त्यादिवशी इंग्लंडमध्ये एका भूरट्याने सिद्धू आणि गांगुलीच्या डोक्यावर बंदुक रोखली होती.

क्रिकेटचे अनेक किस्से मैदाना इतकेच मैदानच्या बाहेर देखील गाजलेले आहेत. असाच मैदानाबाहेरचा एक किस्सा सौरव गांगुली आणि नवजोत सिंग सिद्धूच्या जीवावर बेतणारा होता.

झाले असे होते की, १९९६ मध्ये भारतीय क्रिकेट टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती. तिथे भारत-इंग्लंड मध्ये ३ टेस्ट मॅचची सिरीज आयोजित केली होती. याच सिरीजमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि दी वॉल राहुल द्रविड यांनी टेस्टमध्ये पर्दापण केले होते. ३ मॅचच्या सिरीजमध्ये पहिल्याच मॅचमध्ये यजमान इंग्लंडने ८ विकेट्स राखून भारताचा दारूण पराभव केला होता.

दुसऱ्या मॅचमध्ये सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांना खेळण्याची संधी देण्यात आली. गांगुलीने आपल्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये १३१ रनांची खेळी खेळली शिवाय ३ विकेट्स घेत शानदार डेब्यू केले. तसेच द्रविडने सुद्धा ९५ रन्सची खेळी खेळत महत्वाची भूमिका बजावली होती. शेवटी ही मॅच ड्राॅ झाली होती.

सिरीजच्या शेवटच्या आणि आपल्या दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा दादाने दमदार खेळी केली होती. दुसऱ्या मॅचमध्ये गांगुलीने पहिल्या इनिंगमध्ये १३६, तर दुसऱ्या इनिंगमध्ये ४८ रन्सची खेळी केली होती. या खेळीने दादाने क्रिकेट जगताचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या सिरीज नंतर गांगुली स्टार खेळाडू बनला.

पण याच टेस्ट सिरीज दरम्यान सौरव गांगुली आणि नवजोत सिंग सिद्धू बरोबर एक अशी घटना घडली होती, जी आजपर्यंत ते दोघे विसरू शकले नाहीत.

आता विदेशात सिरीज आहे म्हटल्यानंतर मॅच संपल्यावर खेळण्याचा ताण कमी करायला आणि सहकारी खेळाडूंसोबत थोडी मजामस्ती करायला तिथल्या शहरात फिरायला जाणं साहजिकच असतं. तर असेच पहिली मॅच हरल्यानंतर सौरव गांगुली आणि नवजोत सिंग सिद्धू दोघे इंग्लंड फिरायला बाहेर गेले होते.

दोघे लंडनच्या मेट्रो मधून प्रवास करत होते. तेव्हा एका स्टेशनवर काही नशेडी तरुण मेट्रोमध्ये चढले आणि गांगुली व सिद्धू यांच्याकडे इशारा करत अश्लील टोमणे मारायला लागले. सिद्धूला वाटले की, भारत हरला म्हणून ते आपल्याला चिडवत आहेत.

याच दरम्यान त्यातील एका तरुणाने बिअरची बॉटल सिद्धूला मारली. बस मग सिद्धूचा पारा चढला आणि तो त्याला जाऊन भिडला. तेव्हा बाचाबाची होऊन प्रकरण मारामारीवर येणार होते, पण तेवढ्यात पुढचे स्टेशन येऊन ट्रेन थांबली आणि ती नशेडी मुलं खाली उतरली.

पण त्यातला एकजण पुन्हा ट्रेनमध्ये चढला आणि त्याने सिद्धूवर बंदूक रोखून धरली. मात्र सिद्धू त्याला न घाबरता त्याच्यावर तुटून पडला. तेवढ्यात गांगुली मध्ये पडला आणि त्याने सिद्धूला रोखले व म्हणला,

“तो नशेत आहे खरोखर गोळी मारून देईल.”

तेव्हा कुठ जाऊन सिद्धू शांत झाला आणि दोघांनी एकदाचा निश्वास सोडला. ट्रेन चालू झाली तसा तो तरुण लगेच ट्रेन मधून खाली उतरून गेला. त्यानंतर पुढच्या स्टेशनवर गांगुली अन सिद्धू पण उतरले आणि टॅक्सी करून दोघे हॉटेलला येऊन पोहचले.

सौरव गांगुलीने आपल्या ‘अ सेंच्युरी इज नॉट इनफ’ या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. तो सांगता म्हणतो की,

“बंदूक बघून एक क्षण तर अस वाटलं होतं की आज या ट्रेनमध्येच माझं आयुष्य संपणार आहे, पण आम्ही दोघे मोठ्या चपळाईने तिथून निसटण्यात यशस्वी झालो.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.