दुपारची झोप अती होत असल्यामुळेच मध्यरात्री एलियन दिसत असल्याची शक्यता : नासाचे स्पष्टीकरण.

सर्वप्रथम पुणेकराचे अभिनंदन ! आपल्या घरी पाहूणे आलेत. तेही स्वारगेटवर न उतरता थेट कोथरूडला गेले. व्हाया चांदणी चौक देखील यायची गरज त्यांना पडली नाही. पुण्यात एलियन आहे हि गुड न्यूज पण ते पेठेत न येता थेट कोथरुडात गेले हि बॅड न्यूज. हे कस शक्य आहे. चर्चा सुरू झाली. 

बर, जमान्याच्या मागे राहणाऱ्यासाठी पहिला बातमी सांगावी म्हणतो. तर बातमी अशी की पुण्यातल्या एका काकांनी मध्यरात्री आमच्या खिडकीसमोर असणाऱ्या झाडीत हालचाल दिसते ते एलियन आहेत अस सांगितलं. बर सांगितल कोणाला तर शेजारच्या जोशी, काळे, आपट्यांना नाही तर थेट आपल्या प्रधानसेवकांना. आत्ता आपले प्रधानसेवक चौवीस तास काम करतात हा संपुर्ण पेठेसहित कोथरुडचा समज. त्यातही प्रधानसेवकांना थेट कोथरुडमधून पत्र आलं. 

पंतप्रधानांनी एकमिनिट मौन घेतलं. विचार केला प्रचारसेवक असताना आपण कोणाच्या घरी जेवण्यास गेलो होतो का. कोणाच्या घरी आपण चुकून सायकल लावली होती का. कोणत्या अप्पांचे एखादे दुसरे रुपये द्यायचे शिल्लक असतील का. मोदी साहेबांनी डोक्यांच्या शिरा ताणून विचार केला. उत्तर नाही असच आलं. पेठेतल्या सर्व आठवणी मोदी साहेबांनी कायम संपवल्या होत्या. तसही पंतप्रधानांना UPSC करता आली नव्हती याच दुखं होतच. मोदींनी थेट पत्र उघडण्याच धाडस केलं. पत्रातला मायना होता, 

स.न.वि.वि चौकीदार, 

मध्यरात्री आमच्या घराच्या बाहेर एलियन उतरतात. प्रसंगी ते हल्ला करण्याची शक्यता आहे. पुण्याचा डेटा चोरण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडून होत असून योग्य ती कारवाई करावी. 

मोदी साहेबांना सर्वात प्रथम राग आला. अरे हे एलियन तिकडं पुण्याला गेलेच कसे काय. अरे तो शिंजो अबे आला तरी पहिला गुजरातमध्ये येतो. गुजरातचे रस्ते, गुजरातचा पुल, गुजरातचा ठोकळा, गुजरातचा फाफडा, गुजरातची बुलेट ट्रेन, गुजरातची दंगल, गुजरातचे एन्काऊन्टर सगळी काही गुजरातमध्ये येत असताना हा एलियन पुण्यात कशाला जातो. 

मोदींनी रागातच चाणक्यनितीला बोलवलं. चाणक्यनिती म्हणाले, हुकूम महाराज. हुकूम मिळाला वन्नकम. आणि पहिली ऑर्डर निघाली, पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश. कुणाला दिसलं. काका शोधा. प्रसंग शोधा. 

पुणे पोलीसांना दिलेल्या आदेशाची प्रत सापडली ती थेट नासाला. बरेच दिवस दिवाळीच्या रात्री फटाक्यांचे फोटो काढून नासा दमलेली. आत्ता भारताबद्दल वेगळ काहीतरी करायला मिळणार म्हणून नासा जाम खूष झाली. 

नासाची रिसर्च टिम चार दिवस चार रात्रीच विणा वर्ल्डचं स्पेशल पॅकेज घेवून पुण्यात आले. हितं डेक्कनलाच लॉज करुन राहिले. सकाळच्या टायमिंगला आवरुन त्यांनी पेठेतल्या जोशी काकांना बोलवून घेतलं जोशी काकांनी त्यांना चार दिवसाचा खरतनाक प्लॅन दिला.

