भारताची सर्वाधिक मानधन घेणारी गायिका जीने नवऱ्याच्या मृत्यूनंतर गाणं सोडलं.

एरवी छोटीशी गोष्ट घडल्यावर सुद्धा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करणारी माणसं दिसतात. सेलिब्रिटी सुद्धा यात काही कमी नसतात. लग्नापासून ते बाळंतपणाचे अनेक फोटो, व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांच्या सतत संपर्कात राहायला या लोकांना आवडतं.

यात त्यांचा काही तसा दोष नाही. कलाकार ही उपाधी जेव्हा चिकटते, तेव्हा सतत स्वतःला प्रकाशझोतात ठेवण्यासाठी काही गोष्टी करणं हे ओघाने येतंच.

पण भिडूंनो, हिंदी सिनेसृष्टीत एक अशी कलावंत होऊन गेली जी चाहत्यांना ‘फोटो काढण्याऐवजी मनात थोडी जागा ठेवा,’ असं नम्रपणे सांगायची.

ती कलावंत म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील पहिली पार्श्वगायिका शमशाद बेगम.

शमशाद यांचा उल्लेख जरी पहिली पार्श्वगायिका म्हणून केला असला तरी नव्या पिढीला पटकन त्यांच्या विषयी कळणार नाही. त्यांनी गायलेल्या गाण्यांचे आधुनिक काळात रिमेक होतात. यामध्ये शमशाद बेगम यांचं सर्वात लोकप्रिय गाणं म्हणजे ‘कजरा मोहब्बत वाला’. हे गाणं आपण सर्वांनी कुठे ना कुठे ऐकलं असतं. या गाण्यामागचा आवाज शमशाद बेगम यांचा आहे.

१९४० च्या दशकात शमशाद बेगम यांनी स्वतःच्या जादुई आवाजाने फक्त हिंदीच नव्हे तर मराठी, गुजराती, पंजाबी, तामिळ, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली.असं म्हणतात की,

त्या काळी रविवारी थोड्याशा आळसावलेल्या दिवसामध्ये घराघरात रेडीओवर शमशाद बेगम यांची गाणी लावली जायची.

शमशाद बेगम यांचा जन्म १४ एप्रिल १९१९ रोजी झाला. त्यांच्या घरात काहीसं परंपरावादी वातावरण होतं. तरीही शमशाद बेगम यांनी लहानपणापासून स्वतःची गायनाची आवड जोपासली.

इतकंच नव्हे, तर कुटुंबियांच्या विरोधात जाऊन त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी गणपात लाल या हिंदू वकिलाशी विवाह केला.

शमशादजी लहानपणापासून धार्मिक समारंभात गायच्या. पुढे प्रख्यात संगीतकार गुलाम हैदर आणि सारंगीवादक उस्ताद हुसेन बक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली १९३० साली त्यांनी गायनक्षेत्रात करियर करण्याच्या दिशेने वाटचाल केली. याचदरम्यान पेशावर आणि लाहोर येथे प्रसारित होणाऱ्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ साठी त्यांनी गायला सुरुवात केली.

१९४१ साली त्यांचा आवाज प्रथम डी.एम.पांचोली यांच्या ऐकण्यात आला. त्यांनी ‘खजांची’ या सिनेमात शमशाद बेगम यांना गायनाची संधी दिली. त्यांनी या सिनेमातील सर्व ९ गाणी गायली. या सिनेमाचं संगीत आणि शमशाद बेगम यांनी गायलेली गाणी सुपरहिट झाली.

यानंतर शमशाद बेगम मुंबईला आल्या. ‘मदर इंडिया’, ‘अंदाज’, ‘बाबुल’, ‘शिकारी’, ‘नया दौर’ यांसारख्या सिनेमात शमशाद बेगम यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली.

त्या भारतीय फिल्म इंडस्ट्रीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायिका बनल्या.

शमशाद बेगम यांनी गायलेली ‘लेके पेहला पेहला प्यार’, ‘मेरे पिया गये रंगून’, ‘कभी आर कभी पार’, ‘सैया दिल मे आना रे’ ही गाणी आजही दर्दी संगीतप्रेमींसाठी जवळची गाणी. त्यांनी गायलेल्या अशा असंख्य गाण्यांमुळे त्यांचे अनेक चाहते होते.

परंतु त्यांना कधी फोटो काढायला किंवा मुलाखती द्यायला आवडायचं नाही.

तुमच्या सदिच्छा माझ्या पाठीशी असू द्या.. मी तुमच्या मनात राहू इच्छिते’,

असं त्या नेहमी आपल्या चाहत्यांना म्हणत असत. 

करीयर जोरात सुरु असताना शमशादजींच्या पतीचं एका अपघातात निधन झालं.

हा धक्का त्यांना सहन झाला नाही. यानंतर गाणी गाणं त्यांनी कमी केलं. त्यामुळे त्यांच्या वाट्याची गाणी लता व आशा या मंगेशकर भगिनींना मिळाली व त्यांचा उदय झाला.

२००९ साली संगीतक्षेत्रातला मानाचा असा ओ.पी. नय्यर पुरस्कार त्यांना मिळाला. तसेच याच वर्षी पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. ९४ व्या वर्षी २३ एप्रिल २०१३ रोजी त्यांचं निधन झालं.

प्रसिद्धीपेक्षा आपण करत असलेल्या प्रामाणिक कामाने लोकांचं मन कसं जिंकायचं, याचं उदाहरण म्हणजे शमशाद बेगम.

आजही त्यांची गाणी ऐकल्यावर नकळत एक समाधान अनुभवायला मिळतं. हीच शमशाद बेगम यांच्या आवाजाची ताकद आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.