ब्रिटिशांची सागरी ताकद तोडण्यात भारताच्या सिंधिया कंपनीने एकहाती लढा दिला होता

ब्रिटिश. नाव घेतलं तरी इतिहासातील त्या कालखंडात आपण आपोआप पोहोचतो. आपल्यातील अनेकांनी तो कालखंड अनुभवला नसला तरी त्या काळाचं वर्णन आपल्या इतिहासात इतक्या प्रभावीपणे केलंय की त्याच्या वेदना प्रत्येकाला जाणवतात.

इंग्रजांची जाचकता आणि त्याला उत्तर देताना भारतीय क्रांतिकारकांनी उभारलेल्या क्रांत्या यांचा अभ्यास प्रत्येकाने शाळेपासून केलाय. यामध्ये ब्रिटिशांविरुद्धचं जमिनीवरील बंड सर्वांनी अभ्यासलंय मात्र सागरी बंड अगदी बोटावर मोजता येईल इतक्या लोकांना माहिती असेल.

ब्रिटिशांची देशातून हकालपट्टी करायची असेल तर त्यांचं मनोबल तोडणं गरजेचं होतं. हे मनोबल केव्हा तुटेल? जेव्हा त्यांचं ‘आर्थिक खच्चीकरण’ केलं जाईल. कारण अर्थार्जन हेच त्यांची सत्ता भारतात बळकट होण्याचं मूळ होतं. 

ब्रिटिशांचं आर्थिक खच्चीकरण करण्यासाठी भारतीयांनी ‘स्वदेशी चळवळ’ सुरु केली. या चळवळीचा भाग होण्यासाठी अनेक स्वदेशी कंपन्या उभारल्या जाऊ लागल्या. यात अशी एक कंपनी स्थापन झाली जिने थेट ब्रिटिशांच्या सागरी व्यापाऱ्याला आव्हान दिलं. या कंपनीचं नाव होतं…

सिंधिया स्टीम नेविगेशन कंपनी लिमिटेड

भारताच्या सगळ्यात जुन्या शिपिंग कंपन्यांमध्ये या कंपनीचं नाव घेतलं जातं. गुजरातचे व्यापारी वालचंद हीराचंद दोषी यांनी त्यांच्या काही सवंगड्यांसोबत मिळून ही कंपनी सुरु केली होती. नरोत्तम मोरारजी, किलाचंद देवचंद आणि लल्लूभाई श्यामल दास अशी त्यांच्या भागीदारांची नावं.

वालचंद यांनी तत्कालीन महाराजा माधौराव सिंधिया यांच्याकडून त्यांचं जहाज खरेदी केलं. माधौरावांनी १८९० च्या दशकात कॅनडियन पॅसिफिक कंपनीकडून ते विकत घेतलं होतं. हे जहाज घेतलं तेव्हा त्याचं नाव ‘SS रॉयल्टी’ असं होतं. पहिल्या महायुद्धात जखमी झालेल्या भारतीय सैनिकांच्या उपचारसाठी ‘जहाज हॉस्पिटल’ म्हणून माधौरावांनी याचा वापर केला होता. 

जेव्हा माधौरावांनी त्याला विकायला काढलं तेव्हा वालचंद यांनी ते खरेदी केलं आणि SS रॉयल्टी’ वरून ‘RMS इम्प्रेस ऑफ इंडिया’ असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. 

WhatsApp Image 2022 06 11 at 9.43.40 PM

डोक्यात प्रॉपर बिजनेस प्लॅन आखूनच वालचंद यांनी जहाजाची खरेदी केली होती. 

पहिल्या महायुद्धादरम्यान जगभरातील शिपिंग इंडस्ट्रीने मोठी झेप घेतली होती ज्यामुळे सागरी व्यापाराला चालना मिळाली होती. शिवाय प्रत्येक देशांनी आपली सागरी शक्ती बळकट करण्यावर भर द्यायला सुरुवात केली होती. 

या स्थितीकडे बघून वालचंद यांनी शिपिंग व्यवसायात उतरण्याचं ठरवलं होतं. 

