लव्ह चार्जरवाला रॉकस्टार बाबा गुरमीत राम रहीम पंजाबचं राजकारण चार्ज करायला आलाय

Say Every Body
Our Satguru
The Love Charger
True Love Charger
You are The Love Charger
You are The Love Charger
I am so Lucky Because
You are my Love Charger

झालात का ओ चार्ज ! तुम्ही झाला नसाल पण पंजाबी लोक हे गाणं ऐकून लगेच चार्ज होतात. पंजाबी लोकचं काय पंजाबी राजकारणी सुद्धा या गाण्यावर चार्ज होतात. कारण हे गाणं गायलंय पंजाबी रॉकस्टार बाबा डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांनी. पंजाबच्या राजकारणात बाहेरून फिल्डिंग लावणाऱ्या या बाबाचे पराक्रम सुद्धा त्याच्या हातावरच्या केसांसारखे आणि दाढीसारखे अक्राळविक्राळ आहेत.

शालेय जीवनात वाया गेलेला गुरमित पुढे जाऊन साधू बाबा बनला. शालेय जीवनात मुलीची छेडछाड करणारा हा बाबा साधू होऊन सुद्धा सुधारला नाही. हे बाबा आपल्या स्त्रीलंपट हरकतींमुळं नेहमी वादात राहिल. याचा परिणाम राम रहीम साध्वींचे लैंगिक शोषण केल्याबद्दल २० वर्षांची शिक्षा भोगत होता.

पण आता पंजाबच्या विधानसभा निवडणुका लागल्यात आणि हे बाबा 21 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आलंय. कारण या बाबाजींचा राजकीय प्रभाव पण जोरदार आहे.

डेरा सच्चा सौदाचा हा प्रमुख गुरु गुरमीत राम रहीम 2017 पासून हरियाणाच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगतोय. पंजाबच्या निवडणुकीला अवघे 10 दिवस शिल्लक असल्याने डेऱ्यात खलबली सुरु झाली. लाखो अनुयायी असलेल्या राम रहिमच्या डेऱ्यात निवडणुकीच्या दृष्टीने मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता आहे.

त्यामुळे तुरुंगात असताना सुद्धा डेरा सच्चा सौदाची 45 सदस्यीय समिती बाबाच्या सतत संपर्कात होती. येत्या 48 तासात बाबा कोणत्या पार्टीसोबत जायचं ते ठरवणार आहे. अशा बातम्या तरी चर्चेला आहेत. या बाबांचा प्रभाव मोजायचा तर पंजाबमधील मालवा भागात जवळपास 69 जागांवर डेराचा प्रभाव आहे.

या राम रहीमवर इतके बेकार आरोप लागलेत पण याच्या भक्तांच्या संख्येत काय कमतरता नाहीये. याच्या सगळ्या भक्तांचा त्याच्यावर आज ही विश्वास आहे. म्हणून तर पंजाब निवडणुकीच्या एक महिना आधी डेरा सच्चा सौदाने दोन मोठे मेळावे आयोजित केले होते, ज्यामध्ये लाखो लोक जमले होते. डेऱ्याच्या या मेळाव्याला ‘नाम चर्चा’ नाव आहे.

पहिला मेळावा पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातल्या सलाबतपुरा इथं 9 जानेवारीला भरला होता. या मेळाव्यात डेऱ्याचे क्रमांक दोनवर असणारे गुरु शाह सतनाम सिंह यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या दिवशी 25 लाख लोक या डेऱ्यात दाखल झाले होते. आता असा दावा डेरा करतो बरं का! त्यानंतर 25 जानेवारीला दुसरा मेळावा घेण्यात आला. गुरु शाह सतनाम सिंग यांचा 103 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सिरसा इथं हा मेळावा घेण्यात आला.

वर वर पाहता हे दोन्ही मेळावे धार्मिक कार्यक्रम वाटत असले तरी निवडणुकीच्या आधी डेरा सच्चा सौदा असं शक्तिप्रदर्शन करतचं. 2017 मध्ये राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर हे दोन मेळावे ही सर्वात मोठी घटना असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आणि पंजाब निवडणुकीपूर्वी असं शक्तिप्रदर्शन म्हणजे सर्वच राजकीय पक्षांसाठी हिंट आहे की, आम्हाला डावललं तर विषय अवघड होईल तुमचं!

पंजाबमध्ये या बाबाचे 10 हजार डेरे आहेत. आणि विशेष म्हणजे डेरा सच्चा सौदाने उघडपणे राजकारणात भाग घेतलाय. निवडणुकीत पक्ष आणि उमेदवारांच्या पाठीशी डेरा उघडपणे उभा राहिला आहे. त्यामुळे हा डेरा सर्वाधिक चर्चेत असतो आणि वादग्रस्तही ठरतो.

डेऱ्यातले लोक सांगतात की 2007 आणि 2012 मध्ये डेराच्या सांगण्यावरून आम्ही एकदा काँग्रेसला आणि दुसऱ्यांदा अकाली दलाला मतदान केलं होतं.

2007 मध्ये डेऱ्याने काँग्रेसला आपलं समर्थन दिलं होतं. याचा परिणाम असा झाला की अकाली दलाचं बरचसं नुकसान झालं.

2012 मध्ये डेऱ्याने अकाली दलाला आपलं समर्थन दिलं होतं. याचा परिणाम अकाली दल आणि भाजप सत्तेत आलं.

2017 मध्ये सुद्धा डेऱ्याने अकाली दलालाच पाठिंबा दिला. यावेळी अकाली दल सत्तेतून बाहेर फेकल गेलं पण त्यांचा वोट शेअर 25 टक्के इतका होता.

2017 च्या निवडणुकीत डेरा समर्थकांनी शेवटच्या क्षणी भाजपला साथ दिल्याचा फायदा अकाली-भाजप युतीला झाला. त्यावेळी आम आदमी पक्षाला मालव्यात आघाडी उघडता येईल असं वाटत असतानाच आम आदमीचं गणित गंडलं आणि काँग्रेस पंजाबमध्ये सत्तेच्या सिंहासनावर पोहोचली.

2022 ला शक्यता आहे की डेरा काँग्रेस आणि अकाली दलाला विरोध करेल. आपसूकच याचा फायदा भाजप आणि आपला होईल.

सध्या बाहेर आलेल्या बाबाचं काय सुरुय ?

तर सध्या पॅरोलवर बाहेर आलेल्या राम रहीमच्या सुरक्षेत त्याच्या खासगी सुरक्षा रक्षकासह हरियाणा पोलिसही तैनात आहेत. त्याच्या डेऱ्यात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे. या शिबिराशिवाय राम रहीमला इतर कोणत्याही शिबिराला भेट देता येणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केलय.

बाबा राम रहीम ज्या डेऱ्यात आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. डेऱ्याच्या मेन गेटपासून मेन रोडपर्यंत सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. छताला मोठे पडदे लावून डेरा चारही बाजूंनी झाकण्यात आला आहे. दर तासाला एक ना एक तरी व्हीआयपी सेक्टर 50 च्या या डेऱ्यात येतोय.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.