भावनिक आंदोलन सुरू झालं की सगळे मागे सरतात आणि “शिवसैनिक महिला” पुढे येतात ते यामुळे
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री बंगल्या समोर जाऊन हनुमान चालीसा वाचणार असा अट्टहास धरला.
राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी मातोश्री बाहेर शिवसैनिकांकडून खडा पहारा देण्यात आला होता.त्यात एक ८० वर्षांच्या शिवसैनिक आज्जी सुद्धा सहभागी झाल्या होत्या. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आज्जीची घरी जाऊन भेट घेतली होती.
ही झाली एक घटना.
ज्या ज्या वेळी शिवसेनेवर संकटे आली, आक्रमक भूमिका घेण्याची वेळ येते त्यावेळी सगळ्यात पुढे महिला शिवसैनिक उभे राहिल्याचे पाहायला मिळते.
विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारासह बंड पुकारत करत सुरत गाठली. यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मातोश्रीवर जमले होते. त्यात सगळ्यात समोर होत्या महिला शिवसैनिकांचा.
कुठलेही आंदोलन आठवून बघा त्यात महिला शिवसैनिकांची संख्या मोठी असते.
शिवसेनेचे स्थापनेनंतर सर्वत्र शाखा सुरु करण्यात आल्या. मुळात शिवसेना वाढली, रुजली ती मुंबईतील चाळीत, झोपडपट्टी भागात. भूमिपुत्रांच्या हक्काच्या रक्षणासाठी स्थापन झालेली संघटना असं तिचं स्वरूप होतं. स्थानिकांना नोकऱ्या, घरं मिळवून देणं, त्यांचे हक्क मिळवून देण्यसाठी काम करणारी संघटना म्हणून शिवसेना आपली ओळख निर्माण झाली होती.
शिवसेनेत शाखेला खूप महत्व असते. प्रत्येक शाखेला ‘शाखा प्रमुख’ असतो. तर शाखेतील महिला प्रमुखाला महिला संघटिका म्हटले जाते.
या शाखा दिवसभर चालू राहातात. इथं शिवसैनिक तर दररोज येत असतातच त्याचबरोबर सामान्य नागरिक आपले प्रश्न घेऊन इथं येत असतात. मुंबईतील काही शाखा २४ तास चालू राहत असल्याचे सांगितलं जातं. पक्ष आदेशानुसार देण्यात येणारे कार्यक्रम शाखेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतात.
यामुळे आपल्या भागात पाणी आले नाही, कचरा उचलला नाही, रेशनकार्ड नाही, वैद्यकीय समस्या घेऊन नागरिक शाखेवर येतात. जर शिवसेनेचा नगरसेवक असेल तर त्यांच्या पर्यंत निरोप पोहचवण्याचे काम शाखेच्या माध्यमातून करण्यात येते. तर काही ठिकाणी शाखेतून नसेल तरीही थेट ऑफिस मध्ये जाऊन ते काम शिवसैनिकांच्या माध्यमातून करण्यात येते.
शाखे अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला महिला शिवसैनिक हजर असायच्या.
नागरी समस्या शाखेवर सुटू लागल्या होत्या. हे लक्षात आल्यापासून तक्रारी नोंदविण्यासाठी महिला शाखेवर जाऊ लागल्या होत्या. त्यानंतर हळूहळू पक्ष संघटेनच्या कामात सहभागी होऊ लागल्या होत्या.
प्रबोधन ठाकरे यांनी शिवसेनेच्या पहिल्या दसऱ्या मेळाव्यात महिल्यांच्या संरक्षण आणि महिलांची प्रगती विषयी भाष्य केले होते. बाळासाहेबांच्या भाषणांना सुद्धा महिलांची भरपूर गर्दी असायची. बाळासाहेब ठाकरे नेहमी महिलांचा ‘रणरागिणी’ असा उल्लेख करत.
१९८४ साली बाळासाहेब ठाकरेंच्या पुढाकारातूनच शिवसेनेने महिला आघाडीची स्थापना केली.
१९८५ मध्ये सुधा चुरी यांची शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे १९९० मध्ये चुरी मुंबई महापालिकेत निवडून गेल्या. शिवसेनेची महिला आघाडीत प्रामुख्यानं चाळीतील, झोपडपट्टीतल्या, मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांचा समावेश होता. या महिला घर कामगार, बँका, विविध मंडळ, विमान कंपन्या, लहान मोठ्या ऑफिस मध्ये, अंगणवाडी सेविका म्हणून काम करायच्या.
