यान कोसळणार म्हणून अख्खा महाराष्ट्र एक झाला होता, 1980 च्या आसपासची ती गोष्ट.
1980 च्या सुमाराची गोष्ट. तारखेवर लक्ष ठेवून असणाऱ्यासाठी तंतोतत तारिख सांगायची झाली तर ती तारिख होती 11 जुलै 1979. तेव्हा यान कोसळणार होतं. यानाचं नाव स्कायलॅब. ते अमेरिकेच होतं आणि संपर्क क्षेत्रातून बाहेर गेलेलं. कधी कुठं आणि कस पडणार हे अमेरिकेलापण माहित नव्हतं.
त्यामुळं जगात अफवा सुरू झाली की ते आपल्याच गावावर पडणार. तेव्हा फेसबुक, ट्विटर, चोवीस तास माहिती देणारे न्यूज चॅनेल यातलं काहीच नसणारं लोकांनापण टाईमपास नव्हता. इतकं काही नसताना देखील महाराष्ट्र या अफवेच्या तावडीतून सुटला नाही.
महाराष्ट्रातपण या अफवेनं जोर धरला. अफवा जोरात चालली. अगदी कित्येक दिवस चालली. देवाच्या कृपेनं तेव्हा आम्ही नव्हतो. पण देवाच्याच कृपेन आमचे वडिल तेव्हा आमच्याएवढे होते. मग वडिलांना विचारून, त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत आठवणी ताज्या करुन जे काही सांगितलं ते आम्ही लिहावं म्हणलं. त्याच काय आहे कंटेट मिळत नसला की आम्हाला हे अस सुचतं, त्याला काळाचं बंधन राहत नाही. असो, महाप्रसाद असल्याप्रमाणे याचा लाभ घ्यावा हि आपणास नम्र विनंती.
तर तो 1979 चा सुमार. तेव्हा क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकायचा होता. गावात रेडिओ नावाची गोष्ट देखील नव्हती. असलीच तर ते ऐकायला पण लायसन्स लागायचं. लायसन्स नसताना रेडिओ ऐकला तरी लोकांना काहीच कळायचं नाही तरी लोक प्रामाणिक असल्याने रेडिओ लावायची नाहीत. असो तर मुळ मुद्दा या काळात एक बातमी जोरात पसरली होती.
“यान पडणार यान पडणार, आपल्या गावावं यान पडणार”
झालेलं अस की अमेरिकेच्या नासाचं यान स्कायलॅब हे 1974 साली अवकाशात गेलेलं. तिथे गेल्यावर त्याच्यात बिघाड झाला. बिघाड म्हणजे सुर्यावर वादळ आलं आणि त्याचा परिणाम या यानावर पडला. यानात गडबड झाली. मग यानं पृथ्वीकडे झुकायला लागलं. दुरूस्ती करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि नासानं डिक्लेर केलं की हे यान पडू शकतं. बर हे यान पण काय बारकं नव्हतं नऊ मजल्यांच्या बिल्डिंगएवढ्या या यानाच वजन 78 टनावर जात होतं.
पृथ्वीवरच्या कुठल्याही भागात अमुक अमुक तारखेला यान पडणार.
अमेरिकेन काय केलं तर प्रत्येक देशातल्या दूतावासात एक एक्स्ट्रॉ माणूस ठेवला. भारतातल्या दूतावास असणाऱ्या माणसाचं नाव होतं, थॉमस रोबालोविच. या माणसाने भारतातल्या तेव्हाच्या सरकारी मिडीयाबरोबर बोलताना सांगितल, यान पडणार हे खरय. ते पडणार हे फिक्सच झालय पण एक लक्षात ठेवा यान भारतात पाडायचं का अमेरिकेत असा प्रश्न आला तर ते हमखास अमेरिकेच्या जमिनीवर पाडलं जाईल.
हितच खरी मेख होती. तो माणूस होता अमेरिकेचा. बोललं त्याच्या शंभरटक्के उलटं करणार हि खात्री होती. रेडिओ, पेपर मधनं हि बातमी लागली पण लोकांना समजलं आत्ता भारताच काय खऱ्यात नसतय गड्या. लोकांनी एकमेकांच्या कानावर घालायला सुरवात केली की भारतात यान पडणार, मग महाराष्ट्रवाले म्हणले महाराष्ट्रात पडणार, मग पश्चिम महाराष्ट्रवाले म्हणले पश्चिम महाराष्ट्रात पडणार, मराठवाडावाले म्हणले मराठवाड्यात पडणार.
