वडील हॉस्पिटलमध्ये होते आणि तिकडं राहुल द्रविडनं ॲलन डोनाल्डचा माज मोडला…
भारतात खळबळ माजवण्यासाठी मोठं कांडच व्हायला हवं असं काही नसतं. एखादं गाणं, एखादं पुस्तक, एखादं भाषण, एवढंच काय एखादी जाहिरातही खळबळ करू शकते. खळबळ करणारी जाहिरात म्हणलं कि सगळ्यात लेटेस्टपैकी एक जाहिरात लगेच डोळ्यांसमोर चमकते.
इंदिरानगर का गुंडा हू मै, म्हणत राहुल द्रविड राडा घालतोय हे चित्र ज्यानं कुणी इमॅजिन केलं त्याचा खरंच नाद नाही. कारण राहुल द्रविड चिडू शकतो यावरच विश्वास बसत नाही. लहानपणी शाळेत जाताना आई शर्टाचं वरचं बटन लाऊन द्यायची, शहाण्यासारखा भांग पाडून द्यायची, शाळा सुटल्यावर आपली ही शिस्त मोडली, पण द्रविड मात्र अजूनही आईनी भांग पाडून दिल्यासारखाच दिसतो.
भारतातल्या अनेक यंग प्लेअर्ससाठी द्रविड आदर्श आहे. त्याची बॅटिंग, किपींग याहीपेक्षा त्याचा स्वभाव, त्याचं वागणं आणि पाय जमिनीवर ठेवणं अनेकांना भावतं. त्यात आता भारतीय टीमचा हेड कोच झाल्यापासून त्याच्यासारखी शिस्त सगळ्या टीमला लागावी असं चाहत्यांना वाटतंय.
राहुल द्रविडला राग येतो की नाही? तो रागावर नियंत्रण कसं ठेवतो? यावर अनेकदा चर्चा होतात. हा किस्सा आहे राहुल द्रविडला आपला राग कसा दाखवतो याचा. त्याच्या शब्दांऐवजी त्याची बॅट कशी बोलते याचा.
राहुल द्रविडचा हा किस्सा सांगण्याआधी तुम्हाला ॲलन डोनाल्डबद्दल सांगायला हवं. ‘व्हाईट लाईटनिंग’ या टोपणनावातच डोनाल्डची खासियत ओळखता येते. त्याच्या ‘पीक’मध्ये डोनाल्ड जगातला सगळ्यात फास्टेस्ट बॉलर होता. त्यात साऊथ आफ्रिकन पिचेसवर त्याच्या बॉलिंगला आणखी कातिल धार यायची.
फास्ट बॉलरकडं असणारी आक्रमकता त्याच्याकडे ठासून भरलीच होती, पण जराशी जास्तच खुन्नस डोनाल्डकडे असायची. त्याच्या बॉलिंगवर बॅटर आऊट झाला नाही, तरी चालंल. मात्र बॅटर त्याला ठसलाच पाहिजे अशी त्याची बॉडी लँग्वेज असायची.
त्यात डोनाल्डला झटाझट विकेट्स मिळायच्या, त्यामुळं त्याचा रुबाब आणखी वाढायचा. मात्र त्याचा हाच रुबाब एका क्रिकेटरनं मोडला होता, तो म्हणजे आपला लाडका राहुल द्रविड.
१९९७ साली भारतीय संघ आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी डोनाल्ड चांगलाच फॉर्ममध्ये होता. त्याची बॉलिंग आग ओकत होती. एका वनडे मॅच दरम्यान द्रविडनं डोनाल्डला त्याच्या डोक्यावरून बेक्कार लांब छकडा मारला. डोनाल्डला होम ग्राऊंडवर इतकं बेक्कार कुणीच मारलं नव्हतं. तो सिक्स म्हणजे द्रविडनं डोनाल्डच्या आक्रमणाला दिलेलं उत्तर होतं. द्रविड फक्त टुकूटुकू खेळतो असं समजणाऱ्या प्रत्येकाला दिलेलं ते उत्तर होतं.
आता या सिक्सनंतर, डोनाल्ड चांगलाच चवताळला. त्यानं द्रविडला चिडून शिवी हासडली. द्रविडनं मात्र त्याला काहीच उत्तर दिलं नाही, तो शांतपणे क्रीझवर उभा होता. हे पाहून डोनाल्ड आणखी खवळला. त्यानं आणखी बडबड केली आणि द्रविडनं पुढच्या बॉलसाठी गार्ड घेतलं.
त्यादिवशी त्यानं जबरदस्त बॅटिंग केली. डिफेन्स केला, फटके मारले पण आपली एकाग्रता कणभरही ढळू दिली नाही.
द्रविडचा सहकारी जवागल श्रीनाथ त्यादिवसाबद्दल सांगतो, ‘ही मॅच सुरू होती तेव्हा द्रविडचे वडील हॉस्पिटलमध्ये होते. त्यांची अत्यंत गंभीर शस्त्रक्रिया सुरू होती. त्या मॅचमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणाऱ्या द्रविडनं आपला संयम हलू दिला नाही. टीममधल्या कुणालाच या सगळ्याबद्दल माहीत नव्हतं. तो संध्याकाळी चेन्नईला निघून गेला, तेव्हा सगळ्यांना याबाबत कळालं. कितीही कठीण परिस्थिती असली, तरी धैर्य कसं असतं हे द्रविडच्या त्या इनिंगमुळं सगळ्यांना समजलं.’
समोरचा प्लेअर कितीही आक्रमक वागला, अगदी खालच्या पातळीवर येऊन शिव्या दिल्या, तरी उत्तर द्यायला द्रविडला कधीच शब्दांची गरज पडली नाही. त्याच्या बॅटचं नाणं खणखणीत वाजायचं, खोटं वाटत असेल, तर डोनाल्डला विचारा.
कारण एकही शब्द न बोलता, फक्त शांततेच्या जोरावर द्रविडनं डोनाल्डचा माज मोडला होता. आजही ती शांतता राहुल शरद द्रविड या नावासकट त्याच्या मनावर कोरली गेलीये.
हे ही वाच भिडू:
- शांत संयमी राहुल द्रविड त्या दिवशी खरोखर भडकला होता..
- राहुल द्रविडने फक्त दहा मिनिटात जे सांगितल त्यामुळे या पाकिस्तानी प्लेअरचं आयुष्य बदलून गेलं.
- वांड पोरांचे नवे वस्ताद द्रविड गुरुजी! चालतंय का?