गणपती बाप्पा काय करतो, संपूर्ण पेण शहराची पोटाची भूक भागवतो..!!!

महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. संपूर्ण राज्यभर १० दिवस नुसता कल्ला सुरु असतो. लालबागचा राजा, श्रीमंत दगडूशेठ, अष्टविनायक अशा बाप्पाच्या वेगवेगळ्या रूपांच्या दर्शनासाठी भाविक लांबच लांब रांगा लावतात. तसं भारतीयांना कोट्यवधी देव आहेत मात्र गणपतीचं स्वतःचं एक वलय आहे.

१० दिवस श्रीमंत घरापासून ते झोपडपट्टीत, मंदिरात, गाड्यांमध्ये, गाण्यांमध्ये सुध्दा ‘गणपती बाप्पा मोरया’ गुंजत असतं. 

पण हे सगळं सुरू होतं ते ‘पेण’ नावाच्या एका छोट्या गावापासून!

मुंबईपासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव. या बाप्पाचं पृथ्वीवरील जन्मस्थान देखील म्हटलं तरी वावगं नाही. कारण वर्षभर या गावात फक्त एकच काम चालतं ते म्हणजे माती आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार करणं. फक्त एक दिवस हे गाव याकामातून सुट्टी घेतं ते म्हणजे – गणेश चतुर्थीला, ज्यादिवशी गणपती बाप्पांचं आगमन होतं. आणि लगेच पुढच्या दिवशी येणाऱ्या वर्षासाठी उत्पादन सुरू केलं जातं.

इतिहास तज्ज्ञांच्या मते गौतम बुद्धांच्या काळापासून पेण गावाचं अस्तित्व आहे. 

या छोटाशा गावाचं वर्णन करायचं तर गावात जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोळ्यांना सुखणारं हिरवंगार जंगल आहे. त्यांच्या जोडीला ढाबे आणि रेस्टॉरंट्स आहेत जिथे ताजं आणि अगदी रुचकर असं चिकन मिळतं. तसं बघितलं तर आधुनिकतेने या गावात प्रवेश केला आहे. व्यापार, शिक्षण, बँकिंग अशा अनेक सुखसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र अजूनही काही गोष्टी बदलल्या नाहीत. जसं की, अरुंद रस्ते आणि त्यातून रास्ता काढत गावात पोहोचणं. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या आधी इथून गणपती आणताना मोठी तारांबळ उडते. 

मीठागार आणि भातशेती हे पेणच्या समृद्धीचं पूर्वीपासून मुख्य स्त्रोत राहीलं आहे. आता पापड बनवण्याचा व्यवसाय देखील इथे केला जातो. मात्र तरीही सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ‘मूर्ती बनविण्याचा व्यवसाय’. आणि त्यातही गणपतीच्या मूर्ती हा त्यांच्या अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक आहे. 

एका शतकभरापासून जास्त काळ झाला इथले कारागीर गणपतीच्या मूर्ती बनविण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी या कामालाच आपल्या उपजीविकेचं साधन बनवलं आहे. या कलाकारांना गणेशमूर्ती बनवण्याची कला अगदी अंगभूत झाली आहे. कारण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही कला हस्तांतरित करण्यात आली आहे.

पूर्वी कलाकार एकत्र यायचे, एकमेकांत चर्चा करायचे आणि मग एकत्रच मुर्त्या तयार करायचे. मात्र, आता या कारागिरांची तरुण पिढी आधुनिक जगाशी जुळवून घेताना हस्तकलेच्या वेगवेगळ्या शैलींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पारंपरिक मूर्ती बनवण्याच्या पद्धतीत एवढाच काय तो बदल झाला आहे. 

बाकी कलाकारांच्या संख्येत वाढ झाल्याने आता एकत्र मूर्ती बनवल्या जात नाही. रस्त्यावरून चालताना दोन्ही बाजूने सर्वजण आपापल्या कुटूंबासह वैयक्तिक कार्यशाळेत काम करताना दिसतात आणि ते त्यांच्या स्वत:च्या कौशल्यांवर कार्य करतात.

पेणमधील सुप्रसिद्ध गणेशमूतीकार श्रीकांत देवधर यांची पेणमधील कासार आळी नावाच्या छोट्या गल्लीत कार्यशाळा आहे. त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार… कधीकाळी या छोट्याशा गल्लीत तांब्याची आणि पितळाची भांडी तयार करणारे कारखाने होते. मात्र पोलादच्या आगमनामुळे या कारखान्यांचा व्यवसाय संपला तेव्हा या कामाशी संबंधित सर्व उद्योजक उपजीविकेसाठी गणेशमूर्ती नवनीकडे वळले आणि हळूहळू कार्यशाळांची रांग लागत गेली. 

