कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचं लग्न धनगर मुलाशी लावून दिलं होतं.

गोष्ट आहे शंभर वर्षापूर्वीची. विठ्ठलभाई पटेल म्हणजे आपल्या सरदार पटेलांचे थोरले बंधू यांनी भारतात आंतरजातीय विवाहास परवानगी देणारा कायदा व्हावा म्हणून ब्रिटीशांच्या केंद्रीय कायदेमंडळात बिल आणले होते. पण त्याकाळी यावरून देशभर गदारोळ उठला. आंतरजातीय विवाहामुळे धर्म बुडेल की काय याची काळजी अनेकांना लागली होती. या परंपरावाद्यांच्या भुमिकेला लोकमान्य टिळक, पुरीचे शंकराचार्य इत्यादींचा पाठिंबा होता. पटेल बिल होऊ नये यासाठी प्रयत्न चाललेले.

पण एक आभाळाएवढा मोठा माणूस पटेलांच्या पाठीशी उभा होता, त्याचे नाव कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज !

३० मे १९२० रोजी डिप्रेस्ड क्लास मिशनचं नागपूर येथे अधिवेशन भरल होतं. तिथे बोलताना महाराज म्हणाले होते,

“जेवढ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होतील, तेवढ्या प्रमाणात भारतीय समाजातील जातीभेद नष्ट होतील आणि तेवढ्या प्रमाणात आपल्या देशाची प्रगती होईल.”

फक्त मोठीमोठी क्रांतीकारी भाषणे द्यायची, समाजाला सुविचार सांगायचे पण कृतीमध्ये या पैकी काहीही आणायचे नाही हा प्रकार त्याकाळी नव्हता. स्वतः शाहू महाराज आधी कृती करण्यावर विश्वास ठेवणारे होते. त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात आधीच अशा पद्धतीचा कायदा आणला होताच मात्र फक्त एवढ्यावर ते शांत बसले नाहीत.

फक्त कायदा करून समाजसुधारणा होणार नाही ते त्यांना ठाऊक होते. यासाठी एक मोठी धडक योजना हाती घ्यायचं त्यांच्या डोक्यात होतं. मराठा धनगर १०० आंतरजातीय विवाह.

सुरवात केली आपल्या घरापासून.

त्यांचं जनक घराण म्हणजे कागलच्या घाटगे घराण्यातील कन्या महाराजांच्या चुलत भगिनी चंद्रप्रभाबाई यांचा विवाह इंदूरचे महाराज तुकोजीराजे होळकर यांचे पुत्र युवराज यशवंतराव यांच्याशी निश्चित केला. तुकोजीरावांना या लग्नासाठी तयार करण्याची जबाबदारी आपले एक विश्वासू सेवक, गुंडोपंत पिशवीकर(धर्माधिकारी) यांच्यावर सोपवली होती आणि आपल्या काकांना दत्ताजीराव घाटगेनां समजावून सांगायचं अवघड शिवधनुष्य स्वतः उचललं.

उच्चकुलीन म्हणवून घेणाऱ्या मराठा घराण्यांची आंतरजातीय विवाहासाठी मानसिकता तयार व्हावी म्हणून महाराजांनी करवीर शंकराचार्याकडून अभिप्राय मागवला. त्यांचा याकार्यासाठी पाठिंबा मिळाल्यावर महाराजांनी या लग्नासाठीचे काम वेगवान केले.

अखेर वधूवराच्या घरचे लग्नासाठी तयार झाले. शाहू महाराजांनी तुकोजीराव होळकर महाराजांशी शंभर आंतरजातीय लग्नाच्या योजनेची देखील चर्चा केली. करवीर आणि इंदुर संस्थान हे दोघे मिळून या शंभर लग्नांचा समारंभ साजरा करणार होते. जवळपास ६० हजार रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली होती. 

असं म्हणतात की करवीर घराण्याच्या कोणत्यातरी राजकुमाराने या लग्नात आडकाठी आणली होती. शिवरायांच्या घराण्याशी संबंधित मुलीच लग्न दुसऱ्या जातीत करणे कितपत योग्य आहे या प्रश्नावरून वाद झाले. छत्रपती घराण्यात या मुद्द्यावरून वाद व्हावेत ही गोष्ट महाराजांना जास्त क्लेशकारक होती.

खूप वर्षाच्या प्रयत्नांनी फेब्रुवारी १९२४ साली चन्द्रप्रभाबाई घाटगे आणि यशवंतराव होळकर यांचं लग्न प्रत्यक्षात आल. चन्द्रप्रभाबाई यांचं लग्नानंतरचं नाव संयोगितादेवी असं करण्यात आलं.  पण दुर्दैवाने हा जंगी लग्नसोहळा पाहायला छत्रपती शाहू महाराज हयात नव्हते. त्यांच दोन वर्षापूर्वीच निधन झालं होतं. पण दोन्ही राजघराण्यांनी महाराजांना दिलेला शब्द पाळला. याच लग्न समारंभात २५ मराठा धनगर जोडप्यांचा विवाह देखील संपन्न झाला.

राजर्षी शाहू महाराजांच्या भगिनी संयोगितादेवी व इंदूरचे भावी महाराज यशवंतराव होळकर हे दोघेही एकत्र इंग्लंड मध्ये शिकले. हे जोडपं आजही आधुनिक भारताच्या नव्या पिढीचे प्रतिक म्हणून मानले जाते.

संदर्भ: राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य, लेखक डॉ. जयसिंगराव पवार

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Vilas zinjore says

    I like bol bhidu

  2. Tanaji Gorad says

    Hat’s off
    #Commendable

Leave A Reply

Your email address will not be published.