अस्सल बीड ची १५ वैशिष्टे, बीडच्या लोकांना पण माहिती नसतात… 

स्थळ : अमेरिका. वेळ : वर्ल्ड ट्रेड सेंटर पडण्याची.

एक विमान वरुन आलं आणि थेट मोठ्या बिंल्डिंगच्या आरपार गेलं. अशा वेळी त्याच बिल्डिंगच्या खाली दोन तरुण उभा राहिलेले असतात. दोघही अमेरिकेतल्या मोठ्या कंपनीत अगदी मोठ्या हुद्यावर काम करत असतात. वरुन बिल्डिंग कोसळतेय. पण हे दोघं मात्र एकमेकांचे कट्टर शत्रू असल्यासारखं भांडत होते. त्याला कारण देखील तसच होतं. कारण काय तर मुंडे साहेब की धनू भावू. पंकू ताई की धनू भाव.

गोष्ट, स्थळ, माणसं काल्पनिक असली तरी बीडची माणसं राजकारणावर बोलणार नाही अस होतं नाही. अस्सल बीडचा माणूस पहिला शब्द राजकारणावरच बोलतो. बीडची वैशिष्ट आणि बीडच्या माणसांवर लिहण्याचा हा प्रयत्न. सदरचा लेख पश्चिम महाराष्ट्रात बसून लिहण्यात येत आहे. 

बीडच्या लोकांनी हा अनुशेष भरून काढावा आणि कमेंटमध्ये अजून चुकलेल्या गोष्टीत दूरूस्ती करावी. नव्याने गोष्टीं सामावून घ्याव्यात ही विनंती.