याची सुरुवात नेमकी कधी झाली?

श्रीकांत देवधर नावाचे कलाकार ज्यांची चौथी पिढी आज या कामात आहे त्यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार…

१८६० च्या जवळपास पेण हे मुंबई ते पुणे या दोन शहरांदरम्यानचा असा एक स्टॉप होता, जिथे रायडर्स त्यांच्या घोड्यांची तहान भागवण्यासाठी थांबायचे. पेणचं मूळ नाव ‘पेनुह’ असं होतं. इथे देखील त्याकाळी गणपती फक्त मंदिरांत आणि घरांमध्ये पुजला जायचा. मात्र लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला आणि त्यानंतर राज्यभरात हा उत्सव सुरु झाला तेव्हा इथल्या कलाकारांनी मूर्ती बनवणं सुरु केलं. 

पौराणिक कथांनुसार, केवळ शाडू मातीपासून मूर्ती बनवणं योग्य असल्याचं बोललं जातं. मात्र जेव्हा या मूर्थीची दूरवर निर्यात सुरु झाली तेव्हा प्रवासादरम्यान मूर्ती तुटू लागल्या आणि हे लक्षात आल्यावर मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसकडे वळले. मात्र आता पुन्हा इको सेन्सिटिव्हिटीच्या वाढत्या जनजागृतीमुळे अलीकडे पर्यावरणपूरक आणि मातीच्या मूर्ती बनवण्याचं प्रमाण वाढलं आहे.

आज पेणमध्ये १०० पेक्षा जास्त कारखाने आहेत. तर मूर्ती बनविण्याच्या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या आहे सुमारे दीड लाख. यात मोजकेच मूर्तिकार आणि कारागीर असे आहेत जे स्वत: च्या डिझाइन्स तयार करतात. तर बाकीचे सर्व कारागीर यांच्या डिझाइनची नक्कल करतात.

अलीकडच्या काळात तरुण मुलं देखील सफाई कामगार म्हणून या व्यवसायात उतरले आहेत. त्यांना २००-३०० रुपयांपासून दररोजचा पगार दिला जातो. 

मात्र सफाई कामगार म्हणून या क्षेत्रात आलेली ही तरुण पिढीदेखील हळूहळू मूर्तीं तयार करणं आणि सजावट करण्यात उतरत आहेत कारण तशी आवश्यक कौशल्यं ते स्वतःत विकसित करत आहेत. एकदा का त्यांनी ही कला शिकली की ते दिवसाला जवळपास २००० ते ३००० रुपये कमवू शकतात, असं श्रीकांत देवधर सांगतात. 

मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया कशी असते? 

दरवर्षी कोट्यावधी रुपयांच्या मूर्ती तयार केल्या जातात…  

पेणच्या एका कारागिराने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात मूर्ती तयार करण्याची सुरुवात होते. आधी त्याचा एक बेसिक ढाचा तयार केला जातो. पुढील काही महिन्यांत मूर्तींना आकार देणं, रंगकाम करणं, पॉलिशिंग करणं, दागिन्यांनी सजवणं आहे फिनिशिंग टच दिला जातो. एप्रिलपर्यंत मूर्ती तयार होतात आणि काळजीपूर्वक प्लास्टिकच्या पत्र्यांमध्ये गुंडाळल्या जातात. 

ऑगस्ट महिना आला की विक्री सुरू होते आणि गणेश चतुर्थीपर्यंत मूर्तींची विक्री सुरु असते. आज पेणमधील गणपतीच्या मूर्ती सातारा, गुजरात, वापी, मुंबई अशा भारतभरात ठिकठिकाणी जातात. आपल्या मूर्ती निवडण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या छोट्याशा गावातून राज्यभरात गणेश मूर्तींची वाहतूक केली जाते. इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर इथल्या गणपती मूर्तींना मागणी आहे. 

अमेरिकेत राहणाऱ्या महाराष्ट्रीयन जनतेला मूर्तींची निर्यात केली जाते. 

इथल्या खरिददारांचे मूर्तीशी आणि ती खरेदी केलेल्या दुकानाशी भावनिक संबंध देखील निर्माण झाले आहेत. लोक एकाच मूर्तीकाराल आणि विक्रेत्यांना ऑर्डर देतात. म्हणून दरवर्षी या कारागिरांचा उत्पन्नाचा स्रोत स्थिर झाला आहे. परिणामी वर्षानुवर्षे या उद्योगाची भरभराट होत राहिलीआहे आणि यामुळे पेणमध्ये राहणाऱ्या लोकांच्या पिढ्यांना उदरनिर्वाह करण्यास मदत होतीये. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.