प्रत्येकाचं ठाम मत झालं की यान जगभर काशी करुन शेवटी हे यान आपल्याच गावात #य घालणार.
हि बातमी गावात आली. पडणार हे फिक्स होतं. कुठपण पडणार हे पण फिक्स झालेलं. त्यात त्या काळात यान काय असत वैगेर समजणारी माणसं नव्हती. त्यांना फक्त इतकच माहिती झालेलं की आपल्या गावात या या तारखेला आकाशातनं कायतर पडणाराय आणि आपण मरणाराय. त्या वेळी माणसं नेमकी एकमेकाला काय म्हणायची अस विचारल्यावर एक उत्तर मजेशीर होतं, माणसं घरातल्या, भावकीतल्या माणसांना माळरानावर एकटं जावून देत नव्हती. माणसं म्हणायची,
“काय व्हायचाय ते सगळ्यांच एकदम होवु दे. सगळी एकत्र मरू. लांब जावू नका.
आत्ता यात आपण मरायचो आणि बाकीचे वाचायचे हे लॉजिक होतं का सगळीच एका फटक्यात मरुन जावेत हे लॉजिक होतं हे गाववाल्यांनाच माहिती.
तसच गावाकडच्या माणसांनी मुंबईत काम करणाऱ्यांना परत बोलवून घ्यायची पत्र पाटवायचं फॅड काढल्यालं. काय व्हायचं ते डोळ्यासमोर होवूदे हि मरतानाची शेवटची इच्छा. थोडक्यात काय तर आपण मरायचं आहे हे सगळ्यांनी फिक्स केलेलं. जसा जसा दिवस जवळ येत होता तशी सगळ्यांची फाटू लागलेली. साहजिक होतं म्हणा.
शेवटी तो दिवस उजाडला.
म्हणजे तो दिवस नावालाच उजाडला. रात्रभर सगळ गाव जागं होतं. किती वाजता पडणार आणि किती वाजता मरणार याची वाट बघायचा कार्यक्रम चालू होता. 12 जुलैच्या त्या दिवशी भारतातली पोलीस हायअलर्टवर ठेवण्यात आली होती. आत्ता मरणायच्या स्थितीतपण पोलीस हायअलर्टवर होते हे विशेष. दिवस जावू लागला.
माणसं आकाशात बघत होती. कधी येतय, कधी जळतय.
आणि नासानं शेवटच्या क्षणाला सांगितलं जे काय यानाचा मॅटर असेल तो भारत आणि आस्ट्रेलियादम्यानच्या समुद्रात पडणार आहे. ब्रेकिंग न्यूजचा जमाना नसल्याने तात्काळ बातमी कळण्याचा संबध नव्हता. अखेर पश्चिम ऑस्ट्रेलियातल्या एस्पेरंस भागात हे यान कोसळलं. यान कोसळलं पण जेवढी हवा या यानाने केलेली ते फुसक निघालं. एकसुद्घा माणूस यात मेला नाही. साधी चिमणी, कावळा मारण्याच कष्ट देखील या यानाने घेतलं नाही. यान पडल्यावर अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी आस्ट्रेलियाची माफी मागितली.
दूसऱ्या बाजूला हे यान ज्या गावावर कोसळलेले तिथल्या ग्रामपंचायतीने अमेरिकेकडं 400 डॉलरची नुकसान भरपाई मागितली. आत्ता सांगण्यासारखी महत्वाती गोष्ट म्हणजे अमेरिकेनं हे 400 डॉलर अजून दिले नाहीत.
हे ही वाचा.
- तेव्हा एकवीस नख्यांच्या कासवामुळं आमच्या खात्यात कोटभर रुपये जमा होणार होते.
- तुमच्या गणपतीनं दुध पिलेलं का ? आज या घटनेला २३ वर्ष झाली !!
- रात्रीच्या अंधारात तुम्हाला कधी हाकामारीचा अनुभव आला आहे का ?
तुम्ही खुप छान माहिती शेअर करता. तुम्ही तुमचं ॲप तयार करा ना.
मस्त लिहिले आहे…आवडले…खूपच छान
याविषयी तेव्हा सर्व लोक बीबीसीच्या न्यूज ऐकायचे. बीबीसीच्या एका प्रतिनिधीचे नाव तेव्हा घरोघरी पोहोचले. बीबीसीचा रेफरन्स देऊन लोक अफवा देखील पसरवाचे जसे आता नासाच्या रेफरन्स देऊन पसरवतात. अनेक लोकांनी तुफान पैसे खर्च केले. अनेक गावात तर रईस नोटांची सिगारेट करून आढायचे.