ऑस्ट्रेलिया पॅटर्नचा खरा बकासुर एकच, मॅथ्यू हेडन
साधारण २००० साला नंतरचा काळ. टीव्हीसमोर बसायची दोन, तीनच कारणं होती. एमटीव्ही, डब्ल्यूडब्ल्यूएफ आणि क्रिकेट. एमटीव्हीवरची गाणी ऐकण्यापेक्षा जास्त मजा बघण्यात यायची, डब्ल्यूडब्ल्यूएफमधली हाणामारी म्हणजे नाद आणि क्रिकेट म्हणलं की सचिन, सेहवाग, गांगुली, झहीर. सगळं कसं आनंदी आनंदी वातावरण.
आता एमटीव्हीमधल्या गाण्यातले हिरो आपण काय बनू शकत नव्हतो, डब्ल्यूडब्ल्यूएफमधल्या भिडूंसारखी बॉडी बनवायची म्हणलं तर घरातले मटण खाऊ द्यायचे नाहीत. मग एकच गोष्ट शक्य होती, हातात बॅट घ्या आणि क्रिकेटर बना; पण त्यातही शंभर लफडी. मग सगळ्या पिढीनं ठरवलं गुमान क्रिकेट बघण्यातच मजा आहे.
ही मजा कुणी टिकू दिली नसेल, तर ऑस्ट्रेलियाच्या टीमनं.
स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग, शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, गिलख्रिस्ट, क्लार्क, सायमंड्स, लँगर अशी सगळी राक्षससेना ऑस्ट्रेलियाकडे होती. यांच्या विरुद्ध मॅच आहे म्हणल्यावर आपली टीम हरणार हेच आधी डोक्यात यायचं. वर लिहिलेले सगळे कांगारू प्लेअर्स वस्ताद होतेच, पण भीती फक्त एकाचीच वाटायची, मॅथ्यू हेडन.
सहा फूट दोन इंच उंची, रुंद छाती, घारे डोळे आणि पैलवानासारखी तब्येत. तो मैदानात यायचा एकच गोष्ट डोक्यात ठेवून. ‘समोर बॉलर कोणपण असो, आपल्याला फक्त हाणायचंय.’ भारताविरुद्ध तर हेडनचा दांडपट्टा हजार टक्के चालायचा. बरं, कुणीतरी आऊट झाल्यावर मग हा बाबा येणार अशीही गत नव्हती. हा पडला ओपनर, त्यामुळं पहिल्या बॉलपासूनच मारायला सुरुवात.
तेव्हा जिंदगीत भीती दोनच गोष्टींची वाटायची, व्हिडिओ प्लेअरमध्ये सीडी अडकायची आणि मॅथ्यू हेडनच्या बॅटिंगची.
विषय नॉस्टॅलिजीक झालाचे, तर जरा २००१ मध्ये जाऊ. जगभरात १५ टेस्ट जिंकून ऑस्ट्रेलिया भारतात आली. पहिली टेस्ट मुंबईत. आता आपल्याकडे कुंबळे, भज्जी होते त्यामुळं वाटलं बॉल फिरायला लागला की कांगारूंचं काय खरं नाही. पण हेडनची भीती वाटत होती, ती खरी ठरलीच- हेडननं मारले ११९. टेस्ट मॅच आहे म्हणून शांत खेळलाय अशातली पण गोष्ट नाही. ११९ मध्ये १८ फोर आणि १ सिक्स.
हेडनचं नाव घेतल्यावर आणखी एक गोष्ट आठवते ते म्हणजे मुंगूस बॅट. लांब दांडा आणि मजबूत बेस. ती बॅट बघून पहिल्यांदा असं वाटायचं की याच्यानं बॉल लांब जाईल का? पण हेडन किरकोळीत स्टँड्समध्ये हाणायचा.
भिडू लोक, क्रिकेट हा फक्त ताकदीनं खेळायचा खेळ नाही. जितकं शरीर दमदार हवं तितकंच मनही. हेडन मॅच व्हायच्या आधी ध्यानाला बसतात तसं पिचवर, नायतर पॅव्हेलियनमध्ये बसायचा. आपण कशी बॅटिंग करणार हे इमॅजिन करत. याचा काय परिणाम व्हायचा ते सांगतो. २००३ ची पर्थ टेस्ट. झिम्बाबेच्या बॉलिंगचा बाजार उठवत भावानं ३८० रन्स मारले. गडी क्रीझवर ११ तास उभा राहिला, पण एकही चुकीचा शॉट खेळला नाही.
२००७ चा टी२० वर्ल्डकप. भारत सेमीफायनलमध्ये आणि समोर ऑस्ट्रेलिया. हेडन हाणायला लागला आणि वाटलं वर्ल्डकप गेला. ४६ बॉलमध्ये ४ फोर, ४ सिक्स आणि रन्स ६२. पण ४७ वा बॉल पडला आणि भीती संपली. श्रीसंतला फिक्सर म्हणून शिव्या द्या किंवा रागीट होता म्हणून नावं ठेवा- त्या ४७ व्या बॉलला त्यानं हेडनला बोल्ड केलं आणि पिचवर हात आपटले तो क्षण आजपण अंगावर काटा आणतो.
मैदानाबाहेर राडे नाहीत, चेहऱ्यावर कायम हसू, उगा खोड्या काढायच्या नाहीत आणि सुट्टी कुठल्याच बॉलरला द्यायची नाही. भारताला हरवून आपल्याला रडवलं असेलही, पण भारी बॅटिंग काय असते हेसुद्धा हेडननंच दाखवलं.
एकवेळ पहिल्या प्रेयसीच्या खडूस बापाला विसरणं शक्य आहे, पण हेडनची हाणामारीवाली बॅटिंग नाही. आताही पाकिस्तानचा हेड कोच बनून हेडन भारताच्या राशीला आहेच.
बॅट्समन म्हणून हेडन इतका खतरनाक होता, की सेंच्युरी झाल्यावर म्हणेल,
मी ठोकत नाय ओ, मी ना तोडतो. माझा पॅटर्नच वेगळाय.
हे ही वाच भिडू:
- मुंगूस बॅट वापरायची नाही म्हणून धोनीने हेडनला आमिष दाखवलं होतं..
- अरविंद डिसिल्व्हा आवडायचा की त्याचा राग यायचा हे अजून समजलं नाय
- ४०० रन जरी करायला सांगितले तरी ते मी एकटा करीन इतका कॉन्फिडन्स फक्त लाराकडे होता.