रेल्वेमध्ये भेटलेल्या क्रशसोबत लग्न करायला शत्रुघ्न सिन्हा तब्बल १४ वर्ष थांबला होता…

‘गोल्डन इरा’मधल्या कलावंतांची जेव्हा आत्मचरित्र येऊ लागली तेव्हा त्या काळातील अनेक मजेदार आणि गमतीशीर गोष्टींचा खुलासा होऊ लागला. सत्तरच्या दशकात आधी खलनायक आणि नंतर नायक म्हणून प्रदीर्घ काल रुपेरी पडद्यावर वावरलेले शत्रुघन सिन्हा यांचे आत्मचरित्र काही वर्षापूर्वी प्रसिद्ध झाले.

या आत्मचरित्राचे नाव आहे ‘एनीथिंग बट खामोश’. या पुस्तकात शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या ‘फर्स्ट क्रश’ बद्दल तपशिलाने लिहिले आहे. गंमत म्हणजे या ‘क्रश’ सोबत त्यांची भेट झाल्यानंतर तब्बल १४ वर्षांनी त्यांनी लग्न केले.

त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा म्हणतात, “माझ्या आयुष्यातील १४ वर्षाचा वनवास हा लग्नापूर्वी होऊन गेला!” योगायोगाने त्यांच्या मुंबईतील बंगल्याचे नाव ‘रामायण’ हेच होते.

२७ जून १९६५ या दिवशी शत्रुघ्न सिन्हाने घरातील लोकांशी भांडण करून केवळ अभिनय करायचा आहे, म्हणून मुंबईच्या दिशेने प्रयाण केले. त्यांचे सर्व भावंड डॉक्टर, इंजिनियर होते. शत्रुघ्नने देखील डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण शत्रुघ्नचा पहिल्यापासून कल हा अभिनयाकडे होता.

अभिनयाचे विधिवत शिक्षण घ्यावे आणि चित्रपटात काम करावे यासाठी त्याला पुण्याला जायचं होतं. या प्रवासात योगायोगाने त्याच्या समोरच्या सीटवर एक अतिशय सुंदर मुलगी बसली होती. “आयुष्यात मी इतकी गोरीपान निरागस आणि सुंदर मुलगी कधीच पाहिली नव्हती. स्कर्ट आणि टॉप घातलेली ही मुलगी आणि तिच्या दोन वेण्यामुळे शाळकरी वाटत होती. तिच्या आंटीसोबत ती देखील मुंबईला चालली होती”.

ही सुंदर मुलगी पाहू शत्रुघ्न मनोमन खुश झाला आणि लग्न केले तर याच मुलीशी असा तिथल्या तिथे त्याने निश्चय करून टाकला! 

आता रेल्वेच्या प्रवासात तिची दोन दिवसांची सोबत होती. या दोन दिवसात आपण तिच्यावर इंप्रेशन टाकून तिला आपलंसं करू याचा त्याला विश्वास वाटत होता.  पण त्याचवेळी त्याला आपल्या रूपाचा न्यूनगंड वाटत होता. कारण ती इतकी फेयर प्रिटी गर्ल आणि तिच्या मानाने हा दिसायला ओबडधोबड, काळा सावळा ,चेहऱ्यावर जखमांचे व्रण असलेला! पण तरी त्याला ती मनोमन आवडली होती. या प्रवासात तिने मात्र त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते!

या प्रवासात एक गंमत झाली. प्रवासात एकदा तिचे डोळे भरून आले होते. का कुणास ठावून ती आतून रडते आहे असे शत्रुघ्नला वाटले. त्यावेळी ‘माधुरी’ नावाचे एक सिने साप्ताहिक त्याच्या हातात होते. त्यातून त्याने तिला एक फिल्मी स्टाईलमध्ये चिठ्ठी पाठवली आणि लिहिले, “इतनी खूबसूरत आंखो मे ये आंसू अच्छे नही लगते!”

हळूच ते मॅगझिन तिच्या हातात दिले. तिने ते मॅगझिन पाहिले; त्याचा मेसेज देखील पाहिला आणि ते मासिक चक्क खिडकीतून बाहेर फेकून दिले!

पण शत्रुघ्नला ती मुलगी इतकी आवडली होती की प्रवासात दोन दिवस तो झोपू शकला नाही. सारखं तिच्याकडे टक लावून पाहत होता. ती झोपल्यानंतर ती आणखीनच सुंदर दिसत होती. त्याला वाटले तिच्या गालाला स्पर्श करावा, तिच्या केसांना स्पर्श करावा पण त्याचे धारिष्ट झाले  नाही. अशा प्रकारे त्यांचा प्रवास दोन दिवसानंतर संपला.

शत्रुघ्न सिन्हा कल्याणला उतरून पुण्याकडे रवाना झाला आणि ती मुंबईला. पण या दरम्यान शत्रुघ्नने तिचे नाव जाणून घेतले होते. तिचे नाव होते पूनम चंडीरमणी!

मुंबईत आल्यानंतर तिने मिस यंग इंडिया हा किताब पटकावला आणि बऱ्याच जाहिरातीत दिसू लागली. इकडे शत्रुघ्न सिन्हा याने पुण्यात अभिनयाचा कोर्स पूर्ण केला. नियतीने पुन्हा या दोघांना मुंबई एकत्र आणले. पुढे पुनम चित्रपटात आली ती ‘कोमल’ हे नाव घेऊन. ‘जिगरी दोस्त’ हा तिचा पहिला गाजलेला चित्रपट. त्यानंतर ‘सबक’ या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले. दोघांमधील प्रेम इथेच फुलले.

खलनायकीकडून नायक पदाच्या भूमिका करत शत्रुघ्न सत्तरच्या दशकात उत्तरार्धात अमिताभ बच्चनला टक्कर देऊ शकणारा अभिनेता बनला. याच काळात त्याची मैत्री झाली रीना रॉय सोबत. रुपेरी पडद्यावरील ही लोकप्रिय जोडी जनमानसात प्रचंड गाजत होती. 

या दोघांच्या प्रेमाच्या गॉसिप्स सिनेमातून येतच होत्या. पुढे अचानकपणे या कहाणीत ट्विस्ट आला आणि शत्रुघ्न सिन्हा पुन्हा आपल्या पहिल्या क्रशकडे गेला आणि ९  जुलै १९८० शत्रुघ्न सिन्हा आणि पुनम यांनी लग्न केले. लग्नानंतर ही रीना सोबत शत्रुघ्नची मैत्री  होतीच. पण नंतर शत्रुघ्न संसारात रमला.

या ब्रेकअपनं रीना पुरती कोसळली आणि नंतर पाकिस्तानचा आघाडीचा क्रिकेटपटू मोहसीन खान याच्यासोबत लग्न करून पाकिस्तानात निघून गेली.अर्थात तिचे हे लग्न आणि हा संसार अपयशी ठरला, त्याबद्दल पुन्हा कधी तरी!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.