काय बे..! सोलापूरची वैशिष्ठे वाच बे…

 "जा बे किल्ल्यात" कुटं गेलता बे ! किल्ल्यातं

चौपाडात दोन लहान मुलं गोट्या खेळत होती, अचानक दोघात भांडण झालं, सोलापूरच्या भांडणाची सुरवात खतरनाक शिवीनेच होते,

“ए येड्या xxxxxx, तुझ्या xxxxx, वगरे वगरे.

हे सगळ्याच गावात होतंच,

पण सोलापूरच्या,  “जा बे किल्ल्यात” कुटं गेलता बे ! किल्ल्यातं?

हे फक्त सोलापुरातच विचारलं जातं. असंख्य प्रकाराने ह्या किल्ल्याचा वापर दिवसभर कुठं ना कुठंतरी होतच असतो.

“मावशी, रम्या कुटं गेलाय ?”

“गेला असल किल्ल्यात!”

किंवा

“सक्काळ धरनं तुमची कुटं किल्ल्यात घातला व्हताव?”

खरं तर ह्यातल्या असंख्य लोकांनी किल्ला पाहिलेला पण नसतो, किल्ल्याची बाग, हा भाग खरा किल्ल्याच्या बाहेरचा आहे, हा किल्ला स्वाप्पी भैय्या यांनी सतराशे एकोणीस साली आपल्या प्रेयसी साठी बांधला, म्हणूनच कदाचित किल्ल्याच्या कडेने बरेच प्रियकर प्रेयसी फिरत असावेत.

काहींच्या मते हिंदू राजांच्या काळात बांधलेल्या या किल्ल्याभोवती महमूद गावान याने दुसरी तटबंदी बाहेरून बांधून किल्ला अभेद्य केला, तटबंदी आणि किल्ला या मधल्या जागेत आताची हुतात्मा बाग आहे.

इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोलापूरचा किल्ल्या अनेक राजवटीचे आश्रय स्थान होता. या ऐतिहासिक घटनांमध्ये एक गमतीशीर मजाही आहे. ती म्हणजे,

‘सोलापूरचा किल्ल्‍ला’ हा लग्नामध्ये हुंडा म्हणून दिल्याची नोंद आहे.

ही नोंद एकदा नाही तर दोन वेळा आहे.

अहमदनगर येथे बुऱ्हाण निजामशहा गादीवर होता. तर, विजापूर येथे इस्माईल आदिलशहा सत्तेवर होता. त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते.

हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक विवाह संबंध घडवून आणण्यात आला. आदिलशहाच्या कन्येला बुऱ्हाण निजामशहाला देऊन हा लग्नसमारंभ धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. हा विवाह सोलापूरच्या किल्ल्यामध्ये झाला. त्यावेळी म्हणजे इ.स. १५२३ मध्ये हा किल्‍ला विजापूरच्या ताब्यात होता.

जावयाला हुंडा म्हणून ‘सोलापूरचा किल्‍ला’ देण्याचे आदिलशहाने जाहीर केले होते.

पण विवाहानंतर आदिलशहाने हा किल्‍ला देण्याचे नाकारले. त्यातून पुढे निजामशहा आणि आदिलशहा यांच्यात युद्धही झाले. या युद्धात जावई निजामशहाचा पराभव झाला.

दुसऱ्यावेळी इ.स. १५५२ मध्ये अहमदनगरची राजकन्या चांदबिबी अली आदिलशहाला देण्यात आली. तर अली आदिलशहाची बहीण हदिया सुलताना हिचा विवाह मुतर्जा निजामशहाशी करण्यात आला.

तेव्हा मात्र कबूल केल्याप्रमाणे निजामशहाने हा किल्‍ला विजापूरच्या सुलतानाला हुंडा म्हणून दिला.

सोलापूरचा किल्‍ला बहमनी, आदिलशाही, निजामशाही नंतर मोगल सत्तेत आला. औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याचा बराच काळ या किल्ल्याच्या परिसरात गेला.

