फक्त त्या दोन ओव्हर्सनं जोगिंदर शर्माला बादशहा बनवलं होतं…
गणपतीचे दिवस होते. देखावा काय का असंना, प्रत्येक मंडपाच्या बाहेर प्रोजेक्टर लावलेले. साऊंडवर गाणं पण ठरलेलं वाजायचं… सुनो गौरसे दुनिया वालो, बुरी नजर ना हम पे डालो. ते साल होतं २००७ आणि विषय होता टी२० वर्ल्डकपचा.
आपल्यातल्या लय भिडूंनी पाकिस्तानला पार बॉल-आऊटमध्ये नेऊन हरवणं असंल किंवा युवराज सिंगनं स्टुअर्ट ब्रॉडला सिक्स हाणणं असंल, प्रत्येक क्षण रस्त्यावर उभं राहून पाहिले. आणि हा सगळी दुनिया एकीकडं आणि गर्दीत उभं राहून भारताची मॅच पाहण्याची मजा एकीकडं.
कारण कसं असतंय गर्दीत सगळेच हर्षा भोगले आणि सगळेच सुनंदन लेले. कंटिन्यू कमेंट्री सुरू असणार हे फिक्स! याच गर्दीत नवे हिरो तयार होत असतात आणि लय हिरो झिरो पण बनत असतात. २००७ च्या वर्ल्डकपवेळी गर्दीला असाच एक हिरो मिळाला, जोगिंदर शर्मा.
जोगिंदर शर्माचं नाव ऐकलं की रवी शास्त्रीचा आवाज आठवतो. श्रीसंतनं मिस्बाह उल हकचा कॅच काढला आणि शास्त्रीबुवा म्हणले, ‘Up in the air… Sreesanth… takes it. India Win!’ बास रस्त्यावर फुल नाच्चो सुरू. धोनीनं ट्रॉफी घेतली, तरी लोकांच्या तोंडात नाव जोगिंदर शर्माचंच होतं.
जोंगिदर शर्मानं केलं काय होतं? तर दोन ओव्हर्स टाकल्या. एक सेमीफायनलला आणि दुसरी फायनलला.
युवराजच्या सहा बॉल सहा सिक्सनंतर, सगळ्यांना वाटत होतं की इंडिया शंभर टक्के वर्ल्डकप मारणार. चिवट ऑस्ट्रेलिया सेमीफायनलला समोर आली आणि जरा टेन्शन पसरलं.
सेमीफायनलचा दिवस. युवराजनं ७० रन फोडत ऑस्ट्रेलियाचा बल्ल्या केला. पण ऑस्ट्रेलियाच ती; हार थोडी ना मानणार. हेडन-सायमंड्सनं ब्याकार हाणामारी केली. श्रीसंतनं काढलेले बोल्ड आणि पिचवर आपटलेले हात एवढे दोन क्षणच एन्जॉय करता आले. शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला जिंकायला २२ रन्स हवे होते. आरपी सिंग, भज्जी, इरफान पठाण सगळ्यांच्या ओव्हर्स संपलेल्या. बॉलिंगला आला जोगिंदर शर्मा.
भावानं आधीच्या दोन ओव्हर्समध्ये ३१ रन्स खाल्लेले. त्यात विकेट पण नाय. गर्दीतून आवाज आला, ‘अरे या धोनीच्या केसांखाली डोकं आहे का? माईक हसी चंदन लावणार फिक्स.’ पण तो डायलॉग नाय का, ‘समय बडा पेहेलवान होता है’ तसंच झालं. जोगिंदर भाऊनं पहिले दोन बॉल डॉट टाकले. टाळ्यांचा कडकडकाट.
तिसरा बॉल हसीनं उचलला, सिक्स जाईल की काय असं वाटत असतानाच, युवराजनं कॅच घेतला आणि आवाज घुमला, ‘जोगिंदर शर्माचा विजय असो’. चौथ्या बॉलवर ब्रेट लीनं दोन रन काढले आणि पाचव्या बॉलवर ब्रेट ली बोल्ड. अरा बाप… साऊंडवर हलगी सुरू! शेवटच्या बॉलवर जॉन्सननं फोर मारली, पण इकडं सुनो गौरसे दुनियावालों वाजायला लागलं होतं.
