आतापर्यंत ८ चित्त्यांचा मृत्यु: भारतातले चित्ते वाचवायचा नवा उपाय यशस्वी ठरेल ?
तारीख ११ जुलै २०२३, मध्य प्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये एका चित्त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. एकाच आठवड्यात २ चित्त्यांचा मृत्यू झाल्याची ही बातमी चित्त्यांच्या मायदेशी म्हणजेच नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेपर्यंत पोहोचली. दक्षिण आफ्रिकेतल्या चित्त्यांवर अभ्यास करणाऱ्या २ शास्त्रज्ञांनी चित्त्यांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी चित्त्यांच्या मृत्यूचं संभाव्य कारण सांगितलं. त्यानंतर सरकारने एक परिपत्रक जारी केलं.
त्यातून चित्त्यांच्या मृत्यूचं जे कारण सांगितलं जातंय ती एक अफवा आहे, असं सरकारनं स्पष्ट केलं. पण मध्य प्रदेशच्या मुख्य वनसंरक्षक जे. एस. चौहान यांनी मात्र शास्त्रज्ञांनी सांगितलेलं सिरिअसली घेत एक निर्णय घेतला. त्यानंतर चर्चेत आलं ते म्हणजे रेडिओ कॉलर … दक्षिण आफ्रिकेतल्या शास्त्रज्ञांनी चित्त्यांच्या मृत्यूचं कोणतं कारण सांगितलं ? मध्य प्रदेशच्या मुख्य वनसंरक्षकांनी कोणता निर्णय घेतला ? आणि चित्ता प्रकल्पाचं पुढे काय होणार ? ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत…
७० वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झालेल्या चित्ता या प्राण्याचं कुनो नॅशनल पार्कमध्ये पुनर्वसन करण्यात येतंय. त्यासाठी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून २० चित्ते भारतात आणण्यात आले होते. त्यातल्या एका मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर चित्त्यांची संख्या झाली होती २४.
पण मागील ४ महिन्यांत ८ चित्त्यांचा मृत्यू झालाय.
कुनो नॅशनल पार्कमध्ये ११ जुलै ते १४ जुलै या चारच दिवसांच्या कालावधीत २ प्रौढ चित्त्यांचा मृत्यू झाला. तेजस व सुरज या दोन चित्त्यांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी चित्ता पुनर्वसन प्रकल्पावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. ११ जुलैला तेजस या चित्त्याचा मृत्यू झाला. तेव्हा त्याच्या मानेवर काही जखमा झाल्याचं आढळून आलं होतं. त्याआधी एका मादी चित्त्यासोबत तेजसचा हिंसक संघर्ष झाला होता. त्या हिंसक संघर्षावेळी झालेल्या जखमांमुळे तेजसचा मृत्यू झाला अशी शक्यता मध्य प्रदेशच्या मुख्य वनसंरक्षकांनी व्यक्त केली होती.
त्यानंतर दोनच दिवसांनी १४ जुलैला चित्त्यांवर लक्ष ठेवणाऱ्या टिमला गस्तीवर असताना सुरज हा चित्ता मृतावस्थेत आढळून आला.
सुरजच्याही मानेवर व मागील बाजूस जखमा दिसून आल्या. त्याच्या मानेवर असणाऱ्या जखमेवर माशा भूणभूण करत होत्या. या दोन चित्त्यांच्या मृत्यूंवर दक्षिण आफ्रिकेतले चित्ता अभ्यासक व चित्त्यांचं स्थलांतर ज्यांच्या देखरेखीत करण्यात आलं त्या एड्रीअन टोरडिफ व माईक टोफ्ट यांनी प्रतिक्रिया दिली. या दोन्ही अभ्यासकांनी मृत चित्त्यांच्या अंगावरील जखमांचं व्हिडिओच्या माध्यमातून निरिक्षण केलं होतं. दोघांनीही चित्त्यांच्या मृत्यूचं एकच संभाव्य कारण सांगितलं.
एड्रीअन टोरडिफ यांच्या मते, चित्त्यांच्या गळ्यात बांधण्यात आलेलं रेडिओ कोलर हेच तेजस व सुरज या दोन चित्त्यांच्या मृत्यूचं कारण असू शकतं. दक्षिण आफ्रिकेत हवामान कोरडं असतं. भारतात सध्या मान्सून सुरु आहे. त्यामुळे हवामानात ओलावा आहे. चित्त्यांच्या गळ्याला रेडिओ कोलरमुळे जखमा होऊ शकतात.
कुनो नॅशनल पार्कमधल्या इतर चित्त्यांनाही असा त्रास होतोय का हे तपासलं पाहिजे, असं टोरडिफ म्हणाले.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतले दुसरे चित्ता अभ्यासक माईक टोफ्ट यांनीही रेडिओ कोलरमुळेच चित्त्यांचा मृत्यू होतोय, अशी शक्यता व्यक्त केली. माईक टोफ्ट हे लवकरच भारतात येणार आहेत. कुनो नॅशनल पार्कला भेट देऊन टोफ्ट तिथल्या वनाधिकाऱ्यांना चित्त्यांच्या संवर्धनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. पावसात सतत भिजल्याने चित्त्यांची त्वचा पातळ होते. अशावेळी त्यांच्या गळ्यात रेडिओ कोलर असेल तर त्यांच्या मानेला जखम होऊ शकते. त्या जखमेवर माश्या बसतात. परिणामी चित्त्यांना इन्फेक्शन होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो, असं माईक टोफ्ट यांनी म्हटलंय.