पुढे हैदराबादच्या निजामाच्या आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात हा किल्‍ला गेला.

सोलापूरचा किल्‍ला दुहेरी तटबंदीचा आहे. खंदकाच्या आत असलेल्या या दुहेरी तटबंदीमुळे सोलापूरचा किल्‍ला अभेद्य आणि बलदंड झालेला आहे. याच्या बाहेरील तटबंदीमध्ये चार कोपऱ्यांवर चार बलदंड बुरूज आहेत. या बुरुजांना एकमेकांना जोडणाऱ्या तटबंदीमध्ये आणखी २२ बुरूज बांधून बुरुजांची एकभक्कम साखळीच निर्माण करण्यात आली.

तर अशी ही किल्ल्याची कहाणी फारशी कुठं ऐकिवात नव्हती, कुणाकडून ऐकली पण नव्हती.

बँड चा सराव, साईबाबासारखी हातात चिलीम धरून ओढायची जागा, इहलोकाची यात्रा संपवून स्वर्गात जाण्याची जागा, प्रेम प्रकरणातून जन्माला आलेलं फुल विहिरीत फेकण्याची जागा, असाच वापर याचा जास्त होतो. खरं तर इतका सुंदर किल्ला आणि त्याला लागून असलेला निसर्गरम्य तलाव,

हे चित्र फक्त जंजिऱ्या नंतर याच किल्ल्यात दिसतं. पुढचं काय सांगावं, सरकारच्या हातातला किल्ला ही सोलापूरची शान आहे, आणि ती कायम टिकावी अशी अपेक्षा.

अशाच या सोलापूरची आणखी एक ओळख म्हणजे,

सिद्धरामेश्वराचं तळ्यातील देऊळ.

तळ्यातील देऊळ हे पुरातन काळाची आठवण करून देणारं आहे .आता तळ्यात पाणी नसतं ,पण जेव्हा असायचं तेव्हा हे नयनरम्य ठिकाण म्हणून ओळखलं जायचं.

याच सिद्धरामेश्वराची संक्रांतीच्या वेळेला खूप मोठी जत्रा भरते, त्याला “गड्डा” असं म्हणतात, जिथं सिद्धरामेश्वराच काठ्यांबरोबर दरवर्षी संक्रांतीच्या दिवशी लग्न लावलं जातं, त्या होम मैदान ते विजापूर वेस पर्यंत हा गड्डा, दरवर्षी जानेवारी  चौदा पासून 26 पर्यंत चालू असतो.

मोबाईल आणि इंटरनेट च्या जमान्यात, फक्त एक जुनी आठवण एवढंच ह्या गड्ड्याचं स्वरूप आता राहिलय.

तुम्ही एस टी स्टँडवर उतरलात की,

“काय बे !”

ह्या शब्दाने तुमचं स्वागत होतं,

नंतर पुढे बाळीवेसेत गेलात की,

येन बे !”

अजून पुढे विजापूर वेसेत गेलात की

“क्या बे !”

आणि पूर्व विभागात गेलात की

“येम बे!”

म्हणजे बे हे कॉमन अक्षर असतं. कानडी, तेलगू आणि बागवानी हिंदी आणि या तिन्ही भाषांचे टोन पकडून बोलली जाणारी मराठी, वाह क्या बात है !

सोलापुरी भाषा अशी कचकचीत आहे, कानडी लोक

“याssssssssको तम्यां !

अशी साद घालतात. दोन कानडी माणसं एकमेकांशी साधं जरी बोलत असतील, तरी ती भांडताहेत असं वाटतं !

तेलगू भाषा थोडी मवाळ आहे ,ठ ,थ ,झ ही व्यंजनं त्यांच्या लिपीमध्येच नाहीयेत. बाकी बागवानी म्हणजे  “ऊन बैठ्या था ,मैं व्हाशी सटक्या ” अशी ही धड ना मराठी धड ना हिंदी अशी भाषा आहे.

