‘ ४०० रन जरी करायला सांगितले तरी ते मी एकटा करीन ‘ इतका कॉन्फिडन्स फक्त लाराकडे होता.

ब्रायन लारा हे नाव समोर आलं तरी त्याच्या ४०० रनाच्या रेकॉर्डची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. ४०० रन एकट्या खेळाडूने करणे हि बाबच मुळात अविश्वसनीय आहे. पण ब्रायन लाराने ते रेकॉर्ड स्वतःच्या नावावर अक्षरशः ठेवलं आहे. आजच्या घडीचं क्रिकेट बघता लाराचा हा विक्रम मोडीत काढणे महाकठीण काम आहे असं दिसतं.

एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर यांची तुलना. टेस्ट म्हणा किंवा वनडे सचिन आणि लारा रेकॉर्डमध्ये एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी दिसून येतात. क्रिकेट समीक्षकांनी हा वाद बेस्ट खेळाडू कोण म्हणून चांगलाच चर्चेत आणला होता. मात्र सचिन तेंडुलकरसाठी ब्रायन लारा प्रांजळ मनाने भावना व्यक्त करताना तो म्हणतो कि,

क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे. जर मला तिकीट काढून हा खेळ बघायचा असेल तर ते तिकीट मी खास सचिन तेंडुलकरच्या बॅटिंगसाठी काढील.

कॉन्फिडन्स नावाची गोष्ट मात्र लाराकडून शिकण्याजोगी आहे. एकदा ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने ब्रायन लाराचं ३७५ धावांचं रेकॉर्ड मोडलं आणि ३८० धावा तडकावल्या. त्यावेळी ब्रायन लाराला विचारण्यात आलं कि आता तुझं रेकॉर्ड तर हेडनने तोडलं याबद्दल तुला काय वाटत ? यावर लारा निवांतपणे म्हणाला कि ,

हेडनचं हे रेकॉर्ड फक्त काही दिवसांपुरतं आहे.

ते रेकॉर्ड मीच तोडणार आहे.

हा एवढा आत्मविश्वास हानिकारक वाटतो पण लारा इतका स्वतःवर विश्वास ठेवायचा कि त्याने पुढच्या काही सामन्यांमध्येच ४०० धावा करण्याचा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला. त्यानंतर मात्र हेडनच्या रेकॉर्डचा लोकांना विसरच पडून गेला इतकी जबरदस्त बॅटिंग ब्रायन लाराने केली होती.

पाकिस्तानच्या दौऱ्यावर वेस्ट इंडिज टीम गेली असता इंझमाम उल हकने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला तेव्हा लारा म्हणाला होता तुम्ही मला उद्या ३००-४०० रन जरी करायला लावले तरी मी ते करिन इतका विश्वास लाराला त्याच्या बॅटिंगवर होता.

आशिया खंडातील खेळाडू स्पिन उत्तम खेळू शकता असा बोलबाला त्याकाळी होता मात्र ब्रायन लाराने स्पिनर आणि फास्टर असे दोन्ही बॉलर फोडून काढायला सुरवात केली. म्हणजे त्यांच्याइतका उत्कृष्ट खेळ स्पिन बॉलिंगविरुद्ध क्वचितच कोणी करत असे. मैदानाच्या सगळ्या बाजूला फटकेबाजी तो करायचा आणि कायम आपल्याच धुंदीत तो असायचा.

वेस्ट इंडिजचा आधारस्तंभ म्हणून ब्रायन लारा सज्ज असायचा. दुसऱ्या बाजूने टीम बाद जरी होत असली तरी लारा त्याच्या खेळात बदल करत नसे. जास्तीत जास्त धावा करून समोरच्या संघाला दबावात कस ठेवता येईल याकडे त्याचा जोर असायचा. त्याने मारलेला कव्हर ड्राइव्ह हा लूप वर क्रिकेट प्रेमी पाहतात.

वर वर शांत असलेला लारा हा बंडखोर प्रवृत्तीचा होता. खेळावर त्याच जीवापाड प्रेम होतं. मात्र त्याच्यावर बरेचदा वेस्ट इंडिजचा संघ दंड लावायचा किंवा त्याला एखादा सामना खेळू द्यायचा नाही. याला कारणीभूतही स्वतः लाराच होता.

कारण ज्या ज्या वेळी संघाची नेटप्रॅक्टिस असायची त्या त्या वेळी लारा गैरहजर असायचा. नेट प्रॅक्टिस करण्याचा त्याला आळस असायचा. ज्यावेळी प्रशासन त्याला जाब विचारत असे तेव्हा तो म्हणायचा कि,

नेट प्रॅक्टिस मध्ये खेळून काय फायदा, मला जे काही खेळायचं ते मी थेट सामन्यात खेळणार. तिथे धावा करायला मजा आहे.

एकंदरीत तो क्लास खेळाडू होता. सचिन तेंडुलकर बरोबर त्याची कितीही तुलना केली तरी ती तुलना अशक्यच आहे. सचिनपेक्षा तो कुठेही कमी नव्हता. कर्णधार असताना त्याने वेस्ट इंडिज संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. संघ प्रशासनासोबतच्या वादाला वैतागून त्याने वेस्ट इंडिज टेस्ट क्रिकेट संघाला रामराम ठोकला तो कायमचाच.

ज्या ज्या वेळी क्रिकेटमधल्या न तुटणाऱ्या रेकॉर्डची चर्चा होते तेव्हा लाराच रेकॉर्ड हे तुटणं अजूनही अशक्यच मानलं जात. आजच्या अनेक क्रिकेटर लोकांचा आदर्श हा ब्रायन लारा आहे. संघनायक ते दर्जेदार खेळाडू म्हणून लाराच नाव कायमच वरच्या रांगेत राहील.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.