सिंधी लोकांसाठी वसवलेल्या उल्हासनगरमध्ये पप्पू कलानीची दहशत अशी सुरु झाली

जून १९८६. उल्हासनगरमध्ये अघोषित संचारबंदी लागली होती. कारण देखील तसच होतं. ऑटो युनियन लिडर रमाकांच चव्हाण याचा खून करण्यात आला होता. या खुनाचा आरोप सिंधी लोकांवर होता. तेच सिंधी लोक ज्यांनी उल्हासनगरची स्थापना केली. मराठी लोक आणि सिंधी लोक अशी दुफळीच निर्माण झाली होती. शिवसेना असताना मराठी लोकांच्या नादाला लागण्याच धाडस करणं हा मुर्खपणा होता. तरी एक वेगळ गॅंगवॉर इथे निर्माण झालं होतं. 

खून होवून तीन दिवस झाले होते. कोणत्याही क्षणी दंगल भडकू शकते अस वातावरण होतं. याच शांततेत मराठी बहुसंख्य असणाऱ्या एका भागात साडेसहा फुट उंचीचा एक व्यक्ती ओपन जीपमधून घुसतो. नुसता घुसत नाही तर एका चौकात जीप उभा करून आपल्या हातातल्या पिस्तुलाने आकाशात तीन वेळा फायरिंग करतो. त्याच हिंमत्तीने तो मराठी एरियातून “बच्चन” सारखा बाहेर पडतो. 

तो काळ देखील बच्चनचा होता. आणि सिंधी लोकांना त्याच घटनेतून त्यांचा बच्चन मिळाला होता. त्याच नाव सुरेश बहादूरमल कलानी अर्थात पप्पू कलानी. 

पप्पू कलानी हे तेच नाव ज्याच्यावर डझनहून अधिक खूनाचे आरोप करण्यात आले. एकाही खूनाच त्याचा थेट समावेश असल्याचा आरोप सिद्ध झाला नाही. पण खूनाच्या कटात त्याचा समावेश होता हे सिद्ध झाल. त्यामुळे त्याला आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली. 

कधी शरद पवारांसोबत त्याचे संबध असल्याचे आरोप झाले तर कधी व्हाईट कॉलर डॉन म्हणून त्याला मुजरा घालण्याचे उद्योग देखील झाले. पण अनेकांना प्रश्न पडतो पप्पू कलानी कोण? 

सुरेश बहागूरमल कलानी अर्थात पप्पू कलानी हा काही सर्वसामान्य, गरिब घरातून आलेला नव्हता. सिनेमातला बच्चन जसा अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत हिरो होतो तसाही इतिहास नव्हता. पप्पू कलानीचे वडिलांचा दारूचा मोठा व्यवसाय होता. त्याचे चुलते धुनिचंद कलानी हे कॉंग्रेसचे नेते होते. अशाच श्रीमंतीच्या वातावरणातून गुंडगिरीकडे वळलेला तरुण म्हणजे पप्पू कलानी. 

उल्हासनगरमधला संघर्ष हा सत्तेचा होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानातून आलेल्या एक लाख निर्वासित लोकांना उल्हास नदीच्या काठावर आश्रय देण्यात आला. शरणार्थी पासून हा प्रवास US ब्रॅण्ड निर्माण करण्यापर्यन्त पोहचला. व्यापार आला आणि मागोमाग प्रतिष्ठा आली. त्यामागोमाग “सत्ता” आली आणि पावरचा खेळ सुरू झाला. 

साल होतं १९८३ चं.

ब्लिट्स चे उपसंपादक ए एन नारायण यांची विठ्ठलवाडी स्टेशनवर चाकूने भोकसून हत्या करण्यात आली. ब्लिट्स त्या काळात हिट होतं. ए एन नारायण यांनी मासिकातून उल्हासनगरच्या वाढत्या गॅंगवारवर लिहण्यास सुरवात केली होती. त्यातूनच त्यांना धमक्या मिळत होत्या. यापुर्वी देखील त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. पण पाणी डोक्यावरुन चाललं आहे हा विचार करुन ए एन नारायण यांच्या हत्येचा यशस्वी कट करण्यात आला. 

