युनायटेड नेशन्समध्ये भारताचा आवाज बुलंद करणाऱ्या रुचिरा कंबोज…

संयुक्त राष्ट्र संघटनेत भारतातील लोकशाही आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याबद्दल प्रश्न विचारल्यावर, “लोकशाहीमध्ये काय करायचं आणि काय नाही हे कुणीही आम्हाला सांगायची गरज नाही.” असं प्रखर वक्तव्य  केल्या नंतररुचिरा कंबोज चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या संदर्भातली माहिती शोधली जात आहे.

आज रुचिरा कंबोज जगभरात भारताचा डंका वाजवतायत

या रुचिरा कंबोज यांचं मुळ नाव रुचिरा पाटनी असं आहे. ३ मे १९६४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे भारतीय सैन्यात अधिकारी होते तर आई दिल्ली विद्यापीठात संस्कृत भाषेच्या प्राध्यापक. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्या सिव्हिल सर्विसेसमध्ये उतरल्या. १९८७ च्या सिव्हिल सर्विस बॅचच्या त्या अधिकारी आहेत. महिलांमधून त्या पहिल्या आल्या होत्या. तर फॉरेन सर्विसेसमध्ये त्या भारतातून प्रथम आल्या होत्या.

यानंतर त्यांची करीअरला सुरूवात झाली. १९८९ ते १९९१ या काळात त्यांनी फ्रांसच्या पॅरीसमध्ये अँबेसीच्या सहसचिव म्हणून काम केलं. मराठी म्हण आहे, ‘देश तसा वेष अन् गाव तशी भाषा’ हे लक्षात घेऊन त्यांनी स्वत: फ्रेंच भाषा शिकून घेतली आणि त्यांची पदोन्नती. फ्रांसमध्ये काम केल्यानंतर त्या भारतात परतल्या.

भारतात येऊन त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोप पश्चिम विभागात सहसचिव म्हणून काम केलं. परराष्ट्र मंत्रालयाचा हा विभाग फ्रान्स, यूके, बेनेलक्स, इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांसंदर्भातील धोरणांवर काम करतो. १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली.

१९९६-१९९९ पर्यंत, त्यांनी मॉरिशसमध्ये आर्थिक आणि व्यावसायिक विभागाच्या सचिव आणि पोर्ट लुईस इथल्या भारतीय उच्चायुक्तालयात प्रमुख म्हणून काम केलं. १९९७ साली त्यांना आय. के. गुजराल हे साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना नियोजनाची जबाबदारी रुचिरा यांनी पार पाडली.

त्यानंतर भारतात येऊन त्यांनी जून १९९९ ते मार्च २००२ पर्यंत परराष्ट्र मंत्रालयात उपसचिव आणि नंतर परराष्ट्र सेवा कर्मचारी आणि कॅडरच्या प्रभारी संचालक म्हणून काम केलं

यानंतर, रुचिरा कंबोज यांना २००२-२००५ या काळात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रात भारताच्या कायमस्वरूपी मिशनमध्ये काउंसीलर म्हणून नियुक्त करण्यात आलं. जिथे त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता राखणे, सुरक्षा परिषद सुधारणा, मिडल ईस्ट क्रायसीस यांसह विविध राजकीय समस्या हाताळल्या.

२०११-२०१४ या काळात त्यांनी भारताच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल पदाची जबाबदारी सांभाळली. भारत सरकारकडून पहिल्यांदा एखाद्या महिलेला या पदावर नेमण्यात आलं होतं. तसंच आजवरच्या एकमेव महिला आहेत.

मग, त्यांनी कॉमनवेल्थच्या महासचिव कार्यालयाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण कार्यक्रमावेळी विशेष जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

नालंदा महाविहार, चंदीगडचे कॅपिटल कॉम्प्लेक्स आणि खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान ही भारतातील तीन ठिकाणं युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज लिस्ट मध्ये सामील झाली ती २०१६ साली. या कालावधीमध्ये रुचिरा कंबोज या युनेस्कोमध्ये भारताच्या अँबेसीडर होत्या. त्यामुळे, ही नावं यादीत समाविष्ट झाल्याचं श्रेय रुचिरा कंबोज यांना दिलं जातं.  २०१७ मध्ये त्यांची दक्षिण आफ्रिकेतील भारताच्या उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

२१ जून २०२२ रोजी त्यांची युनायटेड नेशन्समध्ये भारताच्या अँबेसीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती झाल्यानंतर आतापर्यंत त्यांनी युनायटेड नेशन्समध्ये भारताची बाजू खंबीरपणे मांडलीय. भारताच्या समर्थनात किंवा भारताविरुद्ध बोलणाऱ्यांवर त्यांनी बेधडकपणे वक्तव्य केलीयेत.

भारतातील लोकशाही आणि पत्रकारितेतील स्वातंत्र्याबद्दल प्रश्न विचारल्यावर, “भारत हा सर्वात जुन्या देशांपैकी एक आहे हे तुम्हाला माहित आहे. भारतातील लोकशाहीची मुळं जवळपास अडीच हजार वर्ष जुनी आहेत.” असा दाखला देत “लोकशाहीमध्ये काय करायचं आणि काय नाही हे भारताला कुणीही सांगु नये” असं बेधडक वक्तव्य त्यांनी केलं.

ऑक्टोबर महिन्यात संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनामध्ये पाकिस्तानने काश्मीरच्या विषयावरून काही वक्तव्ये केल्यानंतर “यात आश्चर्याची गोष्ट नाही की, पुन्हा एका शिष्टमंडळाने या मंचाचा गैरवापर करण्याचा आणि माझ्या देशाविरुद्ध चुकीचे आणि निरर्थक टिप्पणी करण्याचा प्रयत्न केलाय.

वारंवार खोटं बोलणारी ही मानसिकता सामूहिक तिरस्कार आणि सहानुभूतीसाठी पात्र आहे.” असं थेट वक्तव्य त्यांनी केलं होत. जागतिक मंचावर भारताची भक्कम बाजू मांडणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

-हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.