दया नायक सध्या काय करतोय !

मुंबईच्या वर्सोवा भागातल्या एका हॉटेलात तो काम करायचां. काम कशाच तर वेटरचं. त्याची आई माहेरात रहायची. वडिल अचानक घर सोडून गेलेले. राधा नावाच्या त्या महिलेला तीन मुलं आणि एक मुलगी होती. या पोरानं नकळत्या वयात मुंबईचा रस्ता धरला होता. उडपीतल्या छोट्या गावातून आलेलं शाळेचं पोरं होतं ते. मुंबईच्या रंगीत दुनियेला पाहून भुलायच वय ते. त्यातही हा काम करायचा, ते देखील बारमध्ये.

वर्सोवा भागतल्या बारमध्ये १९७९ च्या दरम्यान देखील, कोणतं वातावरण असू शकतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या काळात वेटर असणाऱ्या या पोराला पगार होता पाचशे रुपये. पोराच्या गोड बोलण्यामुळे महिना पाचशे रुपये टिप देखील मिळायची. 

१९८० सालात १००० रुपये मिळवणारा लहान पोरगा.

माहेरातल्या एका छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर झोपडी बांधून राहणाऱ्या आपल्या आईला तो निम्मे पैसे पाठवायचां. घरची परिस्थिती त्यामुळेच सुधारू लागली. पण राहिलेल्या पैशाच काय? 

राहिलेल्या पैशातून पोरगं शिक्षणाची स्वप्न बघायचं. वेळ मिळाला की पुस्तक वाचायचं. हॉटेलचा मालक शहाणा होता. त्याने या पोराचा अभ्यास पाहीला आणि नाईट स्कुलला अॅडमीशन करुन दिलं. आत्ता हॉटेलमालकाच्या कृपेनं पोरगं शाळा शिकू लागलं. दहावी, बारावी झाली. गावाकडच्या आईला पोरगं कमवतय याहून अधिक आनंद पोराच्या शिक्षणात मिळत होता. 

वेटरसोबत पोरगं प्लंबर झालेलं आणि सोबत MSc देखील. त्याला भेटणाऱ्या माणसांना भारी वाटायचं. आमच्या टेबलवर दारू देणारा MSc आहे इतकाच काय तो त्याचा मान वाढलेला. 

अशाच एका रात्री त्यानं ठरवलं PSI परिक्षेचा फार्म भरायचा.

मित्रांकडून माहिती घेतली. पोलिस होण्याचं स्वप्न पाहीलं. पण ते सहज शक्य नव्हतं. वेटर, प्लंबर अशी काम सोडून तो दादर इथल्या एका अभ्यासिकेत कामाला लागला. काम करत अभ्यास करणं याहून अधिकचा आनंद कशातच नव्हता. 

बघता बघता त्या पोरानं PSI ची पोस्ट काढली. तेव्हा दुख: एकाच गोष्टीचं होतं त्याचं कौतुक करायला त्याच्या जवळच कोणीच नव्हतं. या पोराची पहिली पोस्टिंग झाली ती, जुहूच्या टिडेक्शन विंगमध्ये. 

वेटरचा शिक्का जावून अंगावर खाकी वर्दी आली होती. त्या वर्दीवर नेमप्लेट असायची, त्यावर लिहलं होतं. 

सब इन्स्पेक्टर दया नायक. 

आज त्या नावात वाटणारी दहशत तेव्हा नव्हती. तो नव्यानं दाखल झालेला एक पोलिस सब इन्स्पेक्टरच होता. शांतपणे तो नोकरी करत होता, पण अचानक एक दिवशी त्याच्या आयुष्यात, तो प्रसंग आला.. 

त्याच्या समोर छोटा राजन टोळीतले दोन गुंड उभा होते. त्यांची दादागिरी पाहून सब इन्स्पेक्टर दया नायक त्यांच्यावर तुटून पडला. छोटा राजनच्या टोळीतील गुंडावर हात टाकण्याचं धाडस एका पोलिस सब इन्स्पेक्टरने केलं होतं. 

Screen Shot 2018 11 28 at 9.12.25 PM
social media

एका रात्रीत मुंबईतल्या क्राईम स्टोरीवर लक्ष असणाऱ्या पत्रकारांच लक्ष त्याच्याकडे गेलं. हा कोण? याची चर्चा तेव्हाचे डेप्युटी पोलिस कमिश्नर सत्यपाल सिंह यांच्या कानावर गेली. हे तेच सत्यपाल सिंह जे आज केंद्रात मंत्री आहेत. सत्यपाल सिंग यांनी नव्या मुलात दम दिसतोय म्हणून त्यांची रवानगी CIU ब्रॅन्चमध्ये केली. तिथे त्याचे सिनियर होते इन्स्पेक्टर प्रदिप शर्मा. 

ते साल होतं १९९६ चं.. 

अंडरवर्ल्ड डॉन बबलू श्रीवास्तवचे दोन पंटर अमुक ठिकाणी येणार आहेत अशी टिप प्रदिप शर्मांना मिळाली होती. त्याच चकमकीत दया नायकच्या पिस्तुलातून पहिल्यांदा गोळ्या सुटल्या. दोन पंटर खल्लास झाले पण एका सब इन्स्पेक्टरला एकांन्टर स्पेशॅलिस्ट बनवून गेले. 

प्रदिप शर्मांना अस्सल ज्युनियर मिळाला होता. त्याला मरायची भिती वाटतं नव्हती. तो फक्त मारायच्या गोष्टी करायचां. 

