प्रभू देवाने खुद्द मायकल जॅक्सनला डान्स करण्याचं चॅलेंज दिल होतं?

साल होतं १९९४, तामिळनाडू मध्ये एक सिनेमा धुमाकूळ घालत होता, नाव होत काधलन. पिक्चरपेक्षा त्यातली गाणी गाजत होती. रोजामधून जोरदार एंट्री करणाऱ्या रेहमानचं संगीत आहे हे कळल्यावर त्या गाण्यांच्या कॅसेट मुंबईमधल्या दुकानांत झळकू लागल्या. काही दिवसातच डब होऊन हा शंकर दिग्दर्शित सिनेमा “हम से मुकाबला ” या नावाने हिंदीमध्ये रिलीज झाला.  त्यातल एक गाण विशेष गाजलं होतं,

 “मुकाबला मुकाबला लैला”

काऊबॉय स्टाईलचं गूढ संगीत, ओले ओ ची आर्त साद. पडद्यावर दिसणारा काळा दाढीवाला काऊबॉय. हाच सिनेमाचा हिरोसुद्धा होता. हिंदी प्रेक्षकांना हे पचनी पडणे शक्य नव्हते. गाण्याच्या सुरवातीलाच नगमा आपल्या या हिरोला वाचवते आणि तो घोड्यावरून पळून जातो. काही क्षणात इलेक्ट्रिक म्युजिक सुरु होते आणि त्याहूनही विजेच्या स्पीडवर तो धुळीने माखलेला हिरो ठुमका देऊ लागतो.

मुंबईच्या इंग्लिश पिक्चर, अल्बम बघणाऱ्या पब्लिकला तो पर्यंत जगातला सर्वोत्तम डान्सर म्हणून अमेरिकेच्या मायकल जॅक्सनचं नाव माहित झालेलं होतं. या हिरोची पब्लिसिटी करण्यात आली,

“भारताचा मायकल जॅक्सन!!”

तो खरोखरचं इंडियन मायकल जॅक्सन होता. त्याने मायकलच्या सगळ्या डान्स मूव्ह या गाण्यात कॉपी केलेल्या होत्या. त्याने गाण्याचा रिदम बरोबर पकडला होता. गाण्याच्या शेवटच्या सीनमध्ये तर त्याला गोळ्या मारण्यात येतात. त्यावेळी आतली बॉडी गायब होते आणि पांढरा सूट, पांढरी टोपी घातलेली आकृती फ्लेक्सिबल डान्स करू लागते. इथे तर स्वतः मायकल जॅक्सन नाचतोय की काय असं वाटत होत.

त्या हिरोच नाव होत प्रभू देवा!!

म्हैसूर कर्नाटक मध्ये प्रभू देवाचा जन्म एका कन्नड कुटुंबात झाला. त्याचे वडील मुगुर सुंदरम हे दाक्षिणात्य सिनेमामधले सुप्रसिध्द डान्सर, कोरिओग्राफर होते. तमिळ, कन्नड, तेलगु मिळून त्यांनी जवळपास एक हजार सिनेमाच्या गाण्याचे डान्स स्टेप्स बसवले होते. डान्स प्रभूच्या रक्तातच होते. लहान असतानाच वडीलांनी कोरिओग्राफी केलेल्या गाण्यात बॅकग्राउंडला नाचू लागला. भरतनाट्यम पासून इंग्लिश डिस्को डान्सवर प्रभुत्व मिळवलेला प्रभू देवा वडिलांच्या पावलावर पाउल टाकून कोरिओग्राफी करू लागला.

दिग्दर्शक शंकरने त्याला आपल्या  जंटलमन या सिनेमामध्ये प्रभू देवाने चिकू बुकू रैले या गाण्यावर डान्स केला.(गोविंदाने याच्या हिंदी वर्जनवर डान्स केलाय. गाणे आहे ” पकचिक पक राजाबाबू” )

प्रभू देवा फक्त डान्स नाही तर अभिनय सुद्धा बरा करतो हे बघून पवित्रण या दिग्दर्शकाने आपल्या इंदू या सिनेमामध्ये त्याला हिरो म्हणून घेतले आणि प्रभू देवाचं आयुष्य बदलून गेलं. त्यातच काधल्न आला आणि शंकर, रेहमान आणि प्रभू देवा या हिट तिकडीने जगाला वेड लावलं. यातल उर्वशी उर्वशी, गोपाला गोपाला वगैरे गाणीसुद्धा त्याच्या विचित्र लिरिक्स सकट सुपर हिट झाली.

मुकाबला हे गाण बॉलीवूडमध्ये बऱ्याच जणानी ढापल. यातल सर्वात कॉमेडी वर्जन होत सबसे बडा खिलाडी मध्ये अक्षय कुमारने धोतर घालून नाचलेल मुक्काला मुकाबला. 

