करणार याची जवळपास खात्री होती. पण घडलं भलतंच, सहा ओव्हर्समध्ये एकही बाऊंड्री नाही, त्यात हेडन आऊट. फटाके आणायला पैशे देता का? हे विचारण्याइतपत डेरिंग आलेली. पण लोकांनी जनता कर्फ्यू पाळलेला.
तिकडं पॉंटिंग आणि डॅमियन मार्टिननं निवांतवाली रिक्षा पकडलेली, अध्येमध्ये एखादी फोर यायची बाकी सिंगल डबल घेऊन संसार सुरू होता. ड्रिंक्सब्रेक झाला, तरी रिक्षा सूममध्येच. डॅमियन मार्टिननं फिफ्टी पूर्ण करायला ४६ बॉल्स घेतले, तर पॉन्टिंगनं ५१ बॉल्स.
३८.२ ओव्हर्सनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोअर होता, २ आऊट २२७.
ज्या स्पीडनं हे खेळतायत म्हणल्यावर, स्कोअर फार फार तर ३०० होईल आणि तोवर आपण सनासना विकेट्स काढू असं, त्यावेळी ज्यांना ज्यांना वाटलं होतं… त्यांनी त्यांनी स्वतःला एकटं समजू नका.
ज्या ओव्हरमध्ये पॉंटिंगनं फिफ्टी पूर्ण केली, तयच ओव्हरमध्ये सुरू झालं तांडव. त्यानं भज्जीला सलग दोन सिक्स हाणले, यातला एक छकडा स्टेडियमच्या बाहेर गेला होता.
पॉंटिंग इतक्या सहज खेळत होता, की कुठंही पडलेला बॉल बाऊंड्रीला लागून किंवा बाऊंड्रीच्या वरुनच जात होता. प्रत्येक बॉलरला फटके पडले, झहीर म्हणू नका, भज्जी म्हणू नका. बिचाऱ्या श्रीनाथचे तर खांदे पडलेले. यांनी तीनशे केले तरी लय झालं असं वाटणाऱ्या, ऑस्ट्रेलियानं ४ ओव्हर्स बाकीचे असतानाच तीनशेचा मार्क ओलांडला होता. यामागचं कारण होतं, पॉंटिंगची सेंच्युरी.
उसाच्या गुऱ्हाळात रस काढताना उसाचा चोथा होतो, तसं भारताचं झालं होतं. पॉंटिंगच्या बॅटला भस्म्या झाल्यासारखे रन्स निघत होते, शेवटच्या ओव्हरमध्ये त्यानं श्रीनाथला दोन फोर आणि एक्स सिक्स मारला. शेवटच्या बॉलला फोर बसली आणि अखेर उठलेला बाजार थांबला.
ऑस्ट्रेलियाचा स्कोअर गेला २ आऊट ३५९. डॅमियन मार्टिन ८८ नॉटआऊट आणि रिकी पॉंटिंग नॉटआऊट १४०.
बाकी अतापी और वतापी दोनो दैत्य भाई थे, रिकी पॉंटिंग आणि डॅमियन मार्टिन, असं प्रत्येकाला वाटू लागलं.
काहीकाही वेळा आपण अशक्य गोष्टी शक्य होण्याची अपेक्षा धरतो. आपल्याकडेही सचिन, सेहवाग, गांगुली, द्रविड होते. निम्मी जनता अंघोळ करुन बसलेली, त्यामुळं अशुभ काय घडत नसतंय असंच वाटत होतं.
त्यात तिसऱ्याच बॉलला सचिननं मॅकग्राला लय वाढीव फोर हाणली.आता वाटलं सुट्टी नाय, आज ३६० फिक्स होणार. पैजा लावायला हात पुढे आले आणि सचिन तेंडुलकर पुढच्याच बॉलवर आऊट.