आता मेन पेपर फायनलचा. डोळ्याखाली, गालावर तिरंगा काढून पोरांनी फुल्ल गर्दी केलेली. आपली बॅटिंग कोसळली पण गंभीर आणि रोहित शर्मा यांनी कल्ला केलाच. इरफान पठाणनं पाकिस्तानच्या पुंग्या टाईट केल्या, पण मिस्बाहनं टेन्शन वाढवलं.
मॅच परत शेवटच्या ओव्हरला गेली. जोगिंदरनं तशी चांगली बॉलिंग केली होती, पण फक्त १५ रन्सच हवे होते आणि त्यात फायनलचा माहोल होता. बॉलिंगला हरभजन येणार असं सगळ्यांना वाटत होतं, गर्दीतनं एक कार्यकर्ता म्हणला ‘शंभरची पैज जोगिंदर येणार.’ भावाशी कुणीच पैज लावली नाही पण बॉलिंगला जोगिंदरच आला.
पहिलाच बॉल वाईड. एकाच वेळी किमान पन्नास हात कपाळावर मारले गेले. पुढचा बॉल डॉट, टाळ्या, शिट्या! पुढचा बॉल सिक्स, शांतता! चार बॉलमध्ये सहा रन. बारक्या पोरांचे डोळे रडवेले झाले होते. तिसरा बॉल मिस्बाहनं उचलला, असं वाटलं वर्ल्डकप गेला. आणि तेवढ्यात शास्त्रीबुवा म्हणले.. ‘India Win.’ विसर्जनाच्या आधीच गुलाल, रॅल्या आणि राडा. स्क्रीनवर सगळी टीम इंडिया दिसत होती, पण कॉमनमॅन सारखा दिसणारा जोगिंदर सिंग त्या दिवसाचा ‘बादशहा’ होता.
सेमीफायनल, फायनलचं प्रेशर, समोर फॉर्मात असलेले खतरनाक बॅट्समन, तरीही जोगिंदर डगमगला नाही. सिक्स खाऊनही त्यानं चुकीचा बॉल टाकला नाही, वाईडनंतर पण लाईन गडबडली नाही. त्याच्यावर कॅप्टनचा, टीमचा विश्वास शंभर टक्के होताच. पण त्याचा स्वतःवर असलेला विश्वास सगळ्यात जास्त महत्त्वाचा ठरला.
कसं असतंय ना भिडू लोक, आयुष्यात प्रत्येकाला हिरो बनण्यासाठी दोन ओव्हर्स मिळत असतात. तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवला आणि नाद केला, तर फिक्स बादशहा बनता येत असतंय, जोगिंदर शर्मासारखं!
हा जोगिंदर शर्मा सध्या हरियाणा पोलिसात डीएसपी म्हणून कार्यरत आहे. अगदी कोरोनाकाळातसुद्धा जोगिंदर शर्मा पोलिस दलात काम करत होता. त्यावेळी, त्याने केलेल्या कामाची दखल आयसीसीने सुद्धा घेतली होती. त्यावेळी आयसीसीने ट्वीट करत जोगिंदर शर्माचं कौतूकही केलं होतं.
आता, जोगिंदरने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो हरियाणा पोलिस दलात सेवा बजावत राहणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाच भिडू:
- शेवटच्या ओव्हरमध्ये वर्ल्डकप जिंकून दिला, आता रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढा देतोय
- २००७ च्या वर्ल्डकपला रवी शास्त्रींची भविष्यवाणी धोनीने चुकीची ठरवली होती
- वर्ल्डकप फायनलला विरू खेळला नाही पण तसलंच जनावर आपल्या गोठ्यात आलं होतं!