मराठीचं पण थोडं फार तेच झालंय “सर्वमिश्रित” मराठी !

सोलापूर हे तसं कलाकारांचं निर्मिती केंद्रच म्हणाना !

कविराय रामजोशी, शुभराय महाराज, कवी संजीव, रा.ना.पवार, अतुल कुलकर्णी, फैय्याज, अझीझ नाझा या सर्वांची जन्मभूमी. सोलापूर खरं तर पूर्वी “गिरणगाव” म्हणून ओळखलं जायचं. लक्ष्मी, विष्णू, नरसिंग गिरजी सोलापुरी चादरींचे कारखाने, हँडलूम पासून पॉवर लुम पर्यंत, महाराष्ट्रातला मोठा व्यवसाय बिडी उद्योग.

सोलापूरच्या तापमानाचा उपयोग करून ड्राय हवेचा उपयोग करून इथे बिडी आणि चादरींचे कारखाने चालवले जातात.

कपड्याच्या मिल साठी अत्यंत उपयोगी असं सोलापुरचं तापमान आहे. त्यामुळं कामगारांचं गाव ही ओळख त्यामुळे तयार झालेली. कामगारांना दहा तास काम करून स्वस्तातली करमणूक म्हणजे, “सिनेमा” !

त्यामुळं  मल्टिप्लेक्स सोलापुरात फार पुरातन काळापासूनच आहे त्याचं नावं “भागवत थिएटर ” पाच चित्रपटगृह एकत्रित हे एक सोलापूचं वैशिष्ट्य.

“भिकुसा यामासा” बिडी ही पण सोलापूरचे आणखी एक वैशिष्ट्य.

तेंदूच्या पानात चिमूटभर तंबाखू घालून लाल दोऱ्यात बांधलेली ही बिडी, कित्येक लोकांचं टेन्शन कमी करते.

सोलापूरची खाद्य संस्कृती पण खूप मोठी आहे.

शेंगा चटणी हा सोलापूरचा गाभा,

घरोघरी सण असुदे नाहीतर साधं जेवण असुदे, शेंगा चटणी पानात हवीच. लिंगायत समाजाच्या रोजच्या जेवणात शेंगा चटणी,जवस चटणी, कारळ चटणी हे अविभाज्य घटक आहेत. चटणी मुळे लसूण हा पदार्थ खूप खाल्ला जातो.

सोलापुरी पाणीपुरी हा पण एक वैशिष्ठपूर्ण पदार्थ सोलापुरात खूप फेमस आहे . सोलापुरी इडली वडा, कचोरी, भेळ, चमन भेळ, पावचटणी हे प्रकार बाकी महाराष्ट्रात पाहायला मिळत नाहीत.

सावजी मटण हा एक वेगळा प्रकार सोलापुरात खूप फेमस आहे, नागपूरचे सावजी हे कोष्टी आहेत पण सोलापूरचे सावजी हे क्षत्रिय आहेत. सावजी खानावळी सोलापुरात खूप आहेत,

चाचा कडे मिळणारं मटण आचार हे पण अतिशय चविष्ट व्यंजन फक्त सोलापुरात खायला मिळतं.

सोलापूरचा जर्मनी या देशाबरोबर खूप पुरातन काळापासून संबंध आहे, हँडलूम आणि पॉवरलूम साठी लागणारे स्पिनडल फक्त जर्मनी कडून इम्पोर्ट केले जायचे . ते संबंध आजही टिकून आहेत ते प्रिसिजन या जर्मन कोलॅबरेटेड कम्पनीमूळे.

आज प्रिसिजन ही कम्पनी पूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य आहे, कॅमशाफ्ट निर्मिती हे या कंपनीचं वैशिष्ठ आहे. यतीन शाह यांनी सोलापूरचं नाव आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत अजून टिकवून ठेवलंय. चादर,टेरी टॉवेल या वस्तूंचं एक्स्पोर्ट सुद्धा खूप मोठ्या प्रकारात आहे. सरकारी धोरणांमुळे सध्या ह्या व्यवसायाला थोडी उतरती कळा लागलीय,

पण अजूनही चादर आणि टॉवेल मुळे सोलापूर फेमस आहेच !

