संघ सोडून गेलेल्या माणसाला डॉ. हेडगेवारांनी थेट सरसंघचालक बनवलं.

१९२५ ची विजयादशमी. काँग्रेसच्या खिलाफत चळवळीला मुस्लिमांचे लागुंलचालन करण्याचे धोरण असे म्हणत डॉ. केशव हेडगेवार यांनी पक्षाला रामराम ठोकला, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. भारतात हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन संघाची वाटचाल सुरु झाली.

सुरुवातीच्या काळात अनेक तरुण मुलं संघाशी जोडली गेली. संघाचं मूळं नागपुरात असल्यामुळे साहजिकच यात विदर्भातील मुलांची संख्या जास्त होती. जेव्हा ही तरुण मुलं उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात, विद्यापीठांमध्ये जात असतं, तेव्हा संघाचा देखील विस्तार सुरु झाला. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रचारक तयार होऊ लागले. नवीन शाखा सुरु झाल्या.

असेच एक तरुण स्वयंसेवक होते, प्रभाकर दानी. ते बनारस हिंदू विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेले होते. इथल्या शाखेत प्रभाकर यांनी एकदा आपल्या झुलॉजीच्या प्राध्यापकांना आमंत्रण दिलं. हे प्राध्यापक आपल्या विषयासोबतच दर्शन आणि इतिहासावर पण चर्चा करत असतं.

गुरुजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या प्राध्यापकांचं नाव होतं माधवराव गोळवलकर. 

एका कामासाठीच्या निमित्ताने डॉ. हेडगेवार यांची गोळवलकरांसोबत बनारसमध्ये भेट झाली. या भेटीमध्ये हेडगेवार यांना सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या या गुरुजींच्या विचारांनी भारावून टाकले. दोघांनाही जाणवले की आपली कार्यपद्धती, आपले विचार एकच आहेत.

पुढे हेडगेवार यांनी गुरुजीना एका कार्यक्रमासाठी नागपूरला बोलावून घेतले. एका वर्षात कुटुंबाच्या आग्रहाखातर गोळवलकर स्वतःच प्राध्यापकाची नोकरी सोडून नागपूरमध्ये दाखल झाले. इथून त्यांचा संघाशी असलेला घरोबा देखील वाढला. गुरुजींना सातत्याने नवनवीन आणि महत्वाच्या जबाबदाऱ्या देऊन हेडगेवार भविष्यासाठी तयार करत होते.

पण हेडगेवार यांच्या या प्रयत्नांना झटका बसला तो १९३६ मध्ये. त्यावर्षी गोळवलकरांनी ‘लॉ’ ची पदवी घेतली होती. पण त्याच दरम्यान त्यांना संघापेक्षा अध्यात्मामध्ये रुची निर्माण झाली. 

गोळवलकरांनी कुटुंब आणि संघाला रामराम केला आणि योग-ध्यानधारणेसाठी बंगलला गेले. स्वामी विवेकानंद यांचे मोठे भाऊ स्वामी अखंडानंद यांचं शिष्यत्व स्वीकारलं. याच काळात त्यांनी आपली दाढी वाढली. पण त्यानंतर वर्षा-दीड वर्षातच स्वामीजींच निधन झालं आणि गोळवलकर पुन्हा माघारी परतले.  

गोळवलकर जरी संघ सोडून गेले होते, तरी डॉ. हेडगेवर यांचा त्यांचावरील विश्वास तसूभर देखील कमी झाला नव्हता. त्यांनी पुन्हा एकदा गोळवलकरांना भविष्यातील जबाबदारीसाठी साठी तयार करायला सुरु केलं.

२० जून १९४० चा दिवस. एका खोलीत डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर उपस्थित होते. त्यावेळी हेडगेवार अंथरुणाला खिळून होते. आपल्या आजरपणाच्या काळात त्यांनी गोळवकरांना बोलवून घेतलं होतं. त्यादिवशी थरथरत्या हातांनी ३४ वर्षाच्या गोळवलकरांच्या हातात एक चिट्ठी दिली. त्यात लिहिलं होतं,

तूम्ही माझ्या शरीराला डॉक्टकरांच्या हवाली करण्याआधी मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की इथून पुढे संघटनेला चालवण्याची सगळी जबाबदारी तुझी असेल.

त्याच्या दुसऱ्या दिवशीच डॉ. हेडगेवार यांचं निधन झालं. त्यांच्या नंतर माधवराव सदाशिवराव गोळवलकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक बनले. 

१३ दिवसानंतर जेव्हा हि चिट्ठी सार्वजनिक झाली तेव्हा अनेकांना धक्का बसला. लेखक वॉल्टर एंडरसन आणि श्रीधर दामले यांनी आपल्या ‘द ब्रदरहुड इन सॅफरन’ मध्ये देखील हा प्रसंग लिहिला आहे. यात ते म्हणतात,

संघाचे सर्व वरिष्ठ नेत्यांना आशा होती की, हेडगेवार आपला उत्तराधिकारी म्हणून एक अनुभवी आणि वरिष्ठ व्यक्तिमत्वाची निवड करतील. यात एक नाव कायम आघाडीवर होतं, ते म्हणजे आप्पाजी जोशी.

पण अखेरीस सगळ्यांचं धक्का देत डॉ. हेडगेवार यांनी संघ सोडून गेलेल्या एका व्यक्तीला थेट सरसंघचालक बनवलं होतं. 

त्यांच्या ३३ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात संघाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. पण त्यासोबतच गांधी हत्येचा आरोप देखील झाला. त्यातून निघाल्यानंतर सरदार पटेल यांच्या सांगण्यावरून संघाचं लिखित संविधान तयार झालं. त्यांच्याच काळात भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विश्व हिंदू परिषद या संघटनांची सुरूवात झाली. सोबतच श्यामाप्रसाद मुखर्जीच्या नेतृत्वातील जनसंघ देखील.

हेडगेवार यांची चिट्ठी देऊन उत्तराधिकाऱ्याचं नाव घोषित करण्याची ही पद्धत गोळवलकरांनी देखील पुढे चालू ठेवली. १९७३ मध्ये गोळवलकरांच्या मृत्यूनंतर स्वयंसेवकांच्या नावाच्या तीन चिट्ठ्या होत्या. यातील एक नाव होतं, बाळासाहेब देवरस.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.