  1. सुरवात बीड या नावापासून. बीड हा शब्द भिर या शब्दापासून आला. भिर या पारसी शब्दाचा अर्थ पाण्याचा मुबलक साठा असणारी जागा. झालं का. बीडचा विरोधाभास हा नावापासूनच सुरू होतो तो असा. मोहम्मद बिन तुघलकाने विज्जलावीड हे नाव बदलून भिर नाव ठेवल्याचं सांगण्यात येते.
  2. बीड शहराची मुळ वस्ती कुठे होती तर ती बिंदूसरा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर.थिगळे गल्ली, जयशंकर मंदीर परिसर, देशमुख गल्ली, जूना बाजार, किल्ला मैदान हा हा मुळ बीडचा भाग त्यातही किल्ला मैदान येथे मातीची टेकडी होती. त्या टेकडीखाली जूने शहर गाडले गेले आहे असे संदर्भ आहेत.
  3. लोक पेठ बीडला जूनं बीड म्हणून ओळखतात पण पेठ बीड ही नवी वस्ती आहे. तुघलकाने नव्याने वसवलेली वस्ती म्हणजे पेठ बीड.
  4. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी बारमाही पाणी मिळावं ही संकल्पना पहिल्यांदा कुठे निर्माण झाली तर बीडमध्ये. सलाबत खानाने राजाभास्कर या वास्तू व भूजलशास्त्रज्ञाच्या मदतीने त्यासाठी पहिल्यांदा खजिना विहिर बांधली. आत्ता याला खजिना विहिर का म्हणतात तर सलाबातखानाचा संपुर्ण खजिना हि विहिर बांधण्यात खर्च झाला. संपुर्ण खजिना खर्च झाल्याने आत्ता आपल्याला शिक्षा होईल म्हणून विहीर बांधणाऱ्या राजाभास्कर याने इथेच आत्महत्या केली. त्याची समाधी इथेच असून शेतकरी आजही त्याची पूजा करतात.
  5. पाचवं वैशिष्ट म्हणजे बीड जिल्हा कधी झाला. बीड जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी म्हणजे जीवनजी रतनजी. मेहबुब खानाने १८६५ मध्ये बीड सुभ्यात येणाऱ्या गावांना एकत्रित करुन जिल्हा केला. १८८३ मध्ये बीड प्रांताला मान्यता मिळाली.
  6. बीड शहरात पूर आला होता. साधासुधा नाही अगदी महापूर. आणि या महापूरात दोन ऐतिहासिक गोष्टी नष्ट झाल्या. पहिले जिल्हाधिकारी नदिच्या पश्चिम किनाऱ्यावरील धोंडीपुरा वेशीला लागून ४५ फूट टॉवर व चमन उद्यान उभारलं. ही ऐतिहासिक प्रतिक १९८९ च्या महापूरात नष्ट झाली.
  7. आत्ता वर्तमान काळातलं बीड जिल्ह्याला उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातल्या एकूण साखर कारखान्यासाठी किमान १२ लाख ऊसतोड कामगारांची गरज लागते. पैकी आठ लाख मजूर एकट्या बीड जिल्ह्यातून येतात.
  8. काळा मसाला आणि कंदूरीच नाव न घेता बीड जिल्ह्याचं वैशिष्ट सांगत असेल तर तो फॉल ठरेल. कालवण म्हणजे काळ्या मसाल्यातलं मटण आणि महाराष्ट्रातली सर्वोत्तम बिर्याणी मिळणार दिल्ली दरबार आणि हॉटेल सिटी हे फेमस आहेत.
  9. खाण्याचा विषय असेल तर तुम्ही कधी एकाच वेळी गोड आणि तिखट खाणारी माणसं पाहिली आहेत का. बीडच्या आठवडी बाजारात एका हातात गोड जिलेबी आणि दूसऱ्या हातात तिखट भजी घेवून खात बसणारी माणसं तुमचं सहज लक्ष वेधून घेतील टक्कर म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ असरफ सिरनी घर या कारजा भागात मिळतो. सय्यद अशरफ अली यांनी १९५० मध्ये त्याची सुरवात केली.
  10. केज तालुक्यातील विडा या गावात भारताचा स्वातंत्रदिन धार्मिक उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात येतो. रांगोळ्या काढून गोडधोड करुन दिवाळीसारखा स्वांतंत्रदिन साजरा केला जातो.
  11. याच गावात जावयांची धिंड काढण्याची प्रथा देखील आहे. धुलिवंदनाला जावयाला जोड्यांचा हार धालून गाढवावरून धिंड काढण्यात येते.
  12. बीड जिल्ह्यातून सहा सायंदैनिकांसह २७ स्थानिक दैनिक प्रकाशित होतात. सर्वोधिक वर्तमानपत्र प्रकाशित होणारा जिल्हा म्हणून बीडच नाव घेतलं जातं.
  13. १९७७ साली महाराष्ट्र सहकारी शेतीचा पहिला प्रयोग झाला तो बीड जिल्ह्यात. याच जिल्ह्यातील मांगवडगाव या गावात महाराष्ट्रातील पहिला  सामूहिक शेतीचा प्रयोग घडवण्यात आला.
  14. शहनशहावली दर्ग्याच्या बांधकामाता मक्का येथील दगड वापरल्याची श्रद्धा आहे.
  15. शेवटचं आणि महत्वाच,

“मला साऱ्या देशाच राजकारण कळतं पण बीडचं राजकारण कळत नाही” – शरद पवार

13 Comments
  1. प्रविण says

    खंडेश्वरी ची यात्रा, आद्यकवी मुकुंदराज, ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबांची समाधी,

  2. Digambar says

    1 रामायणातील जटायू पक्ष्याने जेंव्हा सीता मातेचं रावनाद्वारे अपहरण होत असताना केलेला प्रतिकार बीड मध्ये केला आहे असा उल्लेख आहे…
    2 महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा असेल जिथे पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवले जाते आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होते.
    3 गावातल्या ग्रामपंचायतीच्या राजकारणापुसन अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत सर्व मुद्दयावर आपले मत जाहीर कुणी न मागता जाहीर करणे.
    4 बीड चे आधीचे नाव चंपावती होते…विक्रमादित्य राजाच्या बहिणीच्या नावाने ठेवले होते
    5 ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही सध्याची ओळख असली तरी आधी साधू संतांचा जिल्हा ही होती.
    6क्रांतिसिंह नाना पाटील हे बीड लोकसभेवरून निवडून आले होते…

  3. Harshal Misal says

    बीड बद्दल बोलताना परळी चा उल्लेख पण नाही.
    आर्टिकल अपडेट करावं तितकं

  4. बीडकर says

    मी बीड शहराचा नागरिक आहे, मला ही गोष्ट बोल भिडू वर आल्याचा अभिमान आहे, परंतु बातमी मध्ये जास्तीत जास्त कवरेज बीड शहरावर आहे. इतर तालुके, गावे ई. व त्यांची खासियत पण सांगावी…….धन्यवाद

  5. vaibhav says

    last is best

  6. झगडपिल्लु says

    12 व्या शतकातील थोर भारतीय गणिती भास्कराचार्य हे बीड चे च होते तसेच मराठीतील आद्यकवी मुकुंदराज यांचं वास्तव्य अंबाजोगाई जिल्हा बीड येथे होतं.. ऊसतोड कामागरांबरोबर च बीड ची ओळख जुन्या मराठी कवींचा जिल्हा अशी देखील आहे.. बाकी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांबरोबरीने बीड ची आपण दखल घेतलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार…!!

  7. वेदांत कुलकर्णी says

    प्राकृत भाषेतून आजच्या आधुनिक मराठीकडे जाण्याचा मार्ग सर्वांना बीड च्याच मराठीचे आद्यकवी मुकुंदराजांनी मोकळा केला आणि दासोपंतांनि त्यांच्या अचाट लेखनातून तो वाढवला..

    जयशंकर मंदिर अस झालाय ते चुकून तर ते * जटाशंकर मंदिर * आहे , अशी आख्यायिका आहे की रावण जटायू युद्धात रावणाने कापलेला जटायुंचा पंख इथेच पडला होता..

    परळीचे बारा जोतिर्लिंगांपैकी महत्वाचे वैद्यनाथाचे मंदिरही महत्वाचा वारसा आहे , महाराष्ट्रातील 5 जोतिर्लिंगांपैकी एक आहे , आणि असे म्हणतात वैद्यनाथाचे दर्शन महाशिवरात्रीला घेतल्यास बाराही जोतिर्लिंगांच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते

    बिंदुसरेंच्या काठी ज्ञानेश्वरांचे आजोबांची समाधी आहे

    अखंड नदीतटावर बुरुजांची एक साखळी आहे..

    निजामकालीन धरणांची बांधणी आहे

  8. Kishor says

    बीड मधील शिरुर कासार, पाटोदा, आष्टी हे तालुके अहमदनगरच्या जिल्ह्यात आतमध्ये घुसलेले आहेत. तु्म्ही नकाशा बघू शकता. या तीन जिल्ह्यात नगर आणि बीड अशी मिश्रित भाषा आणि संस्कृती आहे. बीड किंवा औरंगाबादपेक्षा हे तालुके व्यवहारासाठी अहमदनगरशी जास्त जुडलेले आहेत.

  9. दिपक देशमुख ,( आखाडे) says

    बीड कनककालेश्र्वर मंदीर कपिल धार .चार गणेश मंदीर . पुरातन
    पापनेश्वर मंदीर खंडेश्वरी मंदीर दीपमाळ सीताफळ बालाघाट डोंगर

  10. दिपक देशमुख ,( आखाडे) says

    धारूर चा कील्ला

  11. दिपक देशमुख ,( आखाडे) ज्योती केमीकल्स says

    नारायण गड

  12. दिपक देशमुख ,( आखाडे) ज्योती केमीकल्स says

    गोरक्षनाथ टेकडी गहिनीनाथ गड

  13. दिपक देशमुख ,( आखाडे) ज्योती केमीकल्स says

    खजाना बावडी ते कनक कालेश्वर भूयारि मार्ग

Leave A Reply

Your email address will not be published.