कोणताही नेता शिवसेना सोडू दे आरोपीच्या पिंजऱ्यात कायमच मिलिंद नार्वेकर का असतात ?

आघाडी सरकार पडणार ? भाजपचं सरकार येणार ? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार ? या सगळ्या चर्चांना ऊत आलाय. आजच्या दिवसभराच्या राड्याला कारणीभूत ठरलेत ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्याला निमित्त ठरली त्यांची आणि सेनेच्या २५-३० आमदारांची नाराजी.

यातच मिलिंद नार्वेकरांचं नाव चर्चेत आलं ! 

कारण एकनाथ शिंदे गट सुरतमध्ये एका हॉटेलवर आहेत आणि त्यांना मनवायला शिवसेनेने काही महत्वाच्या नेत्यांना पाठवलं त्यात मिलिंद नार्वेकरांचा देखील समावेश आहे. शिंदे गटाची मनधरणी करण्यात ते कितपत यशस्वी ठरणार हे पाहावं लागेल…

मात्र याही चर्चा दुर्लक्षून चालणार नाहीत कि, जेंव्हा जेंव्हा सेनेतून काही नेते बंडखोरी करून जातात तेंव्हा जाता जाता ते मिलिंद नार्वेकरांवर ठपका ठेवूनच जातात.

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे मानले जातात. काही सेनेतीलच नेते आरोप करता कि, मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना भेटू देत नाहीत. नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनापक्षप्रमुख ना? असा खोचक टोला देखील माजी शिवसैनिक लगावत असतात. तर काहींच्या मते ते बाळासाहेबांना देखील फारसे आवडायचे नाहीत. 

मात्र हे मिलिंद नार्वेकर आहेत तरी कोण ?

२६ वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर होत्या. तिकीट वाटप चालल होतं. मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातील काही तरुण मातोश्रीवर आले होते. त्या तरुणांनां उद्धवची भेट घेण्यास सांगण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंचे धाकटे चिरंजीव उद्धव ठाकरे नुकतच राजकारणात पाउल टाकत होते.

उद्धव ठाकरेंनी त्या तरुणांशी गप्पा मारल्या काही प्रश्न विचारले.

त्यात एक पंचविशीतला मुलगा त्यांना समंजस वाटला. तो तिथला गटप्रमुख होता. निवडणुकीआधी वॉर्डात होणाऱ्या बदलामुळे आपल्याला कमीतकमी शाखाप्रमुख पद तरी मिळेल या अपेक्षेने तो मातोश्रीवर आला होता. उद्धवनी त्याला नाव विचारलं,

“मिलिंद केशव नार्वेकर”

उत्साही, स्मार्ट, लहान वयातही राजकारणाची योग्य समज या त्याच्या गुणांनी उध्दव ठाकरे यांना इम्प्रेस केले. त्यांनी मिलिंदला थेट विचारलं, “फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे?” मिलिंद गडबडीत म्हणाला, “तुम्ही म्हणाल ते”

त्या दिवसापासून मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्या मागे सावलीप्रमाणे दिसू लागला. 

याचा अर्थ त्यांना थेट सचिवपदाची जबाबदारी मिळाली अस नाही. सुरवातीला पडेल ती कामे केली. मातोश्रीवर त्याच्या शिवाय पान देखील हलत नव्हत. पुढच्या काही वर्षातच उद्धव यांचा अधिकृत पीए म्हणून त्यांना पद देण्यात आल.

गेली २६  वर्षे झाली उद्धव ठाकरे यांचा त्यांच्यावरचा विश्वास तिळभर देखील कमी झालेला नाही.

उद्धव ठाकरे यांचा हुकुमाचा एक्का म्हणून त्यांना ओळखल जात. उद्धव यांच्या अपोईटमेंट पासून त्यांचे फोन घेणे, दौरे आखणे वगैरे कित्येक गोष्टी ते सांभाळायचे. उद्धव हे खरं तर टिपिकल राजकारणी नाहीत. त्यांना कधी कोणी रस्त्यात उतरून आंदोलन करताना, लोकांच्यात मिसळताना कोणी पाहिलं नव्हत. बाळासाहेबांची अमोघ वक्तृत्वकला देखील वारसा म्हणून त्यांच्याकडे आली नव्हती.

राज ठाकरे यांचा संपर्क त्यामानाने जास्त होता. राजनां लोकं भावी शिवसेनाप्रमुख म्हणू लागले होते.

अशावेळी उद्धव ठाकरे यांचे कान डोळे बनण्याच काम मिलिंद नार्वेकर यांनी पार पाडल. गंमतीने त्यांना मातोश्रीमधला सीसीटीव्ही असं देखील म्हटल जात होतं. त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून कोणतीही घडामोड सुटत नव्हती.

पडद्यामागे राहून उद्धव यांची इमेज बिल्डींग करण्याच महत्वाच काम त्यांनी केलं. शिवसेनेच्या दुसऱ्या फळीत स्वतः उद्धव ठाकरे, राज ठाकरे तर होतेच शिवाय मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील मोठे नेते म्हणून उदयास आले होते.

नारायण राणे हे एकेकाळचे तळागाळातले शिवसैनिक होते. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि रस्त्यावरची लढाई लढून हा कार्यकर्ता मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची पर्यंत पोहचला होता. सत्ता गेल्यावर देखील शिवसेनेचा किल्ला विरोधी पक्ष नेता म्हणून विधानसभेत लढवला.

बाळासाहेबांच आता वय झालंय हे कळत होत. त्यांचा उत्तराधिकारी कोण याची उत्सुकता होती.

