ऑपरेशन गंगाची कसरत पाहिली की नेहरू, गांधींनी राबवलेली जिगरबाज ऑपरेशन्स आठवतात

रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये भारतीय विद्यार्थ्यांची खूप फरफट होतीये. यामध्ये भारत सरकार विद्यार्थ्यांना आपल्या मायदेशी परत आणण्यात अयशस्वी ठरत असल्याचा आरोप केला जातोय. मात्र भारतीय सेनेने वारंवार सिद्ध केलंय की, त्यांचा नाद करायचा नाय. तेही एक नाही तर अशा दहा घटनांमधून हे सिद्ध झालंय.

जागतिक पातळीवर कोणत्याही देशावर संकट आलंय तेव्हा तिथे शांतता प्रस्थापित करण्यामध्ये भारताचा मोठा वाटा राहिलाय. त्याचमुळे भारतीय सैन्याचं महत्त्व संयुक्त राष्ट्रसंघानं देखील मान्य केलंय.

या सर्व घटना दुसऱ्या महायुद्धानंतरच्या आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा केव्हा परकीय देशात कोणत्याही वादामुळे असंतोष निर्माण होऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी इतर देशांची मदत घेण्याची गरज भासली तेव्हा भारत नेहमीच आघाडीवर राहिला. भारताच्या सैनिकांनी आपल्या कर्तुत्वाने, धाडसाने आणि जिद्दीने मानाचं स्थान प्राप्त केलंय.

सुरुवात करुया कोरियापासून..

दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियाची फाळणी होऊन दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया असे दोन देश तयार झाले. या दोन राष्ट्रांमध्ये १९५० मध्ये मोठं युद्ध पेटलं. या लढाईची तीव्रता इतकी होती की, जवळपास पन्नास हजार सैनिक मृत्युमुखी पडले तर सुमारे पाच लाख सैनिक जखमी झाले. तेव्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने प्रयत्न केले आणि त्यानुसार १९५३ मध्ये युद्धबंदी झाली.

त्यावेळी तटस्थ राष्ट्रांची एक कार्यकारिणी तयार होऊन सुमारे २३ हजार युद्धकैद्यांची त्यांच्या राष्ट्रांत पाठवणी करण्याची जबाबदारी भारतावर देण्यात आली.  मात्र हे इतकं सोपं नव्हतं. या युद्धकैद्यांपैकी बहुतांश कैदी आपल्या देशात जाण्यास तयार नव्हते. अशात मेजर जनरल थोरात यांच्या नेतृत्वाखाली भारतीय फौजांच्या एका ब्रिगेडने जिद्दीनं ही कामगिरी फत्ते केली. 

इंडोचायना

मूळ फ्रेंचांची सत्ता असलेल्या या देशात दुसऱ्या महायुद्धानंतर देशांतर्गत युद्ध सुरू झालं आणि व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया अशी राष्ट्र तयार झाली. 

अशात १९५४ मध्ये युद्धबंदी झाली आणि तिच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त राष्ट्र संघाने प्रत्येक राष्ट्रासाठी एक असे तीन कार्यकारी गट तयार केले. ज्यामध्ये भारतीय सैनिकांनी नेतृत्व केलं. मेजर जनरल धारगळकर, मेजर जनरल पी. एस. ग्यानी आणि मेजर जनरल सदानंद सिंग यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कठीण परिस्थितीत भारतीय फौजांनी युद्धबंदी आमलात आणली. तसंच १९७० पर्यंत शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं कामही पूर्ण केलं. 

मध्यपूर्व राष्ट्र

दुसऱ्या महायुद्धानंतर इजिप्त आणि अरब राष्ट्र यांच्या मनात इस्राईल बद्दल लय खुन्नस होती. अशातच इस्राईलने इजिप्तच्या काही भागावर वर्चस्व स्थापन केलं. त्यात हात धुतले ते फ्रान्स आणि ब्रिटन यांनी. फ्रान्स आणि ब्रिटनने आपली मोठी फौज तिथं पाठवली. तेव्हा फ्रान्स, ब्रिटिश, इस्राईल फौजांच्या माघारीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाने एक आणीबाणी फौज तयार केली. यामध्ये भारताने मोठा वाटा उचलला. पहिले पोर्ट सैद नंतर गाझापट्टीत भारतीय फौजांनी आपलं कार्य चोखपणे पार पाडलं. मात्र यात १४ भारतीय सैनिकांना हौतात्म्य पत्करावं लागलं.

लेबेनॉन

मुस्लिम आणि ख्रिश्चन अशी मिश्र लोकसंख्या असलेला हा देश. तिथे १९५८ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. पण नेमकं त्याच दरम्यान घुसखोरी आणि तस्करी देशात खूप वाढली होती. म्हणून निवडणुका शांतपणे पार पाडणं अगदीच अशक्य झालं होतं. तेव्हा या देशाने संयुक्त राष्ट्रांना मदतीची याचना केली. संयुक्त राष्ट्र संघाने भारत, नॉर्वे, इक्वेडोर या राष्ट्रांच्या ७१ लष्करी अधिकाऱ्यांचं निरीक्षक पथक तिथं पाठवलं. कर्नल रणबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या पथकांने उत्कृष्टपणे आपलं काम पूर्ण केलं. ही कामगिरी झाल्यानंतर पथक पुन्हा विसर्जित करण्यात आलं.