या दोन चित्ता अभ्यासकांनी आपलं मत व्यक्त केल्यानंतर तिकडे भारत सरकारनेही एक परिपत्रक जारी केलं.
नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या २० चित्त्यांपैकी ५ प्रौढ चित्त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झालाय. रेडिओ कोलरमुळे चित्यांचा मृत्यू होतोय, याबाबत कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. रेडिओ कोलरमुळे चित्त्यांचा मृत्यू होतोय या अफवा आहेत, तसंच काहींचे वैयक्तिक मत आहे, असं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परिपत्रकात म्हटलंय.
आता हे रेडिओ कोलर म्हणजे नेमकं काय, तर प्राण्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तसंच त्यांच्या आरोग्याची माहिती गोळा करण्यासाठी रेडिओ कोलरचा वापर केला जातो. कुनो नॅशनल पार्कमधल्या चित्त्यांच्या गळ्यात रेडिओ कोलर बांधण्यात आलंय. त्यामुळे चित्त्यांचे ठिकाणच नाही तर त्यांची शारीरिक स्थिती किंवा त्यात होणाऱ्या बदलांची माहिती कुनो नॅशनल पार्कमधल्या वन अधिकाऱ्यांना मिळते. कोलर आयडीमुळे चित्ता मानवी वस्तीत जाणार नाही, याची काळजीही घेतली जाते.
आता मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक जे. एस. चौहान यांनी कुनोतल्या १० चित्त्यांच्या गळ्यातलं रेडिओ कोलर काढणार असल्याचं जाहीर केलंय.
चौहान यांनीही चित्त्यांच्या मृत्यूसाठी रेडिओ कोलर कारणीभूत ठरू शकतं, अशी शक्यता व्यक्त केलीये. दक्षिण आफ्रिकेतल्या शास्त्रज्ञांनी जे कारण सांगितलंय ते चौहान यांनी नाकारलं नाही. चित्त्यांच्या रेडिओ कोलर काढण्यासाठी भरपूर कालावधी लागेल, असं चौहान यांनी सांगितलंय.
चित्ता अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार चित्त्यांच्या गळ्यातील रेडिओ कोलर काढल्यास काही अडचणी येऊ शकतात.
कुनो नॅशनल पार्कमधल्या चित्त्यांच्या हालचालींवर तसंच त्यांच्या आरोग्यावर सध्या रेडिओ कोलरच्या सहाय्याने लक्ष ठेवलं जातंय. रेडिओ कोलर काढल्यास चित्त्यांच्या हालचाली व त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवता येणार नाही. सध्या कुनो नॅशनल पार्कमध्ये १५ प्रौढ चित्ते तर १ शावक असे एकूण १६ चित्ते आहेत. कुनो नॅशनल पार्कमधली जागा चित्त्यांसाठी अपूरी पडत असल्याचा दावाही काही चित्ता अभ्यासकांनी केला होता.
रेडिओ कोलर काढल्यास एखादा चित्ता मानवी वस्तीत आला तर वनाधिकाऱ्यांना त्या चित्त्याला सापडणे अवघड जाऊ शकते.
परिणामी मनुष्य व चित्ता यांच्यात संघर्ष होऊन चित्त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रधानमंत्री कार्यालयाकडून सध्या चित्ता प्रकल्पावर विशेष लक्ष दिलं जातंय. दरम्यान, चित्त्यांचा मृत्यू होण्यासाठी इतरही अनेक कारणं कारणीभूत आहेत.
एका अभ्यासानुसार, चित्त्यांची पिल्लं मोठ्या कष्टाने जगतात. हे या प्राण्याचे नामशेष होण्याचे मुख्य कारण आहे. मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक जे.एस.चौहान यांच्या मते, जंगलात चित्त्यांची पिल्लं जगण्याची शक्यता फक्त १० ते २० टक्के इतकीच आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या एका चित्ता मादीने ४ पिलांना जन्म दिला होता. त्यातली ३ पिल्लं जन्मतःच दुबळी असल्यामुळं दगावली होती. आता त्यापैकी फक्त एकच पिल्लू जीवंत आहे.
अशा परिस्थितीत कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांना जगवणं व त्यांची संख्या वाढवणं हे सध्या केंद्र सरकारसमोर एक मोठं आव्हान आहे. याशिवाय चित्त्यांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे इतर प्राण्यांकडून त्याची होणारी शिकार आहे. सिंह, बिबट्या, हायना आणि कोल्हा या प्राण्यांसोबत त्याचा संघर्ष झाल्यास चित्त्याला जखमा होतात. त्या जखमांमधून इन्फेक्शन झाल्यानेही चित्त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे चित्ता प्रकल्पावर केंद्र सरकारला अजून जास्त लक्ष द्यावं लागण्याची शक्यता आहे.
भारतात चित्त्यांच पुनर्वसन करण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत, त्या प्रयत्नांना यश येईल का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करुन कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.