राजीव गांधींची कॉपी करायला गेलेला अमिताभ वडिलांचा मार खाता खाता वाचला.

अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी हे लहानपणापासूनचे जिगरी मित्र होते. अमिताभचं मूळ गाव अलाहाबाद म्हणजेच आजचे प्रयागराज. जवाहरलाल नेहरूंच सुद्धा हेच गाव. याच गावचे असलेल्या कवी हरिवंशराय बच्चन यांच्याशी त्यांची चांगली ओळख होती.

त्यांची मुलगी इंदिरा आणि अमिताभची आई तेजी या तर सख्या मैत्रिणी.

अमिताभची आणि राजीवची पहिली भेट अमिताभच्या ४ थ्या वाढदिवसाच्या दिवशी झाली. तेजी बच्चन यांनी बड्डे थीम म्हणून फॅन्सी ड्रेस कॉम्पिटेशन ठेवलं होतं. अमिताभला तो दिवस अजूनही आठवतो.

इंदिरा गांधी दोन वर्षांच्या राजीवला स्वातंत्र्यसैनिकाचा खादी ड्रेस घेऊन आल्या होत्या. तिथून या दोघांची गट्टी जमली.

अमिताभ, त्याचा छोटा भाऊ अजिताभ, राजीव आणि संजय हे चौघेही एकमेकांचे जिगरी मित्र होते. राजीव आणि संजय तेव्हा शिकायला डुन स्कुल ला होते तर बच्चन बंधू नैनितालला पण दर सुट्ट्यांमध्ये हे चौघेही दिवसरात्र एकत्र असत.

राष्ट्रपती भवनच्या स्विमिंगपूल मध्ये पोहायला जाण्यापासून ते थिएटरमध्ये इंग्रजी सिनेमे पाहण्या पर्यंत राजीव आणि अमिताभ एकत्रच असतं.

राजीव गांधी यांचे वडील म्हणजे फिरोज गांधी. हे एक अवलिया होते. ते सुद्धा राजकारणात होते, काँग्रेस पक्षात होते पण त्यांचं आणि त्यांच्या सासऱ्यांचं म्हणजे पंतप्रधान नेहरू यांचं पटायचं नाही.

बऱ्याचदा संसदेत मागच्या बाकावर बसून नेहरू सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्यात फिरोज गांधी तरबेज होते.

यावरून त्यांची आणि त्यांची पत्नी इंदिरा गांधी यांची बऱ्याचदा भांडणे व्हायची.

थोड्याशा विक्षिप्त वाटणाऱ्या फिरोज गांधी यांच आपल्या मुलांवर मात्र प्रचंड प्रेम होतं.

सुट्टीच्या दिवशी ते राजीव आणि संजयला घेऊन घरातील इलेक्ट्रिक वस्तू, गाड्या,मोटारी दुरुस्त करत बसत. त्यांना टेक्नॉलॉजीची भयानक आवड होती. वस्तू खराब जरी झाली नसली तरी ती उघडणे त्यातील मेकॅनिक्स शिकणे हा छंद राजीव आणि संजय मध्ये सुद्धा उतरला होता.

फिरोज गांधी यांनी राजीव व संजयला स्वावलंबी होण्यास शिकवलं होतं. त्यामुळे स्वतःची खेळणी दुरुस्त करण्यापासून ते सायकल पंक्चर काढण्यापर्यंत हे दोघे अगदी लहान असल्यापासून करत.

बऱ्याचदा अमिताभ राजीव गांधी आणि संजय गांधींचे उद्योग बघत असे, त्यांना थोडीफार मदत देखील करत असे.

लहान मुलांना आपले दोस्त मंडळी जे करतात ते कॉपी करायची खूप आवड असते. तसंच अमिताभला सुद्धा झालं.

राजीव आणि संजय जे करतात ते आपण पण करायचं असं त्याने ठरवलं.

योगायोगाने त्याचे वडील हरिवंशराय बच्चन काव्य मैफिलीनिमित्त परदेश दौऱ्यावरून एक ट्रान्झिस्टर विकत घेऊन आले होते.

अमिताभने राजीवप्रमाणे बिघडलेला नसूनही ट्रान्झिस्टर संपूर्णपणे खोलला. त्याचे सगळे स्पेअरपार्ट ओपन केले. त्याच्या सोबत खेळला. थोड्या वेळाने खेळून झाल्यावर तो ट्रान्झिस्टर परत जोडायला सुरवात केली तर त्याला ते जमेना.

मग मात्र अमिताभ टरकला.

एक तर तो खूप महागातला ट्रान्झिस्टर होता. तो परदेशी असल्यामुळे भारतात दुरुस्त होणे अशक्य होतं. अमिताभच्या घरची परिस्थिती तशी मिडल क्लासच होती. त्यामुळे आता आपली खैर नाही हे अमिताभच्या लक्षात आलं.

रडकुंडीला आलेला अमिताभ राजीव गांधींच्या घरी गेला. त्याला सगळं सांगितलं. राजीवनेही बच्चनला धीर दिला. फिरोज गांधींचा टूलबॉक्स घेऊन दोघे अमिताभच्या घरी आले.

राजीव गांधींना असला कारभार सतराशे करायची सवय होती.

त्यांनी अगदी काही मिनिटात खटपट करून अमिताभचा ट्रान्झिस्टर होता तसा करून दिला.

बच्चन आई वडिलांच्या मार खाता खाता थोडक्यात वाचला.

हा किस्सा खुद्द अमिताभने एका मुलाखती मध्ये सांगितला आहे. अगदी मोठेपणी सुद्धा हे दोघे बेस्ट फ्रेंड राहिले.

amitabh rajiv gandhi

पण पुढे सुपरस्टार झालेल्या अमिताभला राजीव गांधींनी राजकारणात आणलं आणि त्यांच्या मैत्रीला ग्रहण लागलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.