आत्तातरी, खाशाबा जाधवांना पहिलवान म्हणा !

पहिलवान कसा पाहीजे ?

पहिलवान पाहीजे तो मारूती मानेंसारखा, रुस्तम ए हिंद दारा सिंग सारखा..ज्याच्याकडे बघायसा लागलं की मान आकाशापर्यन्त गेली पाहीजे. पहिलवान हत्तीच्या चालीनं गावच्या चावडीवर आला की माणसं गोळा झाली पाहीजेत. पहिलवान जेवाय येणार म्हणल्यावर घरातल्या बायकांनी बुट्टीभरून भाकऱ्या थापायला घेतल्या पाहीजेत. पहिलवानाला बघून दुभती म्हस पण आटली पाहीजे..

पण भारताला पहिलं ऑलिम्पिक मिळवुन देणारा पहिलवान यापैकी कशातच बसत नव्हता. माणसं त्याला काडी पहिलवान म्हणायची. मोठमोठे पहिलवान भारताचं मैदान मारत असताना हा काडी पैलवान जगाचं मैदान मारत होता. तो ना दिवसाला ६ लिटर दुध प्यायचा. ना तेच्या मागं चावडी गोळा व्हायची.

पहिलवान खाशाबा जाधव.

पाच फुट सहा इंच. वजन ५७ किलो. बाहेरची माणसं त्यांना पॉकेट डायनॅमो म्हणायचे. कराड तालुक्यातलं गोळेश्वर हे त्यांच गाव. त्याच्या घराला कुस्तीचा वारसा होता. त्याच पावलावर पाऊल ठेवून खाशाबा कोल्हापूरात आलेले. ५७ किलोचा हा माणूस कोल्हापूरच्या तालमीत दाखल झाला.

त्यावेळेचे पहिलवान त्यांना बघून काय म्हणाले असतील माहित नाही. सराव चालू झाला. डोक्यात एकच गोष्ट होती जगाच्या पाठीवर जायचं. जगाच्या पाठीवर तेव्हा मॅट होतं आणि हा पहिलवान मातीत घाम गाळत होता. १९४८ सालच्या ऑलिपिंकमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. मातीत सराव करणारा माणूस युद्धाच्यावेळी मॅटवर उतरला होता. पहिल्याच प्रयत्नात हार पत्करावी लागली.

आत्ता पुढचं ऑलिंपिक खूणावत होतं. मॅट बघून तयारी चालू होती. अशातच १९५२ साल उजाडलं. जवळचे पैसे संपुन गेले होते. तसही विशेष अस खाशाबा जाधवांकड पहिल्यापासूनच काही नव्हतं. हेलसिंकच्या स्पर्धेला तर उतरायचं होतं. तेव्हा एका माणसानं त्यांच्यासाठी राहतं घर गहाण ठेवलं. कोल्हापूरचे माजी खासदार बाळासाहेब खर्डेकर अस त्यांच नाव. या पहिलवाना विश्वास कमावलां होता. त्याच विश्वासावर खाशाबा जाधव १९५२ साली मैदानात उतरले.

मॅच झाली. कास्यपदक मिळालं !

या पदकाचं महत्व कळायला आपणाला ५६ वर्ष लागली. २०१२ साली कुस्तीत भारताला पदक मिळालं. माणसांना वाटलं हेच पहिलं पदक. तेव्हा काहींना कळालं ५६ वर्षांपुर्वी एका छोटा पहिलवानानं तुमच्यापुढं छोटा इतिहास लिहून ठेवलाय. MPSC, UPSC वाल्यांचा एका मार्काचा प्रश्न असणारा हा माणूस होता ? नक्कीच नाही.

खाशाबा जाधवांच किती जणांनी कौतुक केलं हा संशोधनाचा विषय. आजही कुठल्यातरी खेळात आपण पाकिस्तानला हरवलं की तो खेळ आपणाला कळतो मग चार दिवस आपण कौतुकसोहळा करतो आणि नंतर विसरतो. दुर्दैवाने खाशाबा जाधवांच तसच झालं. त्यांच्या मनात खंत असावीच, ती म्हणजे बॉडी नाय तर पहिलवान नाय अस नसतय. पण त्या गोष्टीला कुठतरी आपण सगळेच दोषी होतो.

कट टू २०१८

राहूल आवारेची टिव्हीवर मुलाखत चालू होती. किती वर्ष वजन मेन्टेन करायला लागलं तो सांगत होता. टिव्हीवाले पण पहिल्या दणक्यात म्हणून गेले. पहिलवान वाटत नाय वो. मेडेल मारणाऱ्या पहिलवानाला माणसं म्हणतात पहिलवान वाटत नाय वो याहून अधिक शोकांतिका काय असणार. जे खाशाबा जाधवांच झालं तोच कित्ता पुढं गिरवला जातोय.

काळ गेला. आज खाशाबा जाधवांच हाल झालं म्हणणारी किती माणसं पहिलवान खाशाबा जाधव म्हणतं असतील. ज्या माणसानं ऑलिंपिकच मैदान मारल तो गेल्यानंतर अर्जून आणि शिवछत्रपती पुरस्कार देणारी माणसं आपण..

असो, गेलेल्या गोष्टींबद्दल आपण काहीच करु शकत नाही, कुस्तीबद्गल वाटत असेल तर एक काम करा, आजपासून खाशाबा जाधवांना पहिलवान म्हणायला सुरवात करा ! पॉकेट पहिलवान नाही ! पहाडासारखा पहिलवानच ज्यानं ऑलिंपिकच मैदान गाजवलं होतं.

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.