उस्मानाबादच्या १५० वेठबिगार कामगारांना त्यांच्यामुळे जीवनदान मिळाले होते

आर्य समाजाचे नेते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि हरियाणाचे माजी शिक्षणमंत्री स्वामी अग्निवेश यांचे शुक्रवारी संध्याकाळी निधन झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वामी अग्निवेश यांनी यातील जवळपास ४० वर्ष बंधुआ मजूरांचा म्हणजेच वेठबिगारी प्रश्न मार्गी लावण्यासाठी खर्च केली. आधुनिक भाषेत गुलामी असेही म्हटले जाऊ शकते.

१९८१ साली त्यांनी मजुरांची वेठबिगारीतून सुटका व्हावी यासाठी बंधुआ मुक्ती मोर्चाची स्थापना केली होती.

कायदेशीररीत्या भारतातून १९७६ सालीच वेठबिगारीची पद्धत संपुष्टात आली होती पण काही राज्यात ही पद्धत होती. त्याविरोधात त्यांनी जनजागृती आणि आंदोलन सुरू केलं होतं. १९८६ साली बाल मजुरी प्रतिबंध कायदा मंजूर झाला होता. त्यावेळी बंधुआ मुक्ती मोर्चानं दिलेल्या शिफारसींची दखल घेण्यात आली होती.

८०च्या दशकात त्यांच्याच मदतीने उस्मानाबादमधील जवळपास१५० वेठबिगारांना जीवनदान मिळाले होते.

याबाबत या घटनेचे साक्षीदार असलेले जेष्ठ साहित्यिक आणि माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या फेसबुक पेजवर हा प्रसंग सांगितला आहे.

लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरवातीच्या काळ होता.

ते उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. त्यावेळी भूममधील काही दगडफोडीचे काम करणाऱ्या पाथरवट समाजाच्या मजूरांना Hindustan Construction company ने वेठबिगार करून ठेवले असल्याचे एका निनावी पत्रावरून समजले.

तेव्हा ते थेट या मजूरांना सोडावून आणण्यासाठी हरियाणाच्या सुराजकुंडच्या दगडखाण परिसरात गेले.

त्यांची सुटका करून दिल्लीला आणणे व ट्रेनने परत नेणे हे मोठे जोखमीचे काम होते. कारण कंपनीचा धाक व स्थानिक प्रशासनासोबतची कंपनीची झालेली अभद्र युती.

पोलीस व स्थानिक प्रशासन त्यांना सहकार्य करत नव्हतं म्हणून त्यावेळी त्यांनी वेठबिगार प्रथेविरुद्ध काम करणाऱ्या स्वामी अग्निवेश यांचा फोन नंबर मिळवून संपर्क साधला.

त्यांच्याच मदतीने लक्ष्मीकांत देशमुख यांना १५० कामगारांना बंधमुक्त करून परत आणता आलं.

स्वामी अग्निवेशजी सांगतात, भारतात असंघटीत क्षेत्रात जेवढे कामगार काम करतात त्या सर्वांना वेठबिगार अर्थात आधुनिक गुलाम ही व्याख्या लागू होते. २०१८ पर्यंत भारतात जवळपास ५० कोटी लोक असंघटीत क्षेत्रात काम करत होते.

गांधीजींनी केलेल्या चंपारण्य सत्याग्रह १०० वर्ष पुर्ण झाली पण भुमिहीनता, वेठबिगारी, गरिबी आणि लाचारी हे प्रश्न आजही जसेच्या तसे आहेत. असे स्वामींनी एका मुलाखतीमध्ये सांगितले.

गेली काही वर्षे स्वामी अग्निवेश राजकारणाच्या चर्चेत आले होते. अण्णा हजारे यांच्या इंडिया अंगेंस्ट करप्शन या मोहिमेत त्यांचा सहभाग होता. आपल्या रोखठोक मतांमुळे स्वामी अग्निवेश यांच्या बद्दल अनेकदा वाद देखील झाले, त्यांना मारहाण होण्यापर्यंत प्रकार झाले.

अनेकदा टीव्ही मीडिया त्यांच्या राजकीय मतांबद्दल प्रकाशझोत टाकत राहिली मात्र त्यापूर्वी स्वामी अग्निवेश यांनी वेठबिगारी कामगारांसाठी निस्पृहतेने केलेले काम मात्र दुर्लक्षित राहिले हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.