भारतात जिथं जिथं मॅच पहिली किंवा ऐकली जात होती, तिथं तिथं शांतता पसरली. अगदी भयाण शांतता…
पाचव्या ओव्हरमध्ये मॅकग्राला गांगुली आणि सेहवागनी हाणला, पुन्हा बारीकशी आशा दिसली. दादा हाणायला लागला होताच, तेवढ्यात सेम सचिनसारखा आऊट झाला. पुन्हा हार्टब्रेक. पुढच्याच ओव्हरमध्ये कैफ गायब. इतक्या प्रेशरच्या सिच्युएशनमध्ये भारताला एक नवा हिरो मिळाला…
वीरेंद्र सेहवाग
प्रेशर-बिशर काय नसतंय, हे सेहवागनं पुन्हा एकदा दाखवून दिलं. डॅरेन लेहमनला त्यानं सलग तीन चव्वे हाणले, तेव्हा पहिल्यांदा घरात ओरडून शिवी द्यायची इच्छा झाली होती. असं वाटत होतं की सुट्टी नाहीच. पाऊस पडून गेला, मॅचमध्ये ब्रेक आला पण सेहवागवर कणभर फरक पडला नाय. त्याचा धुव्वा सुरू होताच.
भारत २४ ओव्हर्समध्ये दीडशेच्या जवळपास पोहोचला होता, तेवढ्यात चोरटी सिंगल पळायचा मोह सेहवागला आवरला नाही आणि त्याच्या रनआऊटनं भारताच्या स्वप्नावर आणखी एक जहरी ओरखडा मारला.
युवराज आणि द्रविड शांत निवांत खेळले आणि आऊट झाले. अपेक्षा नसताना मोंगियानं दोन फोर मारल्या आणि अपेक्षेप्रमाणं आऊट झाला. भज्जी गेला, श्रीनाथ गेला आपली लाजही जवळपास गेलीच होती, तेवढ्यात आशिष नेहरानं सलग दोन फोर मारल्या. पण मॅच चमत्काराच्या पलीकडे गेली होती. टीव्ही फुटले नसले, तरी बंद झाले होते. मॅकग्रानं झहीरची विकेट घेतली आणि भारतानं सव्वाशे रनांनी मॅच गमावली.
मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घ्यायला जाताना सचिन बारीक तोंड करुन गेला. भारतातली लोकं त्याच्यावर, दादावर, घाई करणाऱ्या सेहवागवर चिडली होती.
पोरांच्या अभ्यासाचे उट्टे संध्याकाळी निघाले, जनता कर्फ्यू आणखी टाईट झाला, माणसं गममध्ये ग्लास घेऊन बसली, भारत हरल्यापेक्षा जास्त दुःख पॉंटिंगनं लय हाणल्याचं होतं. पॉंटिंगनं अशी काही बॅटिंग केलेली की सगळ्या भारतात अफवा पसरली…
”भावा, पॉंटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती म्हणून बॉल एवढा लांब जात होता. त्याची बॅट फोडून बघितलीये आणि आता परत मॅच घेणारेत.”
अभ्यासात टॉम क्रूझ असणाऱ्या पोरांनीही या अफवेवर विश्वास ठेवला होता, तिथं आमच्यासारख्या साईड ऍक्टर्सचं तर विचारुच नका.
पण बरं झालं परत मॅच झाली नाही, २००३ च्या वर्ल्डकप मॅचमध्ये एकही मॅच न हरलेल्या ऑस्ट्रेलियानं आपल्याला परत तोडलं असतं. पॉंटिंगच्या नावापुढं ‘क्रिकेटच्या दुनियेतला राजामाणूस’ असं लिहावं लागलं असतं आणि त्याच्या ऑस्ट्रेलिया पॅटर्ननं आपल्या स्वप्नांची जमीन पुन्हा एकदा हिरावून नेली असती, २३ मार्च २००३ सारखीच.
हे ही वाच भिडू:
- ऑस्ट्रेलियाच्या राक्षससेनेत एकच दिलदार माणूस होता, ॲडम गिलख्रिस्ट
- २१ वर्ष उलटून गेली, तरी अजूनही द्रविड-लक्ष्मणनं लिहिलेला इतिहास कुणी विसरलेलं नाय…
- हरभजनने लेहमनला मैदानावरच विचारलं, तू प्रेग्नंट आहेस का..?