वाजपेयींनी युनोमधलं हिंदीतलं भाषण ऐकून १२ देशातील मंत्री त्यांना भेटायला आले होते
आजही अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव भारतातील सर्वोत्तम पंतप्रधानापैकी एक म्हणून घेण्यात येते. मात्र त्यापूर्वी १९७७ मध्ये अटल बिहारी वाजपेयी हे जनता पक्षाच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते. जनता पक्षाचे सरकार केवळ २ वर्षच टिकले. अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळले होते.
मागच्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७६ व्या आमसभेत हिंदीतून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी, लोकशाही मूल्ये, भारताची आर्थिक प्रगती, करोना विषाणू साथीनंतरची जागतिक अर्थव्यवस्था, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, अफगाणिस्तानातील राजकीय उलथापालथ अशा अनेक विषय मांडले होते .
पण मोदींच्या आधी देखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत हिंदीतून भाषण देण्याचा मान अटल बिहारी वाजपेयी यांना जातो. आणि विशेष म्हणजे त्यांच्या भाषणानंतर १२ देशातील मंत्री त्यांना भेटायला आले होते.
त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे जनता सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते.
असे असले तरीही अटल बिहारी वाजपेयी यांनी २ वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा उल्लेख अजूनही करण्यात येतो.
आमसभेतील भाषणानंतर त्यांनी शेजारी देशांशी संवाद वाढवला होता.बांग्लादेशसोबत गंगा पाणीवाटप करार झाला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पाकिस्तानकडे वळविला होता. पाकिस्तानसोबत चांगले संबंध कसे राहतील यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुद्धा केले होते.
संयुक्त राष्ट्रसंघाचे ३२ वे वार्षिक अधिवेशन २० सप्टेंबर १९७७ रोजी सुरु झाले होते. अटल बिहारी वाजपेयी यांना आमसभेत भाषणासाठी केवळ ४ मिनिटे मिळाली होती. भाषण झाल्यानंतर इतर देशातील प्रतिनिधींनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली होती.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणातील मुद्दे
मी भारतीय जनतेच्या वतीने राष्ट्रसंघासाठी शुभेच्छा घेऊन आलो आहे. भारताचा राष्ट्रसंघावर अजोड विश्वास आहे.
भारतात नवे सरकार येऊन अवघे सहा महिने झाले आहेत. पण आम्ही मुलभूत अधिकार परत प्रस्थापित केले आहेत. देशात भय आणि दहशत संपली आहे. आता आम्ही भारताची राज्यघटना अशी मजबूत करू की, पुन्हा मुलभूत स्वातंत्र्यावर कधीही गदा येणार नाही. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना खूप प्राचीन आहे आणि तिच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या विश्वकुटुंबात मला महासत्ता होणाऱ्या देशांपेक्षा सामान्य माणसाची प्रतिष्ठा अधिक मोलाची वाटते असे ते म्हणाले होते.
तसेच जनसंघाच्या भूमिकेच्या विरोधात जात इस्रायला सुनावले होते. ते म्हणाले होते, इस्राइलने गाझा पट्टीत ज्या वसाहती वसवून आक्रमण चालविले आहे, ते त्वरित थांबवायला हवे आहे. संयुक्त राष्ट्र संघाने हे आक्रमण खपवून घेऊ नये अशा शब्दात आपली बाजू मांडली होती.
तसेच गरज पडली तर जिनिव्हात पुन्हा नव्याने परिषद घ्या; पॅलेस्टिनी मुक्ती आघाडीला तिचे निमंत्रण द्या. नाहीतर केवळ पश्चिम आशिया नव्हे, तर जगभर या संकटाचे पडसाद उमटतील. भारत अणुसत्ता नाही. असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला होता.
जनसंघाच्या विरोधात भूमिका मांडत अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की, आम्हाला अणुसत्ता बनायचे नाही. उलट, मानवाच्या हितासाठी जो त्याग करावा लागेल, तो करताना भारत मागे राहणार नाही. असे ठाम मत व्यक्त केले होते.
भाषण संपवून अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या खोलीत परत आले होते. त्यानंतर १२ पेक्षा अधिक देशातील मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली होती. तसेच भाषणात मांडण्यात आलेली विश्वशांतीची कल्पना आवडली असल्याचे सांगितले होते. याचा अर्थ अटल बिहारी वाजपेयी हिंदीत बोलले असले तरीही भारताच्या भावना त्यांच्या पर्यंत पोहोचल्या होत्या.
मात्र वाजपेयी यांनी आमसभेत भाषणापूर्वी करण्यापूर्वी परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांनी त्यांना आग्रह केली होती की, हिंदीतून भाषण करू नये. हिंदीतून भाषण केल्याने भारताचे म्हणणे जगात नीट पोहोचणार नाही. अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. वाजपेयी यांनी मात्र हा आग्रह मान्य केला नाही.
महत्वाचे म्हणजे जनसंघाच्या भुमिकेविरोधात वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात म्हणणे मांडले होते. मात्र हिंदीतून भाषण केल्यामुळे देशभर अभिमानाची लहर पसरली होती. त्यांनी गाझापट्टी किंवा अणुबॉम्ब याविषयी केलेल्या प्रतिपादनावरून टीका झाली नाही. तसेच वाजपेयी यांनी हिंदीत बोलण्याचा निर्णयाचे मनापासून समाधान वाटले अशी प्रतिक्रिया दिली होती.
हे ही वाचा भिडू.
- नेहरू, वाजपेयी की मोदी सर्वात जास्त पुस्तके कुणी लिहली ?
- म्हणून मोदी विरोधकांना देखील नमो अगेन पटतं.
- ममता बॅनर्जीसारखा कायम धगधगणारा ज्वालामुखी वाजपेयींच्या समोर शांत झाला
- एका भाषणामुळे अटल बिहारी वाजपेयी यांच मंदिर बांधण्यात आलं.