या हत्येत दोन नाव असल्याचं सांगितल जात गेलं. एक पप्पू कलानी आणि दूसरं गोपाल राजवानी. गोपाल राजवानी आणि पप्पू कलानी यांची दोस्ती फक्त “वाटा” घेण्यापुरती मर्यादित होती. नारायण यांच्या खूनाच्या आरोपात त्यांना अटक झाली पण लगेच सुटका देखील करण्यात आली.

दोन वर्षांनंतर म्हणजे १९८५ च्या दरम्यान पप्पू कलानी आणि गोपाल राजवानी यांच्या वाद झाला. हा वाद पैशाचा होता. वाद इतक्या टोकाला गेला की पप्पू कलानी यांने गोपाल राजवानी याला नारायण यांच्या खूनाच्या आरोपात अटक घडवून आणल्याच सांगितलं गेलं. गोपाल राजवानीला अटक करण्यात आली. गोपाल राजवानी याला पोलीस रिक्षातून विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनला घेवून चालले होते. त्याचवेळी कलानी यांच्या गुंडानी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. फक्त नशिबाच्या जोरावर गोपाल राजवानी याचे प्राण वाचले. जिवाच्या भितीने तो हाजी मस्तानला जावून भेटला. हाजी मस्तानने त्याला प्रोटेक्शन दिले. 

गोपाल राजवानी दुबईला जावून दाऊदला भेटून आला. कलानीच्या भितीने त्याने उल्हासनगर कायमच सोडलं. इकडे पप्पू कलानीची ताकद वाढत गेली होती. सिंधी लोकांचा बच्चन अशी एक वेगळी ओळख त्याला मिळत गेली. 

१९८६ च्या दरम्यान उल्हासनगर नगरपालिकेच्या इलेक्शन लागल्या.

चुलते धुनिचंद कलानी यांच्या सांगण्यावरुन पप्पू कलानी नगरपरिषदेच्या इलेक्शनला उभा राहिला. उल्हासनगर कॉंग्रेसमध्ये दोन प्रमुख गट होते. दोन्हीही गट तितकेच पावरबाज होते पहिला होता कलानी यांचा तर दूसरा होता बहरानी यांचा. 

उल्हासनगरच्या इलेक्शनमध्ये पप्पू कलानी पहिल्यांदा निवडून आला. आत्ता प्रश्न होता नगराध्यक्ष पदाचा. या पदावर  गोप बहरानी यांनी दावा ठोकला. पण पक्षाच्या वरिष्ठांनी सामोपचार घडवून आणत पहिले तीस महिने पप्पू कलानी यांना अध्यक्ष करण्याच ठरवलं. ३० महिने उलटून गेले तरी पप्पू कलानी यांने राजीनामा दिला नाही आणि इथेच बहरानी आणि कलानी यांच्यातील वॉर ला सुरवात झाली. 

त्याच काळात थेट गुंडगिरी करणाऱ्या दोन नव्या गॅंगची दहशत उल्हासनगरमध्ये सुरू झाली होती. पहिली गॅंग होती चिमन तेजवाणी याची जो “कलानी” यांच्यासाठी काम करायचा तर दूसरी गॅंग होती गोविंद वचानी याची जो “बहरानी” यांच्यासाठी काम करायचा. 

पप्पू कलानी पद सोडायला तयार नव्हता. कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष धुनिचंद कलानी जोपर्यन्त आहेत तोपर्यन्त बहरानी कुटूंबाकडे सत्ता येण्याचे कोणतेच चान्स नव्हते. दोन्हीकडे तणाव होता. अखेर १९८९ साली विधानसभेच्या निवडणुकीपुर्वी एक वर्षाअगोदर धुनिचंद कलानी यांची हत्या झाली. या हत्येच्या संशयाची थेट सुई बहरानी फॅमेलीकडे होती. आणि इथूनच उल्हासनगरच्या व्यापारी शहरात एका खूनी सत्राला सुरवात झाली. 

