OYO सगळीकडे दिसतंय पण प्रॉफिट-लॉसचं गणित गंडलंय…

गर्लफ्रेंडसोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी, मित्रांना पार्टी देण्यासाठी, किंवा मग कुठं बाहेर गेल्यावर राहायची सोय म्हणून गूगलवर ‘हॉटेल रूम’ असं सर्च केलं तरी ‘ओयो’चा लाल रंगाचा बॅनर दिसतोच आणि हा ओयोचा बॅनर बघून आपल्याला वाटत असेल कि, “ह्या ओयो वाल्याची किती हॉटेलं आहेत! बक्कळ पैसा कमवत असणार हा”.

असंच मित्रासोबत बोलत होतो तर तो म्हणला, “काय नाय रे नुसता पैसा असून काय करायचंय? लय गंडवतात हे ओयो वाले.” आता मला तर गर्लफ्रेंड नाही आणि ओयोचाही अनुभव नाही म्हणून त्याला म्हणलं “तुच सांग कसं गंडवतात….” तर म्हणला “अरे आम्ही रूम बूक करुन जातो आणि हॉटेलवर गेल्यावर हॉटेलवाला रूमच देत नाही… मग काय मूड ऑफ होऊन जातो सगळा”

मग विचार केला, येवढी मोठी ओयो कंपनी असं का वागत असेल? मग सोशल मीडिया, गूगल-बिगल पालथं घातलं आणि लक्षात आलं माझा मित्र बरोबर बोलत होता…

आधी बघुया ओयोची सुरूवात कशी झाली… २०१३ मध्ये २० वर्षांच्या तरुणानं ही कंपनी सुरू केली. त्याचं अग्रवाल. १९ वर्षांचा असताना रितेश आई वडिलांसोबत फिरायला गेला होता. त्याला तिकडं हॉटेलमध्ये रूम मिळाली नाही. रूम मिळाली नाही म्हणून, त्याची जितकी गैरसोय झाली त्यापेक्षा जास्त त्याचा फायदा झाला.

रूम मिळाली नाही मग त्याने विचार केला, लांब कुठे फिरायला गेल्यावर सगळ्यांनाच ही अडचण येत असेल. मग, अशी काहीतरी सोय झाली पाहिजे की, प्रवासाला निघायच्या आधीच हॉटेलची रूम बूक करता आली पाहिजे. आणि मुळातच मारवाडी असल्यामुळे त्याने स्वत:च ही टेक्नोलॉजी आणायचं ठरवलं आणि काम सुरू केलं.

सुरूवातीला त्याने ‘ओरेवल स्टेज’ या नावानं कंपनी सुरू केली.

ही कंपनीसुद्धा ऑनलाईन हॉटेल रुम्स बूक करण्याच्या क्षेत्रात होती. या कंपनीने चांगली कमाई केली, तगडे स्पॉन्सर्स मिळवले… पण, सुरूवातीला जबरदस्त कमाई केलेली ही कंपनी नंतर लॉसमध्ये गेली आणि बंद झाली.

नूकसान झालं म्हणल्यावर, २०-२२ वर्षांचा पोरगा पार खचून गेला असता… पण, हा रितेश काही औरच मातीचा. त्याने विचार केला, कंपनीचं परिक्षण केलं … ‘नक्की चुकलं काय?’ त्याच्या लक्षात आलं की, आपण ओरेवल स्टेज ने जी ऑनलाईन रूम बूकिंगची सोय देत होतो ती आधीपासूनच बऱ्याच वेबसाईटवर उपलब्ध आहे… मग आपण वेगळं काय करायचं?

त्याला उत्तर मिळालं, ‘ऑनलाईन बूक केलेली रूम ही बऱ्याचदा स्वच्छ नसते’

त्याने ठरवलं जो कुणी आपल्या कंपनीकडून ऑनलाईन रूम बूक करेल त्याला हॉटेलमध्ये सगळ्या सोयी-सुविधा मिळायला हव्यात. आपण असं केलं तरच बाकी वेबसाईट्स आणि आपल्या स्पर्धकांना सोडून लोक आपल्याला निवडतील. त्यानं पुन्हा OYO या नावानं नवीन कंपनी सुरू केली.

‘OYO Rooms’ याचा फूल फॉर्म On Your Own असा.

आता यावेळी त्याने हॉटेल मालक-चालक यांना आधीच सांगितलं होतं जे कोणी हॉटेलची स्वच्छता आणि इतर सोयी-सुविधांची हमी देतील त्यांच्याशीच कंपनी टाय अप करेल. याशिवाय, हॉटेलमध्ये सगळ्या सुविधा व्यवस्थित आहेत का हे पाहण्यासाठी कंपनीचा माणूसही नेमला.

२०१३ ला फूल प्लॅनिंगनं पुन्हा मैदानात उतरल्यावर रितेशची ओयो कंपनी जबरदस्त चालायला लागली. कंपनीत मोठ-मोठ्या इंव्हेस्टर्सने पैसे गुंतवले. लाईटस्पीड वेन्चर पार्टनर्स आणि डी एस जी कंज्यूमर पारटनर्सने ४ कोटी रुपये मग, २०१६ मध्ये सॉफ्टबँक या जपानच्या कंपनीनं तब्बल ७ अब्ज रुपये गुंतवले.

