आर.आर.पाटील आणि यशवंतराव चव्हाणांचा एक अफलातून किस्सा…

आर. आर. पाटील आणि यशवंतरावांच राजकारण समकालीन नव्हतं. त्यामुळे त्यांच्या दरम्यान एखादा किस्सा असू शकतो याची शक्यता देखील नाही. मात्र आम्हाला एक मजेशीर किस्सा सापडला.

तो देखील खुद्द आर.आर.पाटील यांनीच लिहला होता.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेषांक काढण्यात आला होता.

यामध्ये आर. आर. पाटलांनी यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी सांगितल्या आहेत.

आर. आर. आबा सांगतात की सहावीत असताना तासगावात यशवंतराव चव्हाणांच भाषण होतं. संपुर्ण गाव त्या भाषणासाठी जाणार होता. अंजनीतून जाणाऱ्या ट्रकमध्ये बसून आबांना देखील यशवंतरावांच्या भाषणासाठी जायचं होतं. सर्व मोठ्ठी माणसे असल्याने आई परवानगी देईल का नाही याची शंका होती. पण घरातून परवानगी मिळाली आणि आबा यशवंतराव चव्हाणांचे भाषण ऐकण्यासाठी तासगावला पोहचले.

अशाच आठवणी सांगत असताना आर. आर. आबा पुढील मज्जेशीर किस्सा सांगतात.

तेव्हा आर.आर. आबा नुकतेच जिल्हा परिषदेत निवडून आले होते. याच काळात त्यांचे सांगलीत वकिलीचं शिक्षण देखील चालू होतं. आबा समाजवादी कॉंग्रेसच्या बैल चिन्हावर निवडून आले होते.

त्याच वेळी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात दोन उभे गट पडले होते. पहिला गट चव्हाण साहेब आणि पवार साहेब असा होता तर दूसरा गट वसंतदादा पाटलांचा होता.

चव्हाणसाहेबांच्या गटात कै. धौंडीराम अण्णा, एम.डी. पवार, आटपाडीचे बाबासाहेब देशमुख, विट्याचे हणमंत पाटील, आष्ट्याचे विलासराव शिंदे होते. ही मंडळी वसंतदादांच्या विरोधात चव्हाण साहेबांचे काम करत होती.

या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण कराडला येणार आहेत म्हणून सांगली जिल्ह्याचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार होते. २५-३० जणांच्या या शिष्टमंडळात आबांचा देखील समावेश होता. अंकलखोपचे दिनकर बापू या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व करत होते.

२५-३० जणांचे हे शिष्टमंडळ चव्हाण साहेबांच्या कराड येथील विरंगुळा बंगल्यावर पोहचले. ही सर्व मंडळी चव्हाण साहेबांच्या बंगल्याच्या हॉलमध्ये बसली होती. चव्हाण साहेब आले आणि सर्वजण साहेबांसोबत बोलू लागले. प्रत्येकाची साहेबांसोबत ओळख होती.

या सर्वांमध्ये आर.आर. आबा नवखे असल्याने त्यांची चव्हाण साहेबांसोबत ओळख असण्याचा प्रश्नच नव्हता.

इतक्यात चव्हाण साहेबांच लक्ष त्यांच्याकडे गेलं. आबांनी साहेबांना स्वत:ची आर.आर. म्हणून ओळख करुन दिली. काय करतो म्हणून विचारल्यानंतर LLB सांगितले. चव्हाण साहेबांनी स्मितहास्य केलं.

उपस्थितांनी आर.आर. पाटील हे नुकतेच जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत असं चव्हाण साहेबांना सांगितलं.

त्यानंतर मुख्य चर्चा सुरू झाल्या. हॉलमध्ये २५-३० लोक बसले होते. चव्हाण साहेब वेगवेगळ्या चर्चा करत होते. याच काळात स्वयंपाकघरातून शिपाई आला व जेवणाची ताटे वाढली असल्याचं चव्हाण साहेबांना सांगितलं.

चव्हाण साहेबांना जेवायला जायचं होतं पण इतक्या माणसांना सोडून कसं जायचा हा प्रश्न होता. ही गोष्ट उपस्थितांच्या देखील लक्षात आली व ते म्हणाले,

साहेब तूम्ही जेवण करुन घ्या तोपर्यन्त आम्ही थांबतो.

आत्ता साहेब जेवणासाठी उठले. पण एक शिष्टाचार म्हणून साहेब उठता उठता सर्वांकडे कटाक्ष टाकत म्हणाले,

तूम्ही सर्वजण जेवला का?

चव्हाण साहेबांच्या या प्रश्नावर सर्वांनी होकार दिला पण आर.आर.पाटील नाही म्हणाले.

ही अशक्यकोटीतली गोष्ट होते. शिष्टाचार म्हणून विचारलेल्या प्रश्नाला आबा नाही म्हणाले होते. आबा सांगतात की मला तेव्हा लक्षातच आलं नाही की, शिरस्त्याप्रमाणे होय होय करुन साहेबांना जेवणाला जावून द्यायचं होतं. माझ्या सवयीप्रमाणे मी खरं बोलून गेलो.

त्यानंतर चव्हाणसाहेब आतमध्ये गेले. शिपाई पुन्हा हॉलमध्ये आला आणि आबांना जेवायला बोलवलं आहे हा निरोप सांगितला.

त्यानंतरचा सीन असा होता की,

नवखे जिल्हापरिषद सदस्य असणारे आर.आर. आबा केंद्रिय मंत्री यशवंतराव चव्हाणांसोबत टेबलवर जेवण करत होते तर जिल्ह्याचे सर्व प्रमुख नेते हॉलमध्ये ताटकळत उभा होते.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.