पण मनोहर जोशी, सुधीर जोशी, सुभाष देसाई असे जुने नेते,राज ठाकरे, नारायण राणे यांच्यासारखे कार्यकर्त्यांचा मोठ्ठ पाठबळ असणारे नेते यांना मागे टाकून उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनले. आणि या सगळ्या डावप्रतिडावाच्या राजकारणात उद्धव यांना मिलिंद नार्वेकर यांच्या चाणक्यनितीचा फायदा झाला अस म्हणतात.

पण तिथूनच शिवसेनेच्या फाटाफुटीस सुरवात झाली. आधी भास्कर जाधव, मग नारायण राणे शेवटी राज ठाकरे असे एकामागून एक तरुण नेते शिवसेना सोडून गेले. यातील कोणीही थेट बाळासाहेब ठाकरेंच्यावर टीका करत नव्हता. पण प्रत्येक जण जाताना एकाच व्यक्तीला शिव्या देत होता, मिलिंद नार्वेकर.

राज ठाकरे तर म्हणाले,”माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल आहे.”  त्यांचाही सरळ रोख मिलिंद नार्वेकर यांच्याकडे होता.

नारायण राणे यांनी तर आमदारकीच तिकीट देण्यासाठी मिलिंद नार्वेकर खंडनी घेतात असा आरोप केला होता. तर कोणी म्हणालं की खुद्द बाळासाहेब ठाकरे नार्वेकर यांच्यावर चिडून आहेत. बाकी काही का असेना नार्वेकर यांच्या भोवतीच गूढवलय वाढतच गेल होतं. कितीही टीका झाली तरी उद्धव यांनी नार्वेकर यांची साथ सोडली नाही.

साध्याभोळ्या कार्यकर्ता असणाऱ्या शिवसैनिकांना मिलिंद नार्वेकर यांची कार्यशैली कधी कळलीच नाही.

कधीही थेट मातोश्रीत जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या पायाशी डोके टेकवणारा कार्यकर्ता नार्वेकरांच्या लॅपटॉपमध्ये भेटण्याची वेळ घ्यावी लागायला लागली तसा वैतागू लागला. महानगरपालिकेपासून ते विधानसभा लोकसभा पर्यंत प्रत्येक तिकीट वाटप नार्वेकर यांच्या छाननी नंतरच मिळत होतं.

उद्धव यांच्या कॅमेऱ्याची लेन्स म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी निभावली. 

यासाठी कधी टीकाटिपण्णी जरी झाली तरी ती मिलिंद यांनी आपल्या अंगावर घेतली. जर एखाद्या नेत्याचं तिकीट कापायचं आहे तर ती जबाबदारी नार्वेकर यांच्यावर ढकलण्यात येऊ लागली. तर कधी उद्धव यांना कोणाला भेटायचे नसेल तरी नार्वेकर यांच नाव पुढ करण्यात येऊ लागलं.

पंचिंग बॅग म्हणून काम केल्यामुळे उद्धव यांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढतच होता. 

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना पूर्ण पणे उद्धव ठाकरे यांच्या हातात आली. सगळे विरोधक आधीच नामोहरम झाले होते. उरल्यासुरल्याचा ही नार्वेकर यांनी बंदोबस्त केला.

उद्धव यांना भेटण्यापूर्वी मिलिंद नार्वेकरांची अभेद्य भिंत पार करावी लागेल हे सत्य शिवसेनेत सगळ्यांनी मान्य केल. प्रत्येक पक्षात मोठमोठ्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत.

मिलिंद नार्वेकर यांची उद्योगपतीपासून ते फिल्मस्टार यांच्यातील उठबस नजरेत भरणारी होती. आजही त्यांना थेट पंतप्रधान कार्यालयापासून ते भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात मुक्त वावर आहे. त्यांच्या घरचा गणपती पावतो अस म्हणत तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नार्वेकर यांच्या घरी गणपती काळात हजेरी लावायचे.

शिवसेनेचा कोणताही नेता काही काम घेऊन गेल्यावर मिलिंदला विचारून सांगतो हे उत्तर द्यायचा. मिलिंद नार्वेकर यांचं प्रस्थ  मोठ बनलं आहे याच हे द्योतक होतं. 

गेली अनेक वर्ष शिवसेनेचे समांतर सत्ताकेंद्र म्हणून त्यांची ओळख बनली आहे. मागच्या वर्षी पडद्यामागचे हे सूत्रधार पडद्याच्या पुढे आले. पहिल्यांदाच त्यांना शिवसेनेत सचिव या संघटनात्मकपदावर नेमणूक करण्यात आली. त्यावेळी विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी देखील त्यांचं नाव चर्चेत आल होतं. पण काही कारणानी ते माग पडलं.

आदित्य ठाकरे यांना राजकारणात सक्रीय करणे असो अथवा त्यांना वरळीमधून आमदारकी लढवणे असो या सगळ्या मिलिंद नार्वेकर यांच्या आयडिया होत्या अस म्हटल जात. युती तोडून कॉंग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी करणे व त्यातून मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या पदरात पाडणे या चर्चेत मिलिंद नार्वेकर यांचा सिंहाचा वाटा होता. 

मात्र आत्ताच्या परिस्थितीत सेनेवर आणि उद्धव ठाकरेंच्या पदावर आलेल्या संकटावर मिलिंद नार्वेकर मात देण्यात पक्ष प्रमुखांची मदत करतील का हे पाहावं लागेल.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.