सिद्धू मुसेवालाच्या आधी पंजाबमध्ये सिप्पी सिद्धू मर्डर केस गाजली होती…

चंदीगढ मधलं एक गार्डन, रात्रीची वेळ होती. आजूबाजूला शांतता पसरली होती, रातकिड्यांचा किर्रर्र आवाज आणि काही घरात सुरू असलेले टीव्ही, असं सगळं वातावरण होतं. तेवढ्यात ही शांतता भंग करणारे काही आवाज हवेत घुमले. त्यातले काही गोळ्यांचे होते आणि एक मुलीच्या किंचाळण्याचा.

आजूबाजूच्या लोकांनी लगेच पोलिसांना बोलावलं, पोलिस लगेचच पोहोचले तर एक तरुण मुलगा तिथं रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्यावर चार-पाच गोळ्या फायर झाल्या होत्या. मृतदेहाच्या जवळ एक मोबाईल होता, त्यावरुन पोलिसांनी त्या मुलाची ओळख पटवली आणि त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला.

त्याची ओळख पटली तेव्हा पोलिसांना समजलं की, हा नॅशनल लेव्हल शुटर सिप्पी सिद्धू आहे, जो दोनच दिवसांपूर्वी कॅनडामधून परत आला होता. 

सिद्धूच्या घरी फोन केला तेव्हा त्याची आई तो अजून घरी कसा आला नाही, या चिंतेत प्रार्थना करत होती. पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावलं आणि मुलाच्या मृत्यूची बातमी त्यांना समजली.

सिद्धूच्या घरचं प्रस्थ काही छोटं नव्हतं. त्याचे आजोबा पंजाब-हरियाणा हायकोर्टचे माजी न्यायाधीश होते, वडील हायकोर्टात माजी ऍडव्होकेट जनरल होते आणि तो स्वतः कॉर्पोरेट वकील होता. त्यामुळं पोलिसांवर तपासासाठी दबाव येणं साहजिकच होतं. त्यांनीही लगेच सूत्र हलवली.

प्राथमिक तपासात पोलिसांना दोन पुरावे सापडले.

जिथं खून झाला तिथून जवळच असणाऱ्या एका घरातल्या महिलेनं गोळ्यांचे आवाज आणि एका मुलीच्या किंचाळण्याचे आवाज ऐकले होते. ती जेव्हा धावतपळत आपल्या बाल्कनीमध्ये गेली तेव्हा तिला एक मुलगी घाईनं एका पांढऱ्या गाडीपाशी जाताना दिसली, मात्र या मुलीला तिनं पूर्णपणे पाहिलं नव्हतं.

दुसऱ्या बाजूला सिद्धूच्या घरातले आमच्या मुलाच्या खुनामागं कल्याणी सिंह आहे, असं उघडपणे सांगू लागले. पोलिसांनी ही कल्याणी सिंह कोण आहे, याचा तपास करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, कल्याणीची आई कोर्टात न्यायाधीश होती. त्यांचे आणि सिद्धूच्या कुटुंबाचे संबंधही जवळपास ३० वर्षांपासूनचे होते.

दोन्हीकडची घरं तालेवार होती, त्यामुळं तपासात कोणतीही घाई करणं पोलिसांना परवडणारं नव्हतं. त्यात कल्याणीवर आरोप ठेवायला कुठलाही ठोस पुरावाही नव्हता. दबाव वाढत गेला आणि अखेर ही केस गेली, सीबीआयकडे.

प्राथमिक तपासात सीबीआयलाही कुठला ठोस पुरावा सापडत नव्हता, त्यामुळं त्यांनी थेट पेपरमध्ये जाहिरात देण्याचं ठरवलं. जो कुणी या प्रकरणातला पुरावा आणून देईल त्याला ५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.

मात्र काहीच हाती लागलं नाही. या तपासात सीबीआयनं चार वर्ष घालवली, २०१५ मध्ये सिद्धूची हत्या झाली, २०१६ मध्ये तपास सीबीआयकडे आला, पण आरोपी अजूनही मोकाटच होता. सीबीआयनं २०२० मध्ये कोर्टात अनट्रेस रिपोर्ट सादर केला, तेव्हा कोर्टानं त्यांना फटकारलं आणि पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले.

तिकडं चंदीगढमधलं वातावरणही पेटलं होतं, लोकांनी रस्त्यावर एकत्र येत सिद्धूच्या हत्याऱ्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्यात यावं यासाठी आंदोलन झालं. सीबीआयवरचा दबाव वाढत होता. 

त्यांनी कल्याणी सिंहला ताब्यात घेतलं आणि तिची पॉलिग्राफी टेस्ट केली, मात्र यातही त्यांना काहीच ठोस सापडलं नाही. यानंतर त्यांनी फॉर्म्युला वापरला तो, ओळख परेडचा. बाल्कनीतून पांढऱ्या गाडीत बसणाऱ्या मुलीला पाहणाऱ्या महिलेनं संशयितांच्या ओळख परेडमध्ये कल्याणी सिंहला ओळखलं आणि पोलिसांनी फास आणखी आवळला. 

त्यातच काही प्रत्यक्षदर्शींनी थेट सीबीआयशी संपर्क साधला आणि तिच्याविरुद्ध पुरावे मिळत गेले.

अखेर सीबीआयनं तब्बल वर्षांनी जून २०२२ मध्ये कल्याणीला सिद्धूच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली.

तिनं सिद्धूची हत्या करण्यामागचं कारण होतं, प्रेमप्रकरण आणि बदनामी.

सीबीआयच्या म्हणण्याप्रमाणे, सिद्धू आणि तिचे प्रेमसंबंध होते. तिची इच्छा होती की सिद्धू आणि आपलं लग्न व्हावं. मात्र सिद्धूच्या घरातून यासाठी परवानगी नसल्यानं तो नकार देत होता. तिनं सतत लग्नासाठी मागणी केल्यानंतर रागाच्या भरात त्यानं कल्याणी आणि आपले काही खाजगी फोटो तिच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवले. साहजिकच कल्याणीचा पारा चढला.

तिनं सिद्धू कॅनडामधून परत आल्यावर त्याला वेगवेगळ्या नंबरवरुन कॉल करुन भेटण्याची मागणी केली. अखेर तो तिला भेटायला गेला मात्र ही भेट अखेरची ठरली. आपली बदनामी केल्याच्या रागातून कल्याणीनं सिद्धूची हत्या केली असा आरोप सीबीआयनं तिच्यावर ठेवला.

कल्याणीच्या कुटुंबीयांनी मात्र ती निर्दोष असल्याचा दावा केला. सोबतच कल्याणी हत्त्येत सहभागी असलीच, तरी नेमका खून कोणी केला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं सिद्धूच्या खुनामागची मिस्ट्री पूर्णपणे उलगडलेली नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.