मात्र हे तेवढं सोपं नव्हतं…

हा तो काळ होता जेव्हा सागरी व्यापारात ब्रिटिश बलाढ्य होते. पेनिनसुलर अँड ओरियंटेशन स्टीम नेविगेशन कंपनी, ब्रिटिश इंडिया स्टीम नेविगेशन कंपनी या कंपन्या म्हणजे विषय संपला. त्यात भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. कुठल्याही भारतीयाने शिपिंग क्षेत्रात यायचा प्रयत्न केला तर राजकीय अडचणी उपस्थित करून ब्रिटिश त्यांची कंपनी बंद पडायचे. 

वल्लियप्पन पिल्लई यांच्यावर नुकताच तसा प्रसंग ओढवला होता…  

वल्लियप्पन पिल्लई म्हणजे बाळ गंगाधर टिळकांचे शिष्य आणि तामिळ स्वातंत्र्य सैनिक. त्यांनी १० लाख रुपये खर्च करत १९०६ मध्ये स्वदेशी स्टीम नेविगेशन कंपनी सुरु केली होती. त्यांचं जहाज तामिळनाडूच्या तूतूकोरिन ते कोलंबोपर्यंत प्रवास करत होतं. मात्र जेव्हा ब्रिटिशांच्या नजरेत ही गोष्ट आली तेव्हा त्यांनी राजकीय खेळी करत पिल्लई यांची कंपनी बंद पाडली.

पिल्लई यांचं जहाजावरील मालकत्व संपुष्ठात आणलं, त्यांचं जहाज ब्रिटिश शिपिंग कंपनीत पाठवलं आणि हे सर्व होत असताना पिल्लई यांना जेलमध्ये ठेवलं गेलं.

वालचंद हे सर्व जाणून होते तरी त्यांनी रिस्क घेण्याचं ठरवलं आणि नरोत्तम मोरारजी यांच्यासोबत १९१९ साली ‘सिंधिया स्टीम नेविगेशन कंपनी लिमिटेड’ कंपनी सुरु केली. कंपनी सुरु होताच ५ एप्रिल १९१९ साली RMS इम्प्रेस ऑफ इंडिया या जहाजानं यूनाइटेड किंगडमपर्यंत प्रवास केला. 

भारत ते युरोप असा पल्ला गाठणारी सिंधिया ही पहिली भारतीय कंपनी बनली.

(भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच दिवसाची आठवण म्हणून १९६४ पासून दरवर्षी ५ एप्रिल हा दिवस ‘सागरी दिवस’ म्हणून आजतागायत साजरा केला जातो.)

या घटनेकडे स्वदेशी चळवळीचं मोठं यश म्हणून बघितलं गेलं. महात्मा गांधींनी स्वदेशी चळवळीबद्दल लिहिताना हरिजन आणि यंग इंडिया या वृत्तपत्रांमधून ही घटना सांगितली. यातून दोन गोष्टी साध्य झाल्या… एक म्हणजे सगळ्या भारतीयांना यातून प्रोत्साहन मिळालं आणि दुसरं म्हणजे ब्रिटिशांना चेतावणी दिली गेली.  

त्याकाळी हज यात्रेला जाण्यासाठी जहाज हेच एकमेव साधन होतं. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या यात्रेला जायचे. म्हणून सिंधिया कंपनीने खास यात्रेकरूंसाठी जहाज सेवा सुरु केली होती.

पण ब्रिटिशांनी लगेच कुरापती करायला सुरुवात केली…

ब्रिटिशांनी त्यांची कंपनी P&O ला सिंधिया कंपनीविरुद्ध स्पर्धेत उतरवलं.  P&O ला राजकीय पाठबळ होतं म्हणून या कंपनीकडून सिंधिया कंपनीवर दबाव आणला जाऊ लागला. यामुळे नाईलाजास्तव सिंधिया कंपनीला त्यांची जहाजं कार्गो सर्व्हिसेसमध्ये उतरवावी लागली. 

