‘जिथे कमी तिथे आम्ही’ म्हणणाऱ्या द्रविडने बॉलिंग करूनदेखील मॅच जिंकवली होती.

काही प्लेअर्स असे असतात की टीम बहुतांश वेळा त्यांच्यावर अवलंबून असते. त्या पुल देशपांडेच्या गोष्टीत नारायण आहे ना तसेच. पडेल ते काम त्यांना करायला लागत पण शेवटी हिरो म्हणून भाव वेगळाच कोणी तरी खाऊन जातो. भारताच्या टीममध्ये असा एक प्लेअर होता.

द वॉल राहुल द्रविड.

एकेकाळी लोकांनी टेस्टचा प्लेअर म्हणून त्याला हेटाळणी केली पण जवळपास दहा पंधरा वर्षे तो टीमचा मुख्य आधारस्तंभ राहिला. सगळे बॅट्समन आउट होऊन पॅव्हेलीयन मध्ये जात असताना पिचवर नांगर टाकून उभे राहणे आणि मॅच वाचवणे हे त्याच महत्वाच काम !

पण या शिवाय कधी वेळ पडल्यास कसोटीत फास्टर बॉलर्सचा सामना करण्यासाठी ओपनिंगला जाने, कधी कधी वेळ पडल्यास वनडेमध्ये खालच्या नंबरला येऊन फटकेबाजी करणे, कधी वेळ पडल्यास एक जादाचा बॉलर खेळवता यावा म्हणून विकेट कीपिंग करणे, स्लीप मध्ये लक्ष देऊन फिल्डिंग करणे, बाकीचे कोणी तयार नसताना कप्तानीची जबाबदारी उचलणे. जिथे कमी तिथे आम्ही हा मूलमंत्रा घेऊन द्रविड नेहमी टीमसाठी हजर असायचा.

इतकच नाही जेव्हा टीमला गरज होती तेव्हा द्रविडने बॉलिंग देखील केली होती आणि दोन महत्वाच्या विकेट्स देखील घेतल्या होत्या.

गोष्ट आहे २००० सालची. दक्षिण आफ्रिकाची टीम ५ वनडे मॅचची सिरीज खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आली होती. तेव्हाची दक्षिण आफ्रीकाची टीम तगडी होती. गॅरी कर्स्टन, हर्शल गिब्स, कॅलिस, क्लूसनर, पोलॉक, बाउचर यांसारखे एकसे बढकर एक प्लेयर होते. कोचीला पहिली मॅच होती.

दक्षिण आफ्रिकाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. गांगुलीने नुकताच कॅप्टन पदाचा पदभार सांभाळायला सुरुवात केली होती. यापूर्वी त्याने काही सामन्यात सचिनच्या अनुपस्थितीत कप्तानी सांभाळली होती पण कसोटीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर सचिनने कप्तानी सोडल्यामुळे अधिकृत रित्या कप्तान म्हणून गांगुलीची ही पहिलीच मॅच होती.

दक्षिण आफ्रिकेकडून गॅरी कर्स्टन आणि हर्शल गिब्सची ओपनिंग जोडी मैदानात उतरली. सुरुवातीपासूनच त्यांनी फटकेबाजी चालू केलेली. ५०, १००, १५० आणि बघता बघता दोघांच्या जोडीने २०० चा आकडा पार केला. ४० ओवर्स होऊन गेल्या तरी विकेट काही पडली नव्हती.

समोर येईल त्या बॉलरला धुवून काढायचं काम कर्स्टन आणि गिब्स करत होते. दोघांनी आपापली शतके पूर्ण केली होती. आगरकर, कुंबळे सारख्या अनुभवी बोलर्सचं काही एक चालत नव्हत. नवख्या कॅप्टन गांगुलीला काय करावं ते सुचत नव्हत. तेव्हा त्याने राहुल द्रविडच्या हातात बॉल दिला. त्याचीही अवस्था तशीच झाली. त्यालाही झोडून काढलं. तेवढ्यात सुनील जोशीने गिब्सला आगरकरच्या हातात कॅच द्यायला लावून पहिली विकेट घेतली.