भारतात कित्येक जणांना प्रभू देवामुळे मायकल जॅक्सन, पॉप संगीत आणि वर्ल्ड क्लास डान्सिंगची ओळख झाली. प्रभू एकलव्याप्रमाणे मायकल जॅक्सनची भक्ती करत होता. हमसे मुकाबला मुळे त्याला भारतभर प्रसिद्धी मिळाली. त्याचे पांढऱ्या कपड्यामधले फोटो प्रत्येक डान्स क्लास मध्ये झळकू लागले.

होता होता १९९६ वर्ष आलं. एक दिवस बातमी आली, किंग ऑफ पॉप  मायकल जॅक्सन भारतात येणार आणि मुंबईमध्ये त्याचा शो होणार आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुतण्या राज ठाकरे हा शो ऑर्गनायझ करतोय ही बातमी होती. मायकलला बघण्यासाठी पूर्ण भारतभरातून मोठे मोठे सेलिब्रिटी मुंबईला गोळा झाले. चेन्नईमधून प्रभू देवाला सुद्धा बोलावण आलं होत.

याकाळात एक अफवा खूप फेमस होती की प्रभू देवाने मायकल जॅक्सनला चॅलेंज केला आहे. किती जरी चांगला डान्स करत असला तरी प्रभू देवाने असले हे वेडे साहस करणे आपल्या भारतीयांना पटले नाही. कुठे मून वॉक करणारा मायकल जॅक्सन आणि कुठे आपला गावठी मायकल जॅक्सन प्रभू देवा!!

१ नोव्हेंबर १९९६ला मुंबईमध्ये मायकलचा शो झाला. अवकाशातून अवतरलेल्या रॉकेटमधल्या अंतराळयात्रीच्या वेशातला मायकल जॅक्सनला पाहूनचं निम्मी जनता चक्कर येऊन पडली होती. आपल्या गावठी मायकल जॅक्सनची खऱ्या मायकलशी भेट होऊ शकली नाही. पण त्या दिवशी रात्री मायकलच्या हॉटेलमधून प्रभू देवाला भेटायला बोलावले. मायकलला कोणीतरी मुकाबलाचा व्हिडीओ दाखवला होता. त्याने प्रभू देवाला मिठी मारली.बस्स!!

पण आपल्या इथे न्यूज फिरतच राहिली की प्रभू देवाला मायकल जॅक्सन घाबरला. कोणी म्हणालं मायकल जॅक्सनला प्रभू बरोबर डान्स करणे हा अपमान वाटला आणि म्हणून त्याने हे चॅलेंज स्वीकारले नाही. यात काहीही तथ्य नव्हते.

उलट मायकल जॅक्सन अँड हिज फ्रेंडस या कार्यक्रमात आपल्या सोबत परफोर्म करण्यासाठी प्रभू देवाला आणि ए आर रेहमानला मायकलने जर्मनीला बोलावून घेतले होते. पण स्टेजवर झालेल्या अक्सिडेंटमुळे  शो निम्म्यातून कॅन्सल करण्यात आला . पण भारतात प्रभू देवा सुपरस्टार झालेला होता.

प्रभू देवाचे बरेचसे तमिळ सिनेमे बॉलीवूडमध्ये डब होऊ लागले. १९९६ मध्ये त्याला उत्कृष्ट कोरिओग्राफीबद्दल नॅशनल अवाॅर्ड देखील मिळाला. एका सिनेमामध्ये अभिनय करण्यासाठी तो साठ लाख एवढी तगडी रक्कम घेऊ लागला. असं म्हणतात की लक्ष्य मध्ये ह्रितिकच्या मै ऐसा क्यू हुं या गाण्याची कोरिओग्राफी करण्यासाठी प्रभू देवाने १ कोटी रुपये घेतले.

यानंतर त्याने आपला मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला. साउथमध्ये गाजलेले पोकीरी सारखे सिनेमे त्याने हिंदी मध्ये रिमेक केले. त्याचा आणि सलमानचा वॉन्टेड सुपरहिट झाला. साउथ स्टाईलमधली मारामारी, डान्सची लाट त्याने बॉलीवूडमध्ये आणली. सलमानचं हरवलेलं सुपरस्टारपद परत मिळवून दिल.

या काळात तो आपल्या  पहिल्या प्रेमाला म्हणजेच डान्सला विसरला नाही. ABCD या डान्सरच्या जीवनावर आधारित सिनेमामध्ये त्याने हिरोचा रोल केला. वयाच्या चाळीशीमध्येही त्याच्यातला मायकल जॅक्सन अजून जिवंत आहे हे त्याने सिद्ध केले होते. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.