आतापर्यंत कंपनीमध्ये जवळपास ३.१ अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक झालीय. लाईटस्पीड व्हेंचर पार्टनर्स, एअर बीएनबी, सीक्वीआ इंडिया, मायक्रोसॉफ्ट यांच्यासह अनेक बड्या कंपन्यांनी गुंतवणूक केलीय.

ही झाली ओयो कंपनीची झगमगती बाजू. पण, कंपनीच्या आताच्या नफ्या-तोट्या विषयी म्हणजे प्रॉफिट-लॉसविषयी बोलायचं झालं तर, 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये कंपनीला एकूण १३,१२२ कोटींचं, २०२0-२१ च्या आर्थिक वर्षात 3,943 कोटींचं तर, २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात २,१४० कोटींचं नुकसान झालंय. हे नुकसान दरवर्षी कमी होताना दिसतंय.

मुळात कंपनीला नुकसान का होतंय ते पाहूया

१) हॉटेल मालकांची ओयोवरची नाराजी:

  • ओयो कंपनी आणि हॉटेल्समध्ये जो करार होतो त्यानुसार ठरलेली रक्कम कंपनी हॉटेल्सला देत नाही अशी हॉटेल मालकांची तक्रार असते. बऱ्याचदा पैसे देण्याच्या वेळी कंपनी हॉटेल्सकडून अतिरिक्त आणि छुपे शुल्क आकारते असंही हॉटेलच्या मालकांचं म्हणणं आहे. याबाबत ओयो इंडियाचे ऑपरेशन हेड आदित्य घोष यांनी “हे कोणतेही छुपे शुल्क नसून ग्राहकांना व्यवस्थित सोयी न पुरवल्यास लावण्यात येणारा दंड असतो.”
  • ओयोशी टाय-अप केलेल्या लहान हॉटेल मालकांची कंपनीवर नाराजी आहे. या नाराजीचं कारण म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की, कंपनी कॉन्ट्रॅक्टवर सही करून घेताना जे नियम दाखवते त्यापेक्षा काही वेगळे नियम लावून नंतर पैसे द्यायला नकार देते.
  • अ‍ॅपवर ओयो रूम ४९९ ला दाखवतात पण हॉटेल मॅनेजर सांगतो आमची रूम १५०० रुपयांच्या खाली देणार नाही…

२) ग्राहकांची ओयोवरील नाराजी:

  • पहिला मुद्दा कदाचित तुम्ही सुद्धा अनुभवला असेल. कधी ओयोवर रूम बूक केलीय अन् हॉटेलवर पोहोचल्यावर हॉटेलमध्ये ‘आमचं हॉटेल ओयोसोबत कामच करत नाही’ असं तुम्हाला सांगितलंय का? हा मुद्दा लक्षात घेतला तर, ओयो ही कंपनी आपण जास्त हॉटेल्ससोबत काम करतोय हे दाखवण्यासाठी टायअप नसलेले हॉटेल्सही त्यांचा लिस्टमध्ये दाखवते. काही वेळेस एखादं हॉटेल आधी टायअपमध्ये असतं नंतर टायअप संपल्यानंतरही लिस्ट अपडेट केली जात नाही.
  • आजपर्यंत बऱ्याचदा हॉटेल रूममध्ये काही छुपे कॅमेरे असल्याच्या बातम्या आल्यात. आता हे कॅमेरे ओयो कंपनी लावते कि मग त्या हॉटेलमधले कर्मचारी हा भाग वेगळा. ग्राहक म्हणून ओयोवरून रूम बूक करून गेलेल्या व्यक्तीचा ओयो या कंपनीवरूनच विश्वास उडतो.
  • अ‍ॅपवरच्या किंंमतीत आणि हॉटेलवर जाऊन समजलेल्या किंमतीत फरक असल्यानं ग्राहकांचा हिरमोड होतो.

३) कोरोना:
कोरोनाने जगातील जवळपास सर्वच व्यवसायांना ग्रासलं होतं. अगदी प्रत्येक विभागातील व्यवसाय, उद्योग, लघुद्योग, गृहोद्योग यांच्यावरही कोरोनाचा पर्यायानं लॉकडाऊनचा भयंकर परिणाम झाला. या नुकसानाला ओयो ही कंपनीसुद्धा अपवाद नाही.

एकंदरीत कोरोनाचा मुद्दा वगळला तर, ओयो ही कंपनी मुळात दोन घटकांवर अवलंबून आहे… हॉटेल्स आणि पर्यायानं हॉटेल मालक आणि ग्राहक… यापैकी हॉटेल मालक हे ओयो कंपनीवर नाराज आहेत तर, ग्राहकांचा ओयो रूम्सवरचा विश्वास हा काही अंशी कमी झालाय.

भारताशिवाय चीन, मलेशिया, नेपाळ, इंग्लंड, युएई यांसह अनेक देशात पसरलेल्या या ओयोला पुन्हा यशाचं शिखर गाठायचं असेल तर, हॉटेल मालक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा विश्वास परत मिळवावा लागेल.

आताच्या घडीला ही कंपनी लॉसमध्ये दिसत असली तरी, कंपनीमध्ये आणि कंपनीचा संस्थापक रितेश आगरवालमध्ये पुन्हा एकदा या कंपनीला उंच शिखरावर नेण्याची ताकद आहे. त्यामुळे, ओयो हा प्रोजेक्ट यशस्वी झाला की फेल गेला येत्या काही वर्षात स्पष्ट होईल.

 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.