पुन्हा नवीन आव्हान समोर उभंच होतं. ब्रिटिशांनी भाडे देण्यावरून आणि सागरी रस्त्यांवरून वाद सुरु केला होता. या वादामुळे सिंधिया कंपनीचा व्यापार प्रभावित होऊ लागला होता. 

कंपनी बंद पाडण्यासाठी ही कारस्थानं केली जात होती.

मात्र सिंधिया कंपनी टिकून राहणं गरजेचं होतं. स्वदेशी चळवळ टिकवून ठेवण्यासाठी कंपनी मोठी भूमिका बजावू लागली होती. संपूर्ण भारतीयांच्या अस्मितेचा हा मुद्दा झाल्याने माघार घेणं अशक्य होतं.

अशात सिंधिया कंपनीने मधला मार्ग निवडला… 

सिंधिया कंपनीने १९२३ मध्ये P&O आणि ब्रिटिश इंडिया या दोन्ही शिपिंग कंपन्यांशी करार केला. या करारामुळे सिंधिया कंपनीवर काही निर्बंध लावण्यात आले. निर्बंधांनुसार सिंधिया कंपनी येत्या १० वर्षांपर्यंत फक्त भारतीय किनारपट्टीवर व्यापार करू शकणार होती. इतर देशांशी तिचा संपर्क तोडण्यात आला होता. 

दहा वर्षांनी हा करार संपुष्ठात आला. त्यानंतर सिंधिया कंपनी पुन्हा आपल्या सागरी कक्षा विस्तारू लागली. काही काळातच दुसरं महायुद्ध सुरु झालं तेव्हा ब्रिटनची अवस्था बिघडली आणि ब्रिटिशांनी स्वतःच्या देशावर लक्ष केंद्रीत केलं. 

अशा परिस्थितीत सिंधिया कंपनीने १९४१ मध्ये पाहिलं शिपबिल्डिंग यार्ड उभारलं. भारताचं सागरी क्षेत्रावर वर्चस्व वाढत चाललंय, याचा थेट इशारा यातून ब्रिटिशांना देण्यात आला.

सागरी क्षेत्रात सिंधिया कंपनीने ब्रिटिशांविरुद्ध तगडी लढत दिली. सिंधिया कंपनीच्या या योगदानामुळे ब्रिटिशांचं आर्थिक खच्चीकरण शक्य झालं होतं. परिणामी ब्रिटिशांनी भारतातून निघून जाणं योग्य समजलं आणि भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. 

WhatsApp Image 2022 06 11 at 9.43.44 PM

स्वतंत्र भारतात सिंधिया कंपनीची अजून भरभराट झाली. भारत सरकारने मदत पुरवायला सुरुवात केली. १९४८ मध्ये ८ हजार टन वजनाचं ‘जलासुहा’ नावाचं जहाज सिंधिया कंपनीच्या शिपबिल्डिंग यार्डमध्ये बांधलं गेलं. कंपनीच्या व्यापारी कक्षा अमेरिका आणि युकेपर्यंत विस्तारल्या गेल्या. ६० चं दशक येता येता कंपनीची मालवाहू जहाजं कॅनडा, जर्मनी आणि पोलंडपर्यंत जाऊ लागली. 

कालांतराने भारताच्या इतर शिपिंग कंपन्या देखील सिंधिया कंपनीत सामील करण्यात आल्या. इंदिरा गांधींनी कंपनीच्या अनेक नव्या जहाजांचं लॉन्चिंग केलं. 

मात्र बदलत्या काळानुसार सिंधिया कंपनी अपग्रेड होऊ शकली नाही आणि हळूहळू अस्तित्व गमावून बसली…

आज अनेक शिपिंग कंपन्या भारताच्या सागरी व्यापारात टॉपवर आहेत. मात्र यात सिंधिया कंपनीचं नाव  खूप आदराने आणि अभिमानाने घेतलं जातं. कारण सिंधिया कंपनीने ब्रिटिशांविरुद्ध एकहाती लढा दिला होता. 

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.