रेल्वेमंत्री असलेल्या शास्त्रीजींनी आईला आपण रेल्वेत नोकरी करतोय असं सांगितलं होतं.

ओडिशामधला भीषण रेल्वे अपघातात हजारच्या जवळपास लोकं जखमी झालेत तर मृतांची संख्या वरचेवर वाढत आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरुये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनास्थळी भेट दिली. तसेच मृतांच्या नातेवाइकांना आणि जखमींना मदत जाहीर केली पण तेच दुसरीकडे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु झाली.

अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे आणि याच सोबत आठवण काढली जातेय ते लालबहादूरजींची !

लाल बहादूर शास्त्रींनी जेव्हा जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

लालबहादूर शास्त्री हे भारताचे रेल्वेमंत्री होते. तेव्हा भारतातील सर्वात मोठ्ठी रेल्वे दुर्घटना झाली. या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारत त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. तेव्हा नेहरू संसदेत संबोधित करताना म्हणाले, “शास्त्रीजी जबाबदार आहेत म्हणून हा राजीनामा स्वीकारला जात नाही तर पदाचे उत्तरादायित्व सिद्ध करत असताना प्रत्येकाला आपल्या जबाबदारीच भान असावं व त्यातून संसदेची चौकट दृढ व्हावी म्हणून हा राजीनामा स्वीकारला जात आहे.”

याच दुर्घटनेबद्दल संसदेत चर्चा करत असताना लालबहादूर शास्त्री म्हणाले होते की,

“माझ्या कमी उंचीमुळे आणि नम्र स्वभावामुळे अनेकांचा असा समज आहे की मी कठोर निर्णय घेवू शकत नाही. मला वाटतं मी शाररिक बाजूने मजबूत नाही देखील पण एक नक्की मी मानसिक बाजूने नक्कीच मजबूत आहे”.

शास्त्रींच्या याच राजीनाम्याची आठवण आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना करून दिली जातेय…

लालबहादूरजींच्या प्रामाणिकपणाचे आणखी काही किस्से म्हणजे, एकदा रेल्वेमंत्री झाल्यावर  शास्त्रीजींनी आईला आपण रेल्वेत नोकरी करतोय असं सांगितलं होतं.

लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांच्या मूळगावी म्हणजेच मुघलसराय येथे रेल्वे चा कसला तरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आपल्या लाडक्या सुपुत्राला पाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय गोळा झाला होता.

पाय ठेवायला देखील जागा नव्हती. शास्त्रीजींना सभास्थानी येण्यास उशीर होत होता. स्वयंसेवकांना गर्दी नियंत्रित करणे अवघड जात होतं.

अशात एक म्हातारी बाई आयोजकांकडे आली आणि काही तरी सांगू लागली. काही स्वयंसेवकांनी तिला बाजूला नेलं.

त्या बाईचं म्हणणं होतं की, तिचा रेल्वे मध्ये नोकरीला असलेला मुलगा या कार्यक्रमासाठी म्हणून दिल्लीहुन आला आहे, त्याची भेट घालून द्या.

स्वयंसेवकाने त्या आज्जीबाईना त्यांच्या मुलाचं नाव विचारलं. त्या म्हणाल्या,

“लालबहादूर शास्त्री”

त्या साध्यासुध्या वेषातल्या आज्जीचं हे बोलणं हे ऐकून सर्व जण हसू लागले.

कोणीतरी त्यांना वेडं समजून हुसकावून देण्याचा प्रयत्न करू लागला. तिथे काही पत्रकार देखील उपस्थित होते. त्यांच्यापैकी काहीजण समजावून सांगायचा प्रयत्न करत होते की,

“दादीजी लालबहादूर शास्त्री हमारे मिनिस्टर है.”

पण आज्जी ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी तिथून हलण्यास नकार दिला. हा गोंधळ सुरू होता इतक्यात शास्त्रीजींचं सभास्थानी आगमन झालं.

त्या आजीबाईना पाहिल्यावर ते पहिल्यांदा तर आश्चर्य चकित झाले आणि पटकन त्या आज्जीचे पााा पकडून त्यांना मिठी मारली.

तिथे जमलेल्या सगळ्यांना कळेना की नेमकं काय चाललंय.

त्या आज्जी म्हणजे खरोखर शास्त्रीजीच्या आई रामदुलारी देवी होत्या. शास्त्रीजींनी त्यांची विचारपूस केली आणि त्यांना लगेच घरी पाठवून दिलं.

तिथं जमलेल्या पत्रकारांनी लालबहादूर शास्त्रींना विचारलं ,

“आप ने, उनके सामने भाषण क्यों नहीं दिया।”

शास्त्रीजींच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू उमटलं. ते म्हणाले,

”मेरी माँ को नहीं पता कि मैं मंत्री हूँ। अगर उन्हें पता चल जाय तो लोगों की सिफारिश करने लगेगी और मैं मना भी नहीं कर पाउंगा और उन्हें अहंकार भी हो जाएगा।”

असे होते लालबहादूर शास्त्री. आपल्या पदाचा मोठेपणा कधीही मिरवला नाही. नम्रपणा हीच त्यांची खरी ताकद होती. गांधीवाद पुस्तकी न ठेवता तो खऱ्या आयुष्यात देखील आचरणात आणला.

याच रेल्वेमंत्री पदाच्या काळात जेव्हा एक मोठा अपघात झाला तेव्हा त्यांनी थेट राजीनामा देत त्यांनी अनेकांना चकित केलं होतं. ते पंतप्रधान झाले तरी एक कार विकत घेण्या एवढे देखील पैसे त्यांनी कमावले नव्हते.

कर्ज काढून गाडी घेणारे ते देशाचे एकमेव पंतप्रधान होते.

त्यांच्या आदर्शवादी जगण्याचा धडा फक्त आजच्या नेत्यांनीच नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी मार्गदर्शक ठरेल हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.