१९८९ नंतरच्या एका वर्षात उल्हासनगरमध्ये २२ खून पडले. रस्त्यावर आणि चौकात दिवसाढवळ्या हे खून होत असत. या खूनाचा थेट संबध पप्पू कलानी सोबत जोडला जात असे. 

अखेर गोप बहरानी यांची हत्या करून याचा शेवट करण्यात आला. याच दरम्यान गोपाल राजवानी याचा बॉडीगार्ड असणाऱ्या मारूती जाधव याची देखील हत्या करण्यात आली. मारूती जाधव याने मृत्यूपुर्वी जबाब दिला त्यात तो म्हणाला पप्पू कलानीच्या माणसांनी नाही तर त्याच्यावर स्वत: पप्पू कलानी याने हल्ला केला. एकदम वन टू वन. 

१९९० साली महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शन झाल्या आणि त्यात पप्पू कलानी निवडून आला.

पप्पू कलानी आमदार झाला होता. त्याच्या इलेक्शनदरम्यान बोगस मतं टाकण्यात आल्याच सांगण्यात आलं. २७ फेब्रुवारी १९९० या मतदानादिवशी कलानीच्या माणसांना बोगस मतदान करताना भटेजा बंधुनी पकडलं होतं. त्यांनी कलानीच्या माणसांना वॉर्निग दिली होती. या गोष्टीचा शेवटच म्हणजे भटेजा बंधुपैकी एक घनश्याम भटेजा यांची त्याच दिवशी रात्री हत्या करण्यात आली. त्याचा भाऊ इंदर भटेजा या हल्यातून वाचला. त्याला पोलिस प्रोटेक्शन देण्यात आलं पण पोलीस प्रोटेक्शन असताना देखील दोन महिन्यातच त्याची देखील हत्या करण्यात आली. 

शरद पवार हे केंद्रात गेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक झाले. सुधाकरराव नाईक यांनी पप्पू कलानी विरोधात फास आवळला. टाडा अंतर्गत १९९२ साली त्याला अटक करण्यात आली.

सुधाकरराव नाईकांनी जाहिरपणे असही सांगितलं की पप्पू कलानी याला अटक करण्यात आल्यानंतर शरद पवारांनी त्याच्याशी नरमाइने वागण्यास सांगितले होते. अटक झाली कोर्टात केस सुरू झाली आण तारिख पैं तारिखचा खेळ सुरू झाला. २००२ साली पप्पू कलानीची जामिनावर सुटका करण्यात आली. 

या दरम्यान पप्पू कलानी १९९५ आणि १९९९ साली प्रचंड बहुमताने निवडून आला. प्रचार न करता, लोकांना न भेटता तो निवडून येत होता. त्याला विचारलं तर तो सांगायचा लोकांना माझ काम चांगलच माहिती आहे. 

अखेर २००९ साली एकदाच आणि शेवटचा त्याचा पराभव झाला. भाजपच्या उमेदवाराने फक्त साडेसात हजारांच्या मतांनी त्याचा पराभव केला. झालेल्या पराभवातून सावरुन पप्पू कलानी पुन्हा लोकांना भेटू लागला. आपली सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. 

अखेर २०१३ साली त्या केसचा निकाल लागला. कलानीसह अन्य दोन आरोपींना देखील दोषी ठरवण्यात आलं. खून नाही पण खूनाचा कट रचण्याबद्दल आजीवन कारावासाची शिक्षा त्याला ठोठवण्यात आली.  

सध्या पप्पू कलानी अधूनमधून पॅरोलवर बाहेर येत असतो. तर त्याचं राजकारण त्याच्या मुलाने पुढं नेलं आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या कलानींचा स्वतःचा गट आहे. पप्पू कलानी याचा मुलगा ओमी कलानी याची ‘टीम ओमी कलानी (टीओके)’ महाविकास आघाडीसोबत आहे. मागच्या वर्षी भाजपासोबत सत्तेत असलेल्या ओमीने, भाजपने विधानसभेत तिकीट नाकारल्याने महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करून महापौर निवडणुकीत वचपा काढला होता. त्यामुळेच भाजपला अवघ्या अडीच वर्षांतच सत्ताउतार व्हावे लागले होते

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.