 • सतीश वैद्य ( लेखक स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये वरिष्ठ कर्मचारी असून काय बे हे त्यांचे गाणे प्रसिद्ध आहे) 

 

यासह सोलापूर जिल्हाची इतर वैशिष्ठे खाली देत आहोत. 

 •  सोळा गावांच शहर म्हणून सोलापूर अशी व्युत्पत्ती सोलापूरची सांगितली जाते. सोन्नलिगा या शब्दातून सोलापूर शब्द आला. पंडिल जवाहरलाल नेहरूंनी सोलापूरचा उल्लेख स्वातंत्र चळवळीतील योगदान पाहून “शोलापूर” असा केला.
 • सोलापूरात लिंगायत समाज ३४ टक्के, मराठा-OBC २४ टक्के, पद्मशाली १६ टक्के, मुस्लीम व दलित २५ टक्के असा बहुसंख्य विविधता असणारा समाज आहे.
 • दुष्काळी भाग असून इथे १७ साखर कारखाने आहेत. सांगोल्याच्या गणपतराव देशमुख यांनी इथे देशातली एकमेव महिला सुतगिरण सुरू केली.
 • संताची भूमी असणारा हा जिल्हा. साक्षात पंढरी असणाऱ्या या जिल्ह्यात नामदेव, जनाबाई, चोखामेळा, कर्ममेळा, कान्होपात्रा यांची वस्ती होते. टेंभूर्णीजवळच्या अरण गावात सावता माळी यांचा मुक्काम असे. चोखोबाची समाधी, नामदेवाची पायरी हीच पंढरी.
 • सोलापूरचे पहिले हुतात्मा शंकर शिवदारे. रामकृष्ण जाजू, तुळशीदास जाधव, माणिकचंद शहा, मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जग्गनाथ शिंदे, कुर्बान हुसेन अशा लोकांनी स्वातंत्र्याची चळवळ अधोरेखित केली. १९३१ साली मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जग्गनाथ शिंदे, कुर्बान हुसेन यांना ब्रिटीशांनी फासीची शिक्षा दिली.
 • सोलापूरचे डॉ. द्वारकानाथ कोटनीस हे चीनमध्ये देवाप्रमाणे मानले जातं. चीनमधला सर्वात आदरणीय मराठी माणूस, ज्यांच्या सन्मानार्थ चीन सरकारने पुतळा उभारलाय !   यावर क्लिक करुन आपण त्याचे कर्तृत्व जाणून घेवू शकता.
 • यतिन शहा, शरदकृष्ण ठाकरे, वालचंद संस्थेचे रणजित गांधी, रेड्डी बंधु, सुभाष देशमुख, कुमार करजगी असे अनेक उद्योगपती इथे आहेत.
 • उद्योग व्यवसाय यांच्यासोबत कलाकारांचा जिल्हा ही ओळख सोलापूरला मिळत असून नागराज मंजुळे, रिंकी राजगुरू, बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये चमकलेले अक्षय इंडिकर हे याच जिल्ह्यातले.

आपणाकडे अजून माहिती असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. 

हे ही वाच भिडू. 

 

2 Comments
 1. Ashwini says

  Very informative, was not aware of these things from solapur. These things are missing in the article.
  – Akkalkot swami Samarth temple
  – Vadwal and mohol Nagnath temple
  – Ujani Dam, Tembhurni

 2. Rakesh Sutar says

  खालील गोष्टंची देखील दखल घ्यावी
  मंगळवेढा – काळी माती ज्ज्वारी साठी प्रसिद्ध आहे…
  सांगोला – डाळिंब साठी प्रसिद्ध आहे…
  बेगमपुर – जिथे औरंगजेब क्या मुलीची समाधी आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.