रफीक डब्बेवाला, सादिक कालिया, श्रीकांत मामा, विनोद भटकर, परवेज सिद्दीकी आणि सुभाष एकामागून एक नाव जोडत गेलं.  आत्ता दया नायक हे नाव साधं राहिलं नव्हतं. दयाच्या नावाने आत्ता मुंबईच्या क्राईमच्या दुनियेत एक दहशत जोडली गेली होती. 

२६ डिसेंबर १९९६. 

सादिक कालिया हे नाव मुंबईच्या दहशतीमधलं सर्वात महत्वाचं नाव होतं. सादिक शार्पशुटर होता. दोन्ही हातानं एका वेगात बंदुक चालवण्यासाठी तो गुन्हेगारी जगतात प्रसिद्ध होता. २६ डिसेंबरच्या दिवशी सादिक आणि दया नायकची कुस्ती संपुर्ण दादरच्या फुल मार्केटला पहायला मिळाली होती. 

दादरच्या मार्केटमधून जात असतानाच सादिक दया नायकच्या रडारवर आला. पुढचा मागचा विचार न करता भर बाजारात दया नायकने सादिकवर हात टाकला. सादिक आणि दयाची कुस्ती चालू झाली. आत्ता दया नायक भर चौकात मारला जाणार याचा अंदाज बारक्या मुलानं देखील लावलेला. अचानक एक गोळी आली आणि दया नायकच्या मांडीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.

दया नायकचं रक्त पाहून निम्मी गर्दी आपआपल्या घरी गेली होती. तोच दूसरी, तिसरी एकामागून एक गोळ्या आल्या आणि सादिक आडवा झाला. दया नायकने दादरच्या गर्दीत सादिकचा गेम केला. 

दया नायकच्या नावावर ८० हून अधिक एन्कांन्टर जमा झाले होते. अशातच अंधेरी नाक्यावर त्याच्या गाडीत बॉंम्ब ठेवण्यात आला. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा आश्चर्यकारक रितीने दया नायक यातून वाचला. महिनाभर तो हॉस्पीटलमध्ये होता.

आत्ता दया नायकला सिनेमाहून अधिक फेम मिळू लागलं.

संपुर्ण बॉलिवूडचं लक्ष त्याच्याकडे गेलं. खंडण्यांचा धमक्या येण्याच्या काळात बॉलिवूडसाठी दया नायक हे नाव हिरोहून कमी नव्हतं. फेम नावाचा प्रकार दया नायकच्या नावासोबत जोडला जावू लागलां. 

अशातच दया नायकने आपल्या गावात शाळा बांधण्याचा निर्णय घेतला. दिवसरात्र टेबलांवर दारूचे ग्लास भरून शिक्षण घेतलेल्या पोराला शाळेचं महत्व कळणं साहजिक होतं. पण याच शाळेच्या उद्घाटनानंतर त्याचे उलटे वासे फिरू लागले.

बॉलिवूड इंडस्ट्रीमधले मोठ्ठ मोठ्ठे सेलिब्रिटी त्याच्या शाळेच्या उद्घाटनासाठी हजर झाले होते. दया नायक एन्कांटर स्पेशॅलिस्ट असला तरी तो एक सब इन्प्सेक्टर होता. त्याचा पगार आणि त्याची शाळा हे गणित न जुळणार होतं. त्याच्यावर चौकशी आयोग बसवण्यात आला, पण त्यातूनही तो सहिसलामत सुटला. दया नायकच्या संपत्तीवरती चर्चा करणारे शांत झाले होते. 

पण दया नायकच्या तक्रारींचा पाढा वाढतच होता.

त्याच्या संपत्तीबद्दलचा संशय दर वेळी वाढवणारी उदाहरणे दिसतं होती. शेवटी एंन्टी करप्शन ब्रॅन्चने त्याच्यावर चौकशी आयोग नेमला. २००६ साली आपल्या दोन जवळच्या मित्रांसोबतच त्याला अटक करण्यात आली. दोन महिने एन्कांटर स्पेशॅलिस्ट जेलमध्ये होता. मिडीयाच्या नजरेतून हे बातमीमुल्य होतं.

दया नायक जेलमध्ये हि बातमी टिआरपी वाढवणारी होती. पण त्यामुळे दया नायकडे बघणारी नजर बदलली. त्याने केलेल्या एन्कांन्टवर संशय घेण्याच काम घेण्याच काम देखील करण्यात आलं. 

तब्बल पाच वर्ष दया नायकला सस्पेंड ठेवण्यात आलं. याच २००९ मध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची वेळ आली तेव्हा डिजीपी एस.एस.विर्क यांनी त्या गोष्टीला नकार दिला. इतक्या बहादूर अधिकाऱ्याच्या विरोधात केस चालवण्यात यावी या गोष्टीला त्यांचा विरोधच होता. २०१० साली सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यावर असणारे आरोप बेदखल केले. तो पुन्हा नोकरीवर रुजू झाला. इतक्या काळानंतर देखील दया नायक एक पोलिस सब इन्प्सेक्टरच होता. 

२०१८ साली त्याचं प्रमोशन झालं होतं. आत्ताही तो मुंबई पोलिसमध्येच आहे. ते हि पोलीस इन्प्सेक्टर म्हणून. पण आजही त्याच्या मागावर जुना हिशोब चुकता करण्यासाठी अंडरवर्ल्ड असेलच. अशा या वादळात देखील तो खंबीरच असतो. जसा तो बारमधला वेटर पोऱ्या असायचा अगदी तसाच.  

हे ही वाचा.

3 Comments
  1. Viraj Mainkar says

    Superb ..thanks for sharing this

  2. Bhange shyam says

    It’s great story

  3. Buddham Shakya says

    I heard his name but now know full information about daya nayak is great hero

Leave A Reply

Your email address will not be published.