युवराज, पोलार्डच्या आधी शास्त्री गुरुजींनी सहा बॉलला सहा सिक्स ठोकले होते.

टीम इंडियाचे गुरुजी, कॅप्टन विराट कोहली चे बेस्ट फ्रेंड, कोटी मुंह मे आ गया फेम, ट्रेसर बुलेट रवी भाऊ शास्त्री म्हणजे रंगीत करेक्टर. कधी काही करताना लाजत नाहीत. त्यांच्या तारुण्याच्या काळात (त्यांच मत आहे की अजून तो सुरु आहे) पोरी फिरवण्याससून ते दारू पिण्यापर्यंत सगळ एकदम टेचात केलं. भारतीय क्रिकेटच्या ड्रेसिंग रूमच श्रावणी वातावरण बदललं याला हा टग्या माणूस कारणीभूत आहे हे सगळ्यानाच ठाऊक आहे.

रवी भाऊनी केलेल्या कॉमेंट्रीमध्ये सटासट बाण सुटायचे. तिथेही त्याच्या बमब्ब्या वाणीचा आशीर्वाद अनेकांना मिळायचा.  कधी कोणाला विनाकारण झाडावर चढवल, कधी कोणाला शिव्या घातल्या, हे सगळी कामे केली. पण एक गोष्ट मानली पाहिजे की त्याने कधी स्वतःच्या खेळण्याचा बडेजावपणा मिरवला नाही.

आज आपल्याला सचिनला शारजा मध्ये बक्षीस मिळालेली कार आठवते पण रवी शास्त्रीला ऑस्ट्रेलियामधल्या वर्ल्ड चम्पियनशिप स्पर्धेत मॅन ऑफ दी सिरीज म्हणून ऑडी मिळालेली हे कोणाला आठवत नाही. युवराज सिंगने मारलेले सहा सिक्सर प्रत्येकाला आठवतात पण रवी शास्त्रीने हा पराक्रम ३५ वर्षांपूर्वी केलेला हे कोणाच्या गावी देखील नसतं.

१० जानेवारी १९८५

वानखेडेवर मुंबई विरुद्ध बडोदा रणजी मॅच सुरु होती. मुंबईचे कप्तान होते सुनील गावस्कर. अतिशय शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावस्करनी तेव्हा नियम केला होता की जो खेळाडू उशिरा येईल त्याला संघात खेळवणार नाही. मागच्या मॅचला आपले लाडके रविभाऊ बाहेर बसले होते. या सामन्यामध्ये खुद्द दिलीप वेंगसरकरला गावस्करनी बाहेर काढलं.

मुंबईने पहिल्या इनिंग मध्ये ३७१ तर बडोद्याने ३३० धावा बनवल्या होत्या. मॅच कधी कोणाच्या साईडला झुकेल कळत नव्हतं. दुसऱ्या इनिंगवेळी दोन विकेट आउट झाल्यावर रवी शास्त्री खेळायला उतरला.  वानखेडेवरचं पब्लिक क्रिकेट समजणारं होतं. त्यांना मॅच निकाली निघायला हवी होती. मुंबईचे खेळाडू फास्ट खेळले तर जिंकण्याचे चान्सेस होते आणि  दुर्दैवाने रवीभाऊ टुकूटुकू खेळण्यासाठी फेमस होता.

तो आला तेव्हाच पॅव्हेलीयन मधून हुर्यो उडवल्याचे आवाज सुरु झाले. रवीला काहीही करून स्वतःला सिद्ध करायचं होतं. त्याने सुरवात सांभाळून केली पण थोड्याच वेळात आपले हात खोलले. बघता बघता त्याची ऐंशी बॉलमध्ये सेंच्युरी झाली. त्यात चार सिक्सर मारले होते. 

शतक झाल्यावर भाऊचा आत्मविश्वास आणखी वाढला. त्यात त्याच्या समोर बॉलिंगला आला तिलक राज नावाचा एक दुर्दैवी पार्ट टाईम बॉलर. गुरु रवी फुल जोमात होते, त्यांनी पहिल्याच बॉलला बॉलरच्या डोक्यावरून स्ट्रेटला सिक्स मारला. दूसरा वाइड लॉन्ग-ऑन तर तीसरा छक्का पण सेम. चौथा सिक्स मिड-विकेटच्या डोक्यावरून, पाचवा लॉन्ग ऑन वरून मारला. सगळ पब्लिक येडं झालं होतं. तिलकराज बिचारा ओव्हर कधी संपेल याच्या काळजीत होता. रवीने त्याला शेवटच्या बॉलला परत डोक्यावरून सिक्स मारला.

इतिहास घडला होता. भारतात पहिल्यांदाच कोणी तरी ओव्हरच्या सहाच्या सहा बॉलला सिक्स मारले होते. पुढे अनेक वर्षांनी तो स्वतः कोमेंट्री करत असताना वर्ल्डकप मध्ये युवी त्याच्या विक्रमाची बरोबरी करणार होता. रवी शास्त्रीची ती खेळी साजरी करायला कोणी वर्ल्डक्लास कॉमेंटेटर नव्हता, पण तो सामना डोळ्यांनी पाहणाऱ्याप्रेक्षकांनी ते सहा सिक्स अजरामर करून ठेवले.

रवीने त्या दिवशी फक्त १२३ चेंडूत २०० धावा बनवण्याचा विक्रम देखील केला होता. 

एवढ सगळ झालं. त्या दिवशीचा खेळ संपल्यावर द ग्रेट रवी शास्त्री पार्टी करायला निघून गेले. रात्रभर एन्जॉय केल आणि रात्री 3 वाजता घरी परतले. घरी आई वाटचं बघत होती. तिला माहित नव्हत की आपल्या मुलान आज भीमपराक्रम केला होता ते. आणि त्या काळात मै कर के आया है असं म्हणायची देखील पद्धत नव्हती.

रवीने उशिरा आल्याबद्दल आईच्या शिव्या खाल्या. तिने त्याला विचारले की आज रन्स किती बनवल्या? रवीने खोटंचं सांगितलं की ५. आई म्हणाली,

“तीन तीन वाजे पर्यंत घराबाहेर उंडारल्यावर असंचं होणार.”

रवी काही न बोलता आपल्या खोलीत गेला आणि झोपून टाकला. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरच्यांना एका भेळपुरीवाल्यान सांगितलं की तुमच्या मुलाने सहा बॉलला सहा सिक्स मारण्याची अचाट कामगिरी केली आहे ते. एवढच नाही तर दुसऱ्या दिवशी वेळेत ग्राउंडवर जाऊन त्याने २ विकेट देखील काढल्या होत्या.

असा आहे आपला रवीभाऊ. ग्राउंडवर चांगलं खेळा आणि रात्री काय गोंधळ घालायचा आहे ते घाला. हे त्याच कोच म्हणून देखील तत्व आहे. त्याच्या याच अॅटीट्युडमूळ सगळे खेळाडू बिनाप्रेशर खेळतात आणि त्यांच बेस्ट परफोर्म करतात. उगीच नाही किंग कोहली अनिल कुंबळेसारख्या लीजंडला डच्चू द्यायला लावून रवी शास्त्रीची सेटिंग लावत.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.