आपल्या सहकाऱ्यांवरचा खटला मान्य केला पण कामगारांचं नुकसान होवू दिल नाही.

१६ फेब्रुवारी २०१५ रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या गोविंद पानसरे यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आणि कामगार चळवळीचा या कम्युनिस्ट नेत्याची धगधगती ज्योत २० फेब्रुवारी २०१५ रोजी, मुंबईच्या ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल मध्ये कायमची मावळली.

याच नेत्याची आज पुण्यतिथी, त्यांच्या हल्लेखोरांचा तपास अजून लागलेला नसला तरी अनेक माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते गोविंद पानसरे यांचे विचार समाजा पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेत. याच त्यांच्या विचारांचा पाया दाखवून देणाऱ्या दोन घटना “कष्टकऱ्याचा बाप” या पुस्तकात सांगितल्या आहेत.

पहिली घटना आहे १९७५ ते ७३ मधली.

कॉम्रेड बाबा यादव हे तेव्हा कोल्हापूर शुगर मिले येथे अॅसिडिक विभागात काम करत होते. या विभागातल्या कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी काम बंद आंदोलन सुरु केले होते. काहीही झाले तरी काम चालू होता कामा नये या उद्देशाने कामगार आळीपाळीने कारखान्याच्या दारावर पहारा देऊन बसायचे. कामगारांनी कारखान्याच्या मुख्य दाराला टाळे ठोकले आणि सगळे तिथेच बसले.

उसाच्या गाड्या आत सोडल्या जात नव्हत्या. हळूहळू दिवस जात होते तसेच कामावर न जाता दरवाज्यावर बसून राहण्याची सवय कामगारांच्या अंगवळणी पडत होती. पानसरे तिथे दिवसातून एकदा तरी फेरी मारायचे आणि त्यांचे भाषण होताच सगळ्या कामगारांच्यात नवीन जोश यायचा आणि आंदोलन परत नव्या नवलाईने धग पकडायचे.

व्यवस्थापन आणि संघटना यांच्यातला हा संघर्ष मात्र अधिक ताणला जात होता.

एक दिवस कॉम्रेड बाबा यादव यांच्या लक्षात आले, कामगारांचे प्रचंड हाल होत होते, आर्थिकरित्या सगळेच घाईला आले होते. एकामेकाकडे उसने पैसे मागून दिवस ढकले जात होते. हीच गोष्ट त्यांनी पानसरेंच्या कानावर घातली.

पानसरे आणि यादव मग एकदा कसबा बावडा आणि जवळपासच्या खेड्यातील कामगारांच्या घरी भेट देण्यास गेले. जठारवाडी येथील एका कामगाराच्या घरी पानसरे आणि यादव गेले. शेणाने सारवलेल्या घराची अवस्था वाईट झाली होती. त्या कामगाराने दोन्ही नेत्यांचा प्रचंड पाहुणचार करण्याचा प्रयत्न केला पण त्याचे होणारे हाल काही लपले नाहीत. अशीच अवस्था अनेक कुटुंबांची झाली होती हे पानसरेंच्या लक्षात आले.

त्यामुळे लवकरच हे आंदोलन संपल पाहिजे याची जाणीव त्यांना झाली होती, पण कारखाना व्यस्थापन मात्र काही झुकत नव्हत. अशातच एकदा सगळे कामगार दारावर बसले होते, बाजूच्या फुटपाथवर एका ओळीने ट्रक थांबले होते, सारा रस्ता सामसूम होता. तेवढ्यात रस्त्यावर एका अलिशान गाडीतून कारखान्याचा मालक येत असल्याचे कॉम्रेड काशीद यांच्या लक्षात आले त्यांनी बाजूला झोपलेल्या यादवांना उठवले.

यादव उठले तसे तडक त्या गाडीच्या दिशेने चालायला लागले. गाडीच्या जवळ जाताच त्यांनी मुठी आवळल्या आणि गाडीच्या बॉनेटवर या मुठी ते आपटू लागले. एवढ्यात सगळ्या कामगारांनी गाडी घेरली, गाडीत असणाऱ्या कारखान्याचा मालक रुईया याच्या विरोधात जोरात घोषणाबाजी चालू झाली. अखेर कशी बशी वाट काढत गाडी कारखान्याच्या कार्यालयापर्यंत पोहचली.

अखेरीस या घटनेनंतर संपाच्या एकशे चाळीसाव्या दिवशी व्यस्थापन नमले आणि त्यांनी चर्चेचे निमंत्रण दिले. या चर्चेत कामगारांच्या बर्याच मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. पानसरेंच्या या खूप लांबलेल्या आंदोलनाला यश आले खरे पण रुईया आपल्या गाडीवर हात मारणाऱ्या काशीद आणि यादव यांना विसरला नव्हता.

त्याने या मागण्या मान्य करतांना या दोघांवर कोर्टात केस चालवणार असल्याची अट घातली. ही अट मात्र कामगारांना मान्य नव्हती, सगळ्यांनीच याचा विरोध केला. मग कॉम्रेड पानसरे यांनी तातडीने निर्णय घेतला आणि आणि ते कामगारांना म्हणाले,

“ दोन माणसांसाठी ३४८ माणसांची अडचण का करायची? पुढे या दोघांची काळजी घेण्याची जबाबदारी आपण घेऊ, त्यांना काही कमी पडणार नाही याकडे लक्ष देऊ”

शेवटी १५० व्या दिवशी यादव आणि काशीद यांच्यावर खटला दाखल झाला नोकरी गेली आणि कामगारांचे १५० दिवसांचे आंदोलन मिटले.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांना हा निर्णय घेणे भाग होते. कारण बऱ्याच दिवस बिनपगारी असणाऱ्या कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हाल सुरु होते. त्यामुळे आंदोलनाने जास्त दिवस तग धरला नसता याच जाणीवेतून त्यांनी आपल्याच दोन सहकार्यांच्यावर खटला दाखल होत असतांना देखील कामगारांच्या हिताचा विचार आधी केला.

यामुळेच त्यांची कामगार नेता म्हणून असणाऱ्या आदर्श प्रतिमेची जाणीव होते.

असेच एक दुसरे उदाहरण त्यांच्यात असणाऱ्या वैचारिक दृष्टीची जाणीव करून देणारे आहे.

त्यांच्या सोबत असणारे त्यांचे एक विद्यार्थी मिलिंद यादव. कॉम्रेड यादव यांचे हे चिरंजीव. त्यांना पानसरे मानसपुत्र मनात आणि राजा अशी हाक मारत, ते सोबत असतांना घडलेला हा एक प्रसंग.

एकदा गोविंद पानसरे यांनी आपल्या पत्नीची तब्येत दाखवायला कोल्हापुरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पत्की यांची वेळ घेतली आणि  मिलिंद यादव यांना पुढे जायला सांगितले. नंतर पानसरे यादव यांच्या गाडीवर बसून निघाले. मध्येच त्यांनी यादव यांच्या खांद्यावर हात ठेवत लक्ष्मीपुरीती फोर्ड कॉर्नर जवळ असलेल्या बोळाच्या कोपऱ्यावर  गाडी थांबवण्यास सांगितली. गाडी थांबवून दोघे ही त्या बोळात शिरले, उजव्या बाजूला एका बऱ्याच जुन्या चाळीकडे बोट दाखवत पानसरे सांगू लागले,

“राजा! ती खोली आहे कि नाही ? तिथं मी वर्षेदिड वर्षे भाड्याने राहिलो. कोल्हापुरात आलो तेव्हा वेळ झाल्यामुळे मला बोर्डिंगला प्रवेश मिळाला नाही. मग तेव्हा हि तात्पुरती केलेली सोय.”

तुला एक गंमत सांगतो असे म्हणत ते थोडे पुढे गेले आणि एका उंबऱ्याकडे बोट करत सांगू लागले,

तिथं एके वेश्या राहायची. बऱ्याच लोकांच तिच्याकडे येण जण होत. रात्री उशिरा, अभ्यासाचा कंटाळा आला कि मी इथ खाली उभा राहयचो. तीच नटणं आणि तो सारा झगमगाट आकर्षक वाटायचा. येणारे जाणारे लोक माझ्याकडे अंगावरील विजार शर्टामुळे जरा टरकून बघायचे. कधी कधी मला हि भीती वाटायची.

एकदा रात्री बराच वेळ मी इथं बसलो होतो. ती बाई माझ्याजवळ आली. तसा मी एकदम ताडदिशी उभा राहिलो आणि घाबरलोही. ही काय म्हणते, याचा मी विचार करत तिच्याकडे पाहत होतो तितक्यात तिने दम भरला,

“ए तू इथं असा का उभा राहतो? असं तू पोरानं रात्री उभा नाही राहायचं. तू अभ्यास करायचा. शिकायचस. तिकड अजिबात पहायचं नाही. ते तुझ्यासाठी नाही चल जा, आता”

हे सांगून पानसरे यादव यांना म्हणाले,

“राजा लक्षात ठेव. जिच्याकडे समाज तुच्छतेने पाहतो, तिला अशी सामाजिक जाणीव असावी ही किती मोठी गोष्ट आहे ना”

याच वैचारिक विचारधारेने आणि सामाजिक दृष्टीकोणातून भारताला समाजासाठी लढणारा “अण्णा” नावाचा माणूस दिला. अशा अनेक विचारातून कॉम्रेड गोविंद पानसरे या माणसाबरोबरच त्यांच्या विचारांचे वलय आज ही जवंत आहे आणि तसेच राहील यात शंका नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.