तरी अजून कर्स्टन बाकी होता. त्याला साथ द्यायला आला जॅक कॅलिस. गिब्सची विकेट जावून वर फक्त नऊ रन्स निघाले होते. परत द्रविड बॉलिंग करायला आला. फॉर्मात असलेला कर्स्टन स्ट्राईकवर होता. पहिला बॉल डॉट गेला. आणि दुसऱ्याच बॉलला फटका मारायचा त्याने प्रयत्न केला, पॉइन्टवर उभ्या असलेल्या अजय जडेजाने जबरदस्त कॅच घेतला. भारतीय टीमच सर्वात मोठ संकट दूर झालं होतं.

राहुल द्रविडला बॉलिंगमध्येही सूर गवसला होता.

त्यानंतर आलेल्या तडाखेबाज बॅट्समन लान्स क्लूसनरला एक रनही काढू न देता स्वतःच्याच हातात कॅच द्यायला लावून आउट केले. आणि एकाच ओवरमध्ये दोन विकेट्स घेऊन टीमला मोठं यश मिळून दिलं. जिथं टीम मधले भलेभले बोलर्स फेल गेले तिथं पार्टटाईम बॉलर द्रविडची जादू चालून गेली. जर कर्स्टन आणि गिब्सची विकेट मिळाली नसती तर त्याच मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकाने ४०० रन्स बनवण्याचा विक्रम केला असता. पण नशीब म्हणून त्यांच्या विकेट्स गेल्या आणि दक्षिण आफ्रिकेचा स्कोर ३०१ वर ३ असा झाला.

उत्तरादाखल उतरलेल्या टीम इंडियाची टॉप ऑर्डर दुर्दैवाने फेल गेली. बॉलिंग मध्ये स्टार झालेला द्रविड बॅटिंगमध्ये काही करू शकला नाही मात्र अझरुद्दिन आणि रॉबिन सिंग यांच्या साथीने डाव सावरत अजय जडेजाने ९२ रन्स बनवून ३ विकेट्स आणि २ बॉल्स राखून विजय मिळवून दिला. या विजयात सिंहाचा वाटा द्रविडच्या त्या दोन विकेट्सचा होता.

त्यानंतर राहुल द्रविडने बॉलिंग करायची वेळ जास्त करून आली नाही. कधी आली तेव्हा ही त्याला तो जुना चमत्कार करू शकला नाही. टोटल मिळून त्याने वनडेत ४ आणि टेस्ट मध्ये १ विकेट घेतली पण गॅरी कर्स्टनची ती विकेट त्याच्यासाठी एखाद्या मेडलप्रमाणे आहे.

दक्षिण आफ्रीकाचा हाच गॅरी कर्स्टन ज्याने टीम इंडियाच्या बॉलर्सच्या नाकी नऊ आणले होते तोच पुढे जाऊन टीम इंडियाचा कोच बनला. ज्यांच्याविरुद्ध खेळला अशा राहुल द्रविड, सचिन तेंडूलकर या खेळाडूना त्याने मार्गदर्शन करायची वेळ आली. तेव्हा कधी कधी गंमतीमध्ये त्याची टांग खेचायची म्हणून राहुल द्रविड त्याला म्हणायचा,

“तू मला जास्त काही सांगू नकोस. तू माझ्या सारख्या पार्टटाईम बॉलरकडून आउट होणारा बॅट्समन होतास.”

तेव्हा कर्स्टन देखील गंमतीगंमतीमध्ये त्याला उत्तर द्यायचा,

“कोण म्हटल की तू पार्टटाईम बॉलर होतास? तुझ्या टॅलेंटला तुझ्या कप्तानाने ओळखलं नाही. संधी मिळाली असती तर तू सुद्धा जॅक कॅलीस पेक्षा मोठा ऑल राउंडर झाला असतास. “

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.