बांग्लादेश मुक्ती संग्रामात मोदी, संघाची भूमिका काय होती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. बांगलादेश स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी ते तिथं गेले आहेत. या दरम्यान मोदींनी बोलताना एक अतिशय भावनात्मक आठवण सांगितली ती म्हणजे,

बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझं वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात देखील गेलो होतो.

अर्थात नरेंद्र मोदी तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते, आणि पंतप्रधान पदी होत्या इंदिरा गांधी. पण संघाने अनेक ठिकाणी दावा केला आहे की, हे परस्पर विरोधी विचार बाजूला ठेऊन आम्ही देश हितासाठी पुढे आलो होतो.

त्यामुळे इतिहासात त्यावेळी बांगलादेशच्या या मुक्ती संग्रामामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका नेमकी कशी होती हे बघणं महत्वाचं ठरतं. 

संघाच्या भूमिकेची सुरुवात होते, सरसंघचालक मोहन भागवतांनी सांगितलेल्या एका आठवणीनं. ही आठवणं आहे एका १५ वर्षाच्या स्वयंसेवकाची. ज्याने १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात आपल्या प्राणांची बाजी लावली होती.  

सरसंघचालक सांगतात, आदिवासी समुदायातील किशोर नावाचा मुलगा पाकिस्तान (सध्याचं बांगलादेश) ला लागून असलेल्या सीमेजवळ राहत होता. त्याने सीमेवर पाकिस्तानी सैनिकांची हालचाल बघितली, ते सीमेच्या आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. हि सर्व माहिती पळतं येऊन किशोरनं सीमेवरच्या जवानांना दिली.

तेव्हा जवानांनी त्याला गन पाउडरनं भरलेलं एक बॉक्स सीमेला लागून असलेल्या चौक्यांपर्यंत पोहचवण्यास मदत मागितली. त्या अवघड परिस्थितीमध्ये त्यानं आपल्या जीवाची पर्वा न करता सैनिकांची मदत केली, आणि पुढं गेल्यावर पाकिस्तानच्या सैनिकांनी त्याला गोळी मारली.

आज देखील पश्चिम बंगलाच्या रायगंज जिल्ह्यात त्याच्या नावाचं शहीद स्मारक उभं असल्याचं भागवत सांगतात.

पण त्याही आधी म्हणजे युद्धाची घोषणा होण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाने १७ ऑक्टोबर १९७१ साली एक प्रस्ताव घोषित केला. याच शीर्षक होतं, 

‘बंगलादेश के प्रति भारत का कर्तव्य’

या प्रस्तावाअंतर्गत सांगितलं होतं की, जर पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याचं धाडस करत असेल तर शासन हिम्मतीने आणि दृढतेचा परिपाक देत भारतीय सेनेच्या वीर आणि पराक्रमी जवानांच्या साथीनं पाकिस्तानला असा काही धडा शिकवावा की, पुन्हा काही असं करण्याचं त्याच धाडस व्हायला नको.

पुढे जेव्हा ३ डिसेंबर १९७१ रोजी भारतानं प्रत्यक्ष युद्धाची घोषणा केली तेव्हा तत्कालीन सरसंघचालक माधवराव गोळवलकर अर्थात गुरुजींनी संघाच्या स्वयंसेवकांना देश सेवेसाठी पुढे येण्यास सांगितलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की,

शत्रूनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे, आपल्यासाठी राष्ट्रहित सर्वोतोपरी आहे. त्यासाठी आपल्याला व्यक्ती, पक्ष आणि विचार गौण आहेत. 

त्यामुळे आपला देश युद्धात ओढला गेला आहे, अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक स्वयंसेवकांनी आणि संघ प्रेमी व्यक्तीनं देशाच्या सुरक्षा कार्यात सरकारची मनापासून मदत करायला पुढे यायला हवं.

संघाच्या स्वयंसेवकांनी यानंतरच्या संपूर्ण युद्ध काळात ठिकठिकाणी आपली सेवा दिली होती. सोबतच नागरिकांच्या मदतीने अनेक ठिकाणांची सुरक्षा केली होती. स्वयंसेवकांनी पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल अशा ठिकाणी नागरिकांच्या मदतीनं जखमींची सेवा केली होती. 