कामाची ठिकाणी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आपले प्रश्न मांडण्यासाठी आपले प्रश्न थेट शाखेत जात होत्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे या महिला आक्रमक असायच्या.
१९९२ मध्ये मुंबईत उसळलेल्या दंगलीत सुद्धा शिवसेनेची महिला आघाडी रस्त्यावर उतरली होती. यावेळी आपण कुठलेही काम करू शकतो हे महिला शिवसैनिकांनी दाखवून दिले होते. १९९८ मध्ये लेस्बियन विषयावरील फायर पिक्चर रिलीज झाला होता. त्यावेळी महिला शिवसैनिक पिक्चरचे पोस्टर फाडून थेटर मध्ये घुसुन शो बंद पाडला होता. तर एका जाहिरातीसाठी मॉडेलने न्यूड फोटो शूट केल्याने तिला मारहाण केल्याची घटना मुंबईत घडली होती.
एकमेकींच्या मदतीसाठी उभ्या राहणाऱ्या, हुंड्यावरून होणाऱ्या छळाच्या विरोधात, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या या महिला होत्या.
महिला शिवसैनिकांमधली मैत्री घट्ट व्हावी म्हणून शाखेवर हळदकुंकू, सत्यनारायण सारखे कार्यक्रम वर्षभर सुरु असतात. त्यामुळे या शिवसैनिकांमध्ये संवाद सतत सूर राहतो. तसेच दसरा मेळावा सारख्या कार्यक्रमाला हे महिला सोबत हजेरी लावतात.
शिवसैनिक हा पक्षप्रमुखांचा आदेश मानून कुठलेही काम करण्याची पद्धत आहे. दुसरी पद्धत स्वयंस्फूर्तीने काम करणे. ज्या ज्या वेळी पक्षावर संकटे उभी राहिली त्यावेळी शिवसैनिक आक्रमकपणे पक्षाच्या पाठीशी उभे राहिल्याचे उदाहरणे आहेत.
२०१९ मध्ये आदित्य ठाकरे हे ठाकरे परिवारातील पहिले सदस्य होते जे निवडणूक लढवत होते. त्यांचा फॉर्म भरण्यापासून ते प्रचारात सगळ्यात समोर महिला शिवसैनिक होत्या. एकप्रकारे ठाकरे कुटुंबातील सदस्य पुढे येत आहे आपण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहायला हवा असा संदेश यातून दिल्याचे सांगितले जाते.
शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सुरेखा गव्हाणे यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितलं की,
आमच्यासाठी शिवसैनिक हे पद सगळ्या पदांपेक्षा मोठं असतं. आमची ओळख प्रामाणिक काम अशी आहे. पक्ष प्रमुख आणि भगवा आम्हाला जोडून ठेवणारा दुवा आहे. त्यामुळे ज्या वेळी पक्षावर संकट येतील त्यावेळी शिवसैनिक त्यांच्या पाठीशी राहतात.
महिला शिवसैनिक या तयार झाल्या मुळातच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. शाखेवर दिलेला पक्ष आदेश मानण्याचे काम आम्ही करत असतो.
ज्या दिवशी कळाले की एकनाथ शिंदे यांनी बंड केला तेव्हा अनेक महिला शिवसैनिक स्वयंस्फूर्तीने शिवसेना भावना समोर जमल्या होत्या. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो सामान्य कार्यकर्त्याला मोठं करतो. त्यामुळे आंदोलन असो, पक्षावरील संकटे असो महिला शिवसैनिक पुढे राहतात. असे गव्हाणे यांनी सांगितले.
शिवसेनेचे महिला केडर जरी असलं त्यांना राज्यांच्या राजकारणात मोठी जबाबदारी दिल्याचे दिसून येत नाही. निलम गोऱ्हे, भावना गवळी, किशोरी पेडणेकर अशी काही नावे सोडली तर शिवसेनेत कुठल्याही महिला शिवसैनिकांना मोठी जबाबदारी दिली नाही.
तर दुसरीकडे २०२० मध्ये काँग्रेस मधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदीला राज्यसभेवर पाठविल्याने टीका करण्यात आली होती.
हे ही वाच भिडू
- बाळासाहेब ठाकरेंनी “शिवसेनाप्रमुखपदाचा” राजीनामा समोर ठेवूनच पेटलेलं बंड शांत केलं होतं
- कोणताही नेता शिवसेना सोडू दे आरोपीच्या पिंजऱ्यात कायमच मिलिंद नार्वेकर का असतात ?
- शिवसेना स्थापनेच्या सात वर्षांपुर्वी मराठाची हेडलाईन होती, अत्रेंची हाक..शिवसेना उभारा..!