सोव्हिएत रशिया गोव्याला स्वतंत्र करून हिंदुराष्ट्र बनवणार होती ?

संपूर्ण भारतात गोवा हे राज्य आपली वेगळी आयडेंटिटी जपून आहे. आपला देश स्वतंत्र झाला तरी पुढचे दहा बारा वर्षे गोवा पारतंत्र्यातच होता. इंग्रजांच्या नाही तर पोर्तुगीजांच्या. जवळपास पाचशे वर्ष पोर्तुगीजांनी गोव्यावर राज्य केलं. आता इतक्या वर्षात पोर्तुगीज संस्कृतीची गोव्यावर छाप पडणे साहजिकच होतं.

पोर्तुगीजांनी आक्रमतेने प्रसंगी अत्याचार करून धर्मप्रसार केला. त्यामुळेच आजही तिथे ख्रिश्चन धर्मीयांचे प्रमाण देखील जास्त आहे. इंग्रजांपेक्षा कितीतर पट अधिक जुलूम पोर्तुगीजांनी केला. त्यांना गोव्यातून हाकलण्यासाठी गोवन जनतेने मोठा संघर्ष केला. रक्त सांडलं.  

अखेर भारत सैन्य १८ डिसेंबर १९६१ ला चोहो बाजूनी गोव्यात घुसले, त्यांच्या मदतीला भूमिगत क्रांतिकारकांच्या गोवा आणि उर्वरित भारतातल्या फौजा हि होत्याच. ३६ तासाच्या आत गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मॅन्युएल वसालो इ सिल्व्हा याने शरणागती पत्करली.

१९ डिसेंबर १९६१ ला गोवा, दिव दमण स्वतंत्र झाले. 

सुरवातीला गोवा दिव दमन हा केंद्र शासित प्रदेश होता. महाराष्ट्र गोमंतक पार्टीचे दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री. मधला राष्ट्रपती राजवटीचा काही काळ वगळता जवळपास दहा वर्षे त्यांनी हे पद सांभाळलं.

दयानंद बांदोडकरांचं गोव्याला महाराष्ट्रात विलीन करावं असं म्हणणं होतं. तशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली देखील होती पण या बद्दल सार्वमत घेण्यात आलं आणि गोवन जनतेने त्यांच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे गोवा केंद्र शासित प्रदेशच राहिला.

गोव्यावर पोर्तुगिजांचा प्रभाव तर होताच पण निसर्गरम्य समुद्रकिनारे पर्यटनासाठी गोवