राजगुरूंच्यासाठी जीव धोक्यात घालणारे क्रांतिकारक बाबा आमटे

२६ डिसेंबर १९१४ खानदानी जमीनदार देविदास आमटेच्या घरी मुलाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं मुरलीधर पण सगळे लाडाने बाबाच म्हणायचे. बाबा घरातला पहिला मुलगा असल्यामुळे अति लाडात वाढला होता. वडील ब्रिटीश सरकारमध्ये मोठे अधिकारी होते. घरची साडेचारशे एकर शेती. प्रचंड पैसा अडका यामुळे राहणीमान अगदी एका राजासारख.

लहानपणीच्या लाडाने बाबा अगदी बंडखोर बनले होते. त्यांचे सगळे शौक रांगडे होते.

अगदी छोट्या वयात त्यांना कुस्तीची आवड निर्माण झाली होती. मल्लखांब कुस्ती करणाऱ्या या छोट्या जमीनदाराला लोक कौतुकाने छोटा बजरंग म्हणायचे. गावतल्या जत्रेत एकदा त्यांनी आपल्या पेक्षा मोठ्या पहिलवानाला हरवल्यावर मिळालेलं चांदीच पदक उघड्या छातीवर टोचून घेतलं होत.

त्याचं असं हे रानटी वागण, आपल्यापेक्षा खालच्या पायरीच्या लोकांच्यात मिसळण त्याच्या वडीलांना आवडायचं नाही. पण बाबा आपल्या वडीलांना पण घाबरायचे नाही.

वयाच्या तेराव्या वर्षी त्यांना बंदुक मिळाली होती. तेव्हा त्यांनी रानडुकराची शिकार केली होती.

कॉलेजमध्ये गेल्यावर तर बाबाच्या शौकीनपणावर धरबंधच उरला नाही. उंची कपडे, उंची मद्य याची त्यांना आवड होती. याकाळात ते कार रेसिंग करायचे. त्यांनी स्वतःची सिंगर स्पोर्ट्स कार घेतली होती. त्या कारच्या कुशनवर बिबट्याची कातडी अंथरली होती. एकदा तर फक्त  मुमताज नावाच्या पॉप गायिकेचं गाण ऐकायसाठी ते ८०० किमी स्वतः गाडी चालवत गेले.

असे बिघडैल बाबांनी स्वातंत्र्य चळवळीच्या मार्गी आले…

बाबांच्या तारुण्याच्या सोबतच तो काळ देश स्वातंत्र्य करण्यासाठी विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या संघर्षांचा होता. त्यामुळे क्रांतिकारकांबाबत त्या काळात लोकांच्या मनात विशेष प्रेम होतं.

याच काळात बाबा आमटेंची भेट हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक आर्मीचे क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्याशी झाली. त्यातून बाबांचे स्वातंत्र्य चळवळ आंदोलनाकडे ओढलं जाणं साहजिक होतं. ‘सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य नाही’ या तत्त्वावर भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांची वाटचाल चालू होती. कोणताही त्याग करण्याची तयारी हे या क्रांतिकारकांचे गुण बाबांना भावले. 

कारण त्यांच्या स्वभावात देखील हे गुण आधीपासूनच होते.

यानंतर पिस्तुलं लपवणं, गुप्त चर्चा, गुप्त संदेशांचं देणं-घेणं, अशी काम बाबा करू लागले. अशातच १९२८ च्या डिसेंबरमध्ये लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला म्हणून चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि राजगुरू यांनी लाहोर येथे सहाय्यक पोलीस अधिक्षक असलेल्या ब्रिटिश अधिकारी जे. पी. सॉन्डर्स याची गोळ्या झाडून हत्या केली आणि ते भूमिगत झाले.

त्यावेळी बाबा राजगुरूंना आपल्या घरी थेट मुक्कामासाठीच घेऊन आले. पण, सरकारी नोकरीत असलेल्या आणि ब्रिटिश सत्तेला वचकून असलेल्या बाबांच्या वडिलांना ही गोष्ट आवडली नाही.

‘माझी नोकरी जाईल. नोकरी गेली तर घरात सहा मुली आहेत, त्यांची लग्नं कशी होणार?’

अशी कारण देत त्यांनी बाबांच्या या कृतीला तीव्र विरोध केला.

पण बाबांची आई राजगुरूंना घरी आणण्याच्या निर्णयाच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. चिडून त्या बाबांच्या वडिलांना म्हणाल्या,

‘ब्रिटिश सरकारची चाकरी करणारे तुम्ही आमटे घराण्यातील पहिले आणि शेवटचे गुलाम असाल!’

‘हिन्दुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या क्रांतिकारी संघटनेशी असलेल्या बाबांच्या संबंधांबाबतची एक आठवण त्यांचे जवळचे मित्र- ज्येष्ठ साहित्यिक वामनराव चोरघडे यांनी त्यांच्या ‘जडणघडण’ या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे.

ते लिहितात,

‘बाबा आमटे त्यावेळी नागपूरमध्ये कॉलेजात जात होते. ते एका कॉलेजात आणि मी दुसऱ्या कॉलेजमध्ये. एकदा बाबा माझ्या कॉलेजमध्ये आले. मी संस्कृतच्या वर्गात बसलो होतो. व्हरांडय़ात उभा राहून बाबांनी जोराची शिंक दिली. ती माझ्या ओळखीची होती. सर शिकवीत होते. पण मी शांतपणे वर्गाबाहेर आलो.

त्यावेळी बाबांनी एक पुस्तक माझ्या हातात दिले आणि शांतपणे निघून गेले. पुस्तकामुळे आमचा कोणाला संशय आला नाही. कसले पुस्तक आहे म्हणून मी उघडून पाहिले. तर पुस्तकात चिठ्ठी होती. थोडस गिचमिडच लिहिल होत, पण ओळखू येत होत, 

‘राजगुरू नागपुरात आला आहे. तू ताबडतोब आपल्या खोलीवर जा. मी त्याला घेऊन तिथे येतो.’

वामनराव कपाळावरचा घाम पुसत खोलीवर पोहचले. तेवढय़ात बाबा राजगुरुंना घेऊन तिथे आले आणि वामनरावांना म्हणाले,

‘हा राजगुरू! ती पिस्तुलं, सुरे, काडतुसं सारं काढ!’’

वामनरावांनी शांतपणे भिंतीतल्या चोरकपाटात कपडय़ात गुंडाळून ठेवलेली सारी शस्त्रं काढून दिली.

यानंतर राजगुरू म्हणाले,

‘‘पोलीस माझ्या मागावर आहेत. बहुतेक पकडतील. भगतसिंग, सुखदेव सापडलेत. कदाचित फाशीही होईल! आमच्यानंतर हे कार्य तुम्ही चालवा.’’

राजगुरूंचे हे शब्द ऐकून बाबांच्या डोळ्यात पाणी उभं राहिल्याचं वामनराव सांगतात.

पुढे राजगुरूंना अटक झाली. तेव्हा बाबा लाहोरच्या तुरुंगात भगतसिंग आणि राजगुरूंना भेटायला गेले होते. याच दरम्यान त्यांचा भारतभराचा प्रवास झाला.

याच काळात त्यांची भेट महात्मा गांधींशी झाली. या भेटीविषयी बाबा आमटे एका मुलाखतीमध्ये सांगतात,

त्या भेटीवेळी महात्मा गांधींनी माळ ताड च्या झाडापासून रस काढण्याची प्रक्रिया शिकवली. मी आश्चर्यचकित झालो होतो. त्यामुळे मी गांधीजीना म्हणालो,

जिस हाथ में बंदूक थी उसमें आप ताड़ी दे रहे हैं यह मुझे कैसे भा सकता है?

यावर गांधीजी म्हणाले,

मैं तुम्हें शुगरकेन का हैंडपम्प दे रहा हूँ. इसे हर गाँव में हर घर में लगा दो. यही भारत को बदल देगा.”

महात्मा गांधींच्या या विचारांनी प्रभावित होऊन मी राजगुरूंची साथ सोडण्याच्या निर्णयापर्यंत आलो. वर्ध्याच्या आश्रमात त्यांचं येणं-जाण होऊ लागल. गांधीजींचं बोलन आणि आचरण यात अंतर नाही आहे हे कळाल. गांधीजीच्या आश्रमात माझ्या आयुष्याला वेगळ वळण मिळाले.

वरोरयाच्या या वाघाचा सगळा रगेलपणा घालवून गांधीजीनी बाबांना माणसाळवला.

जमीनदारीची श्रीमंती टाकून अंगावर गांधीवादी खादी आली. अहिंसावादी आंदोलन करूनच स्वराज्य मिळवू हे बाबांना मान्य होते. पुढे १९४२ मध्ये जेव्हा भारत छोडो आंदोलन सुरू झाले, या चळवळीत तुरुंगवासही स्वीकारला पण वाघ मारणाऱ्या या शिकाऱ्यानं हातात शस्त्र उचललं नाही.

याच गांधीवादामुळे हा एकेकाळचा जमीनदार गावतला मैला उचलू लागला.

अशाच एका पावसाळी संध्याकाळी त्यांना एकदा गटारीत पडलेला कुष्टरोगी दिसला. पण त्यांना त्याचा किळस वाटला. ते तिथून निघून आले पण नंतर त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. गांधीवाद हा आचरणात आणण्याची शिकवण त्यांना झोपू देईना. बाबांनी त्या कुष्टरोग्याला घरी आणल, त्याची सुश्रुषा केली पण त्याला ते वाचवू शकले नाहीत.

पण या घटनेने त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी पुढे समाजाने वाळीत टाकलेल्या या कुष्ठरोग्याच्या साठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतल. १५ ऑगस्ट १९४९ रोजी आनंदवन येथे पहिलं हॉस्पिटल बनवलं.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.