प्लॅनचा कागद घेवून टिम गेली थेट चितळेच्या स्टॉलवर. थेट आत शिरत होते. तितक्यात गोगटे काका म्हणाले, आम्ही काय मज्जेत कसं जगाव पुस्तक वाचून उभा राहिलोत का? रांगेत या ? 

नासाची टिम उभ्या आयुष्यात पहिल्यांदा उभा राहिली. नासाचा नंबर आला. नासा म्हणाले ते एलियन. इतक्यात शटर बंद. नासा थेट रस्त्यावर आली. नासा दूपारभर तिथेच थांबून राहिली. चारच्या सुमारास दुकान उघडलं. नासाचा नंबर पहिला. नासा म्हणाली, एलियन. चितळ्यांनी थेट हाकलून लावलं. 

नासाने पहिल्या दिवसाचा प्रसंग लिहला. दुपारची वेळ संशयास्पद. 

दूसरा दिवस शनिवार वाडा. सकाळच्या टायमिंगलाच नासा शनिवार वाड्यावर होती. या दरम्यान एक शास्त्रज्ञ स्पेस शीप उतरण्याची जागा चेक करत होता. सगळीकडे गाडी दरवाज्यापुढे लावू नये अपमान करण्यात येईलच्या पाट्या. दुपार झाली. काहीच संशयास्पद नाही. इतक्यात अचानक सगळे गायब होवू लागले. एक वाजता एक एक करुन सगळं शांत. दुकानाच्या पाट्या पडू लागल्या. नासाने तोंडात बोटं घातली. पण नासा पक्की होती. तिथल्या चौथऱ्यावर तसेच बसून राहिले. चार वाजले तोच एकएक पुन्हा गर्दी करु लागला. पुन्हा वाडा तसाच फुलला.

दूसरा दिवस, दुपारची वेळ संशयास्पद… 

तिसरा दिवस. सारसबाग. नासाच्या टिमचं पहिल्यांदा स्वागत केलं जातं. मन भरून येत पण नासाला थोड्या उशिराने कळतं हे पावभाजीवाले आहेत. नासाला बळजबरीने पावभाजी खायला लागते. नासा आत जाते. गणपतीला स्वेटर. बागेत साहसी खेळ चालू असतात. नासा ते पहात उभा राहते. सर्वात छान दिवस आज निकाल लागेल अस वाटतं. पहिल्यांदा त्यांना मुलींचे ओठ इथेच दिसतात. एक वाजतात आणि असंख्य पाखरांचा थवा उडावा तसे सारसबागेतून पक्षी आपआपल्या कॉटबेसीसकडे उड्डाण भरतात. सगळं शांत. चार वाजताच पुन्हा पक्षी. पुन्हा साहसी खेळ

तिसरा दिवस, दुपारची वेळ संशयास्पद… 

चौथ्या दिवशी ते कोथरुडात जावून प्रत्यक्षदर्शीला विचारायचं ठरवतात. पण एक आयड्या करतात शेवटी ते नासावालेच. ते म्हणतात. आपण १ वाजता जायचं. एकजण पुढच्या झाडीत बसून राहिलं. १ ते ४ त्याच झाडीत संशयास्पद हालचाल करायची. बाकींच्यानी दाराकडे लक्ष ठेवायचं. 

फिल्डिंग लागते. हालचाल सुरू होते. हिकडं १ वाजता दार बंद. साडेतीन वाजतात. साडीत संशयास्पद हालचाल करुन नासा कंटाळते. खिडकीतून आत बघते तर काका झोपलेत. काकू झोपलेत. सगळं घर झोपलय. नासा पटकन कोथरुड चालत फिरू लागते, प्रत्येकजण झोपलाय. दूपारची झोप सगळेच घेतायत. हिकडे साडेचार वाजून गेले तरी काका दार उघडायला तयार नाहीत, काका साडेचार वाजले तरी झोपलेतच. पाच वाजले. काका उठले. 

नासाने रिपोर्ट पाठवले काकांची दुपारची झोप अतिरिक्त होतेय.   

  • लेखातील प्रत्येक गोष्टींना लेखक स्वत: जबाबदार राहतील. 
Leave A Reply

Your email address will not be published.