कांगो

१९६० साल. कांगो स्वतंत्र राष्ट्र बनला होता. पण देशातील वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये आपापसात युद्ध सुरू झालं. त्यात परिस्थिती अशी होती २५ हजाराच्या सैन्याला कोणीही सेनापती नव्हता. अशात कटांगाने  वेगळं राज्य स्थापन केलं. त्यांनी अजून उपराष्ट्र निर्माण केली. मात्र कांगोच्या मध्यवर्ती शासनाने आपला देश एकसंध राहावा यासाठी संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली. संयुक्त राष्ट्रांच्या सात सदस्य राष्ट्रांची फौज तयार करण्यात आली. या फौजेचं संख्याबळ जवळपास आठ हजार इतकं होतं.

यात भारताने परत आघाडी घेतली. मेजर जनरल रिखे यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीस यांचे लष्करी सल्लागार म्हणून नेमण्यात आलं. सैन्यबळ दुपटीने वाढवण्यात आलं. एक जबरी प्लॅन बनवून शत्रूवर हल्ला चढवण्यात आला. कॅप्टन सलारिया आणि त्यांचे काही सैनिक यांनी तर मोठं शौर्य दाखवलं. तुकडीची संख्या कमी असताना त्यांच्यावर हल्ला चढवून शत्रूला सळो की पळो करून सोडलं. मात्र यात शत्रूच्या गोळ्यांनी सलारिया यांचा वेध घेतला. 

या सगळ्या कामगिरीत ३६ सैनिकांना वीरगती प्राप्त झाली तर सुमारे सव्वाशे सैनिक जखमी झाले. भारतीय सैनिकांना या कामगिरीबद्दल मोठ्या प्रमाणात सन्मानित करण्यात आलं. १४ सैनिकांना वीरचक्र तर २३ जणांना सेनापदके अशी शौर्य सन्मानं प्राप्त झाली. यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या घटक फौजांमध्ये कामगिरी करताना ‘परमवीरचक्र’ कॅप्टन सलारिया यांना देण्यात आलं. हा मान मिळवणारे ते एकमेव सैनिक अधिकारी ठरले.

सायप्रस

सायप्रसमध्ये सुद्धा भारतीय सैनिकांनी शांततेसाठी नेत्रदीपक कामगिरी केली. यात संयुक्त राष्ट्र संघाच्या फौजांचं नेतृत्व भारताचे जनरल के. एस. थिमैय्या यांनी केलं. त्यांनाही ही कामगिरी करतानाच मृत्यू आला. मात्र त्यांनी ज्या शर्थीने लढत दिली त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ सायप्रस सरकारने एका खास तिकिटाचं वितरण केलं. शिवाय भारतीय सैन्यात सेवानिवृत्तीनंतरही गणवेशात असणारे आणि गणवेशातंच मृत्यूला सामोरे जाणारे जनरल थिमैय्या हे एकमेव अधिकारी ठरले.

श्रीलंका

१९४८ ला श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळालं. मात्र देशात सिंहली आणि तमिळ अशा दोन गटांत असंतोष निर्माण झाला. तमिळ अल्पसंख्यांकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी शास्त्राचा मार्ग अवलंबत स्वतंत्र तमिळ राज्य मिळावं म्हणून मागणी करण्यास सुरुवात केली. श्रीलंका शासनानेही चळवळ दडपून टाकण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांना अपयश पदरी पडलं. 

अशा परिस्थितीत हजारो तमिळ भारताच्या तमिळनाडू राज्यात घुसू लागले. तेव्हा १९८७ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात करार झाला. या कराराप्रमाणे भारतीय शांतीसेनेचा श्रीलंकेमध्ये प्रवेश झाला. अनेक तमिळ गटांनी भारताच्या शांती सेनेसमोर आपली शस्त्रास्त्रे ठेवली. मात्र काही कट्टर संघटना होत्या ज्यांनी हिंसक लढा चालू ठेवला. यात लिट्टेच्या काही सभासदांनी हिंसात्मक मार्गाचा अवलंब केला.

लिट्टेबद्दल सहानुभूती असलेल्या काही भारतीय संघटनांनी त्यांना  चोरट्या मार्गाने दारूगोळा आणि इतर प्रकारची मदतही दिली. अनेकदा तर लिट्टेचे सैनिक साध्या वेशात तर कधी स्त्रिया, मुलांना पुढे करून भारतीय सैन्याला लक्ष्य करायचे. अशा कठीण परिस्थितीतही शांतिसेना आपलं कार्य सुरू ठेवलं. भारतीय शांतिसेनेच्या देखरेखी खालीच श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या.

तमिळ भाषेला सिंहलीसोबत अधिकृत दर्जा देण्याचं आणि तामिळींच्या नागरिकत्वाचा प्रश्न सोडवण्याची आश्वासने यात देण्यात आली. तमिळ लोक तेव्हा कुठे संतुष्ट झाले. हे सर्व करण्यात शांतिसेनेने अपार कष्ट सोसले. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले. या ऑपरेशनला ‘पवन’ असं नाव देण्यात आलं होतं. १९८९ पर्यंत शांतिसेनेने आपलं कार्य यशस्वीपणे पूर्ण केलं. 

या ऑपरेशनमध्ये १ परमवीरचक्र, ९ उत्तम युद्ध सेवा मेडल्स, ३५ युद्ध सेवा मेडल्स, १४ विशिष्ट सेवा मेडल्स, ६६ वीरचक्रे आणि १७२ सेने मेडल्स भारतीय सैन्याने त्यांच्या शौर्याने मिळवली. 

या सर्व घटना भारतीय सैन्याच्या तुफान कामगिरीच्या साक्षीदार आहेत. इतिहासाने सैन्याच्या कामगिरीची दखल घेतलीये ज्यात शांततेचा मोठा वाटा आहे. रशिया – युक्रेन युद्धात देखील भारत शांततेचाच सल्ला देत आहे आणि त्यासाठीच प्रयत्न करत आहे. तेव्हा येणाऱ्या काळातही भारत शांतिदूत म्हणून कार्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हे ही वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.