हे आहेत टी२० वर्ल्डकपमध्ये सगळ्यात जास्त सिक्स मारलेले कार्यकर्ते…

सध्या क्रिकेट जगतात टी२० वर्ल्डकपचं वारं वाहतंय, भारताच्या कामगिरीकडे लक्ष आहेच. विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये आलाय पण रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल चिंता आहेच. पण यापलीकडे जाऊन टी२० क्रिकेटमध्ये चर्चा असते, ती कुठल्याही मॅचमध्ये सगळ्यात छकडे कोण मारणार ?

कारण टी२० हा सिक्सचा गेम आहे, मग ते विराट कोहलीनं हॅरिस रौफला मारलेले दोन सिक्स असतील किंवा युवराजनं फ्लिंटॉफला मारलेले सहा सिक्स. या दोन घटनांची जेव्हा जेव्हा आठवण येते, तेव्हा एक प्रश्न पडतो तो म्हणजे टी२० वर्ल्डकपमध्ये सगळ्यात जास्त सिक्स कोणी मारलेत ?

आठव्या नंबरपासून सुरुवात करु – डीजे ब्राव्हो

WhatsApp Image 2022 11 09 at 12.33.24 PM

चॅम्पियन, चॅम्पियन या गाण्यामुळं घरोघरी पोहोचलेला डीजे ब्राव्हो म्हणजे वेस्ट इंडिजचा हुकमी एक्का. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विंडीजची टीम सुपर १२ साठी क्वालिफाय झाली नाही, ब्राव्होनंही गेल्यावर्षीच रिटायरमेन्ट घेतली. पण २ वेळा टी२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या विंडीज टीमसाठी त्यानं या स्पर्धेत एकूण २५ सिक्स मारलेत.

सातवा नंबर- इंग्लिश कॅप्टन जोस बटलरचा

WhatsApp Image 2022 11 09 at 12.35.51 PM

ओपनिंगला येऊन हाणामारी करणाऱ्यांमध्ये बटलरचं नाव आग्रहानं घेतलं जातं, कितीही मोठा बॉलर समोर आला तरी बटलर गडी त्याला किरकोळीत हाणू शकतोय. बटलरनं टी२० वर्ल्डकपमध्ये सिक्स मारलेत २९.

सहावा नंबर – मिस्टर ३६० एबी डिव्हिलिअर्सचा

WhatsApp Image 2022 11 09 at 12.36.19 PM

या नावाबद्दल ना माहिती द्यावी लागते ना कौतुक करावं लागतं, एबीडीच्या करिअरला वर्ल्डकपचं कोंदण लागलं नसलं तरी त्यानं या स्पर्धेत तब्बल ३० छकडे हाणलेत.

पाचव्या नंबरला आहे – शेन वॉटसन

WhatsApp Image 2022 11 09 at 12.51.26 PM

आपल्याला पायातून रक्त येत असलं तरी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलेली जिगरबाज इनिंग्स आठवते, पण ऑस्ट्रेलियासाठीही वॉटसननं अनेक बाप इनिंग्स खेळल्यात. विशेष म्हणजे वॉटसननं वर्ल्डकपमध्ये ३१ सिक्स मारलेत.

चौथ्या नंबरवर नाव येतं – डेव्हिड वॉर्नरचं

WhatsApp Image 2022 11 09 at 12.51.20 PM

ऑस्ट्रेलियाचा पॉकेट डायनॅमो असणाऱ्या वॉर्नरसाठी यंदाचा वर्ल्डकप फार भारी गेला नसला, तरी ३१ सिक्स मारुन तो या यादीत चौथ्या नंबरला आहे.

नंबर तीन – युवराज सिंग

WhatsApp Image 2022 11 09 at 12.51.05 PM

ब्रॉडला मारलेले सलग सहा आणि त्यात २७ सिक्सची भर असे एकूण ३३ सिक्स युवीनं टी२० वर्ल्डकपमध्ये मारलेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे २००७ चा वर्ल्डकप भारताला जिंकून देण्यात त्याचाही मोलाचा वाटा आहे.

क्रमांक दुसरा रोहित शर्मा

WhatsApp Image 2022 11 09 at 12.51.10 PM

भारताचा कॅप्टन रोहित शर्माही आपल्या खतरनाक सिक्स हिटिंग क्षमतेसाठी ओळखला जातो. त्यानं आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत ३५ सिक्स मारलेत. सध्या खेळणाऱ्या प्लेअर्समध्ये रोहितच टॉपला आहे.

पहिलं नाव अर्थात ख्रिस गेल

WhatsApp Image 2022 11 09 at 12.51.15 PM

या लिस्टमध्ये गेलचं नाव आलं नसतं तर आश्चर्य होतं. क्रिकेटमधून रिटायर झाला असला तरी आजही टी२० मधले कित्येक रेकॉर्ड्स गेलच्याच नावावर आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत त्यानं आतापर्यंत ६३ सिक्स मारलेत. दुसऱ्या नंबरचा रोहित त्याच्यापेक्षा जवळपास दुपटीनं मागं आहे, म्हणजे विचार करा.

तुम्हाला यातल्या कुठल्या प्लेअर्सची नावं अपेक्षित होती आणि कुणाची अनपेक्षित कमेंट करुन नक्की सांगा.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.