शरद पवार या तीनपैंकी कोणता पर्याय निवडतील…?

राज्य सरकार अल्पमतात गेल्याचं सरळ सरळ दिसतय. शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार सध्या गुवाहाटीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूण ५० आमदार असल्याचा दावा करण्यात येतोय. सुप्रीम कोर्टाने देखील फ्लोअर टेस्टला थेट नकार दिलेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे पाठींबा काढल्याचं पत्र देतील, फ्लोअर टेस्ट होईल अशा चर्चा आहेत..

थोडक्यात महाविकास आघाडीचे सरकार कोणत्याही क्षणी संपुष्टात येईल या चर्चांना बळ मिळतय. पण या घडामोडींमध्ये शरद पवारांच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे?

शरद पवार अखेरच्या क्षणी फासे टाकून महाविकास आघाडीचं सरकार वाचवतील का? पवार काय गेम प्लॅन खेळतील…

या गोष्टी महत्वाच्या आहेत, आत्ता पवार महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी कोणता डाव खेळतील व खेळतील का नाही हा देखील प्रश्न आहे?

पण सध्याच्या स्थितीत शरद पवारांकडे फक्त तीनच पर्याय दिसत आहेत, यातला कोणता पर्याय ते स्वीकारतील या बाबतच आपण बोलणार आहोत…

पहिला पर्याय म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार कोणत्याही पद्धतीने वाचवणं..

जेव्हा एकनाथ शिंदेंच्या बंडाची बातमी आली. यानंतर झालेल्या घडामोडीनंतर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह वरून जनतेची संवाद साधला. या संवादातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पदाचा राजीनामा देतील अशा चर्चा होत्या पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही.

सरकार अल्पमतातल्या असणाऱ्या बातम्या असताना, शिंदे गटाकडे संख्याबळ जास्त असलेलं दिसत असताना देखील मुख्यमंत्र्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही. याचा सरळ सरळ अर्थ असाच आहे की शरद पवारांना महाविकास आघाडीचे सरकार टिकवायचे आहे.

शरद पवारांपुढे हा पर्याय पहिल्या पसंतीवर असण्याचं कारण आहे ते म्हणजे महाविकास आघाडीत त्यांचा असणारा वरचष्मा. राष्ट्रवादीनं सुरवातीपासूनच महत्वाची मंत्रीपद आपल्या हातात ठेवली आहेत.

२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या काळात विरोधात बसण्याचा मोठ्ठा फटका राष्ट्रवादीला सहन करावा लागला. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांनी भाजप प्रवेश केला.

अशा वेळी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत नंबर दोन वर राहिलेल्या उमेदवारांना बळ देण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाकडून चालू होतं. शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभूत झालेले तब्बल १२ उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे होते. या उमेदवारांमध्ये शशिकांत शिंदे, राहूल मोटे, पंकज भुजबळ असे उमेदवार आहेत. यांना बळ देण्यासाठी सत्ता असणं गरजेचं आहे.

महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतरची पहिली दिड वर्ष कोरोनामध्येच गेली. तरिही राष्ट्रवादी पक्षाने महाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून आपल्या नेत्यांना बळ दिलच. पण अजून कालावधी मिळाल तर तुलनेनं बलाढ्य असणाऱ्या भाजपला रोखता येईल याची जाणीव शरद पवारांना आहे.

शिवाय राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून सत्तेत आहे. राष्ट्रवादीवर टिका करत असताना राज ठाकरे अनेकदा म्हणाले आहेत की,

राष्ट्रवादी हा निवडणूक येणाऱ्या नेत्यांची मोळी आहे.

शरद पवारांना देखील ही गोष्ट चांगली ठावूक आहे, म्हणूनच मुख्य प्रवाहात पक्षाला टिकवून ठेवायचं असेल तर सत्ता राखणं हा हाच मुख्य पर्याय पवारांपुढे असणार आहे..

दूसरा पर्याय म्हणजे, विरोधी पक्षात जावून विरोधी पक्षनेते पद संभाळणं..

सेनेच्या शिंदे गटाची बंडखोरी कायम राहिली, तर सत्ता जाण्यावाचून व विरोधात बसण्यापासून शरद पवारांकडे दूसरा कोणताही पर्याय नाही. राज्यात शिंदे गट व भाजपने बहुमत सिद्ध केलं तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षांना विरोधी बाकावर बसावं लागेल.

शरद पवार केंद्रिय पातळीवर मोदीविरोधी गटामध्ये सक्रिय आहेत. अशा वेळी देशपातळीवरील मोदीविरोधी पक्षांची एकजुट करण्यासाठी ते सध्याच्या राजकीय डावपेचांचा वापर करून घेतील. शिंदे गटाच्या साथीने भाजपनं बहुमत सिद्ध केल्यास सर्वात मोठ्ठा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष राहिलं. राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद येईल. या पदाचा कसा वापर करुन घ्यायचा हे शरद पवारांना चांगल ठावूक आहे.

गेल्या अडीच वर्षात सेनेच्या अनेक नेत्यांवर ED ची कारवाई चालू आहे. मात्र राष्ट्रवादीचे दोन मोठ्ठे नेते नवाब मलिक व अनिल देशमुख यांना तर थेट जेलच झालेली आहे. सेनेहून अधिक दबावाचं राजकारण राष्ट्रवादीविरोधात करण्यात आलं तरिही राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही हे पर्सेप्शन घेवूनच शरद पवार मोदीविरोधी गटाचा चेहरा होतील.

संपलेल्या शिवसेनेला बळ देणं, २०२४ च्या लोकसभा निवडणूकांचा अंदाज घेवून विरोधी पक्षाची मोट बांधणं या गोष्टी पवार करतील. त्यामुळेच दूसरा पर्याय देखील पवार निवडू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येते.

आत्ता राहतो तो तिसरा पर्याय.. 

हा पर्याय पवारांना काहीही करून टाळायचा आहे. बहुदा तिसरा पर्याय समोर येवू नये म्हणूनच शरद पवार आत्ता राजकीय डावपेच खेळतील. हा तिसरा पर्याय आहे तो म्हणजे मध्यावधी निवडणूकांचा.

शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत गेल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण बहुमतानेच सत्ता प्राप्त करण्याचा मार्ग अवलंबल्याचं दिसून येतं. भाजपचा प्रयत्न देखील संपूर्ण बहुमताकडे राहणार आहे.

पुन्हा आमदार फुटतील, पुन्हा लोक सोडून जातील अस अस्थिरतेच राजकारण करण्यापेक्षा उद्धव ठाकरे सरकार फ्लोअर टेस्ट मध्ये नापास झाल्यास बहुमताचा दावा न करता थेट निवडणूकांचा मार्ग अवलंबण्याचा पर्याय देखील भाजपसमोर आहे..

जनमताचा कौल घेवून शिंदे गटाला सोबत घेवून राज्यात मध्यावधी निवडूका घेणं व सत्तेत येण्याचा पर्याय भाजप घेवू शकेल.

अगदी २०१८-१९ या आर्थिक वर्षात इलेक्ट्रॉरल बॉण्डमार्फत मिळालेल्या देणगीचे आकडे पाहिले तर एकूण पक्षनिधी म्हणून भाजपला २ हजार ५५५ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता तर राष्ट्रवादीला या माध्यमातून फक्त ५ कोटींचा निधी मिळवता आला.

२०१४ पासून कॉंग्रेस पक्ष सत्तेत नाही, गेल्या अडीच वर्षांचीच सत्ता राष्ट्रवादीला उपभोगता आली आहे, शिवसेनेला खिंडार पडलेलं आहे अशा काळात मध्यावधी निवडणूकांना सामोर जाणं हे या तिन्ही पक्षांना परवडणारं नाही.

शिवाय गेल्या अडीच वर्षात ठोस जनतेपुढं घेवून जाण्यासारखं ठोस अस कोणतही काम महाविकास आघाडीकडून झालेलं नाही. त्यामुळे सध्या निवडणूका न होवू देता प्रसंगी विरोधात बसण्याचा पर्याय शरद पवार निवडू शकतील..

तुम्हाला काय वाटतं, शरद पवार या तिन पर्यायांपैकी कोणता पर्याय स्वीकारतील…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.