सोबतच जखमी सैनिकांसाठी रक्तदान करण्यासाठी स्वयंसेवकांनी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन करतं सैनिकांना कुठेही रक्त कमी पडू दिलं नव्हतं. 

पुढे युद्ध चालू असताना ७ डिसेंबर १९७१ रोजी विजयवाडा मध्ये दिलेल्या भाषणादरम्यान पाकिस्तान करत असलेल्या सततच्या आक्रमणावर गोळवलकर गुरुजी म्हणाले होते,

सातत्यानं युद्ध करण्याच्या भूमिकेमागचं कारण म्हणजे बाराशे वर्षांपूर्वीपासून चालत आलेलं अखंड भारतातला मुस्लिम देश बनवून त्याला गुलाम करायचं स्वप्न. त्याच्यावर आपलं शासन प्रस्थापित करायचं. सद्य स्थितीमधील युद्धाच्या पाठीमागील भूमिका देखील हीच आहे. बाराशे वर्षापासून चालत आलेल्या या आक्रमण कथेचा हा एक अध्याय आहे.

पुढे बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर गोळवलकर गुरुजींनी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि तत्कालीन संरक्षण मंत्री जगजीवन राम यांना अभिनंदन करणार पत्र लिहिलं होतं.

इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणाले होते,

देशाची एकात्मता, परिस्थितीच वास्तविक मूल्यांकन, देशाचा स्वाभिमान असाच अबाधित राहो. केवळ संकटकाळातच नाही तर प्रत्येकवेळी याची गरज आहे. आपला देश सदैव एकत्रित ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कायमच आपल्या सोबत आहे, आणि पुढे देखील राहिलं. तुमच्या नेतृत्वात भारताचा गौरव अशाच प्रकारे वाढो.

तर जगजीवन राम यांना लिहिलेल्या पत्रात गुरुजी म्हणाले होते,

तुमच्या नेतृत्वात सैन्याच्या तिन्ही विभागांनी अभिनंदनीय पराक्रम गाजवत बांगलादेशला स्वतंत्र केलं आहे. तिथल्या लोकांना आपलं आयुष्य स्वतंत्रपणे योजण्याची आश्वासक संधी तुम्ही मिळवून दिली आहे.

पुढे युद्धानंतर गोळवलकर गुरुजी कोलकात्यामध्ये युद्धात शहीद झालेल्या भारतीय सेनेच्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी देखील गेले होते. तेव्हा ते म्हणाले होते, 

या युद्धात ज्या भारतीय सैनिकांनी विजय मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली त्या सगळ्यांच्या स्मृतीमध्ये कृतज्ञतेनं नतमस्तक होणं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या बलिदानाने फक्त देशाची रक्षाच झालेली नाही तर आपल्या देशाचा गौरव देखील वाढला आहे, आणि जगात सिद्ध केलं कि आपण एक शांतताप्रिय देश आहोत.

पण त्यानंतर झालेल्या शिमला करारावरून मात्र जनसंघ आणि एकूणच संघाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. 

त्यावेळी जनसंघाचे नेते असलेले लालकृष्ण आडवाणी जाहीर सभेत म्हणाले होते की,

इंदिरा गांधी ने कोरे शब्दजाल में फँसकर एक स्वर्णिम अवसर को गँवा दिया

त्या सोबतच लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या चरित्रात स्पष्टपणे लिहीत एक समज दूर केला आहे की, अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना युद्धाच्या विजयावर कधीही दुर्गा म्हणून संबोधले नव्हते. स्वतः वाजपेयींनी एका लेखात याचा उल्लेख करतं म्हणाले होते की, मी असं कोणताही वाक्य म्हणालेलो नाही. माहित नाही या पेपरवाल्यानी कधी माझ्या तोंडात हे वाक्य टाकलं ते.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. Sandeep Sutar says

    यामधे संघाने बांगलादेश निर्मिती साठी एखादे आंदोलन केले व त्यात संघाच्या स्वयंसेवकांना अटक झाल्याचा उल्लेख नाही. म्हणजे मोदींनी सत्याग्रह व अटक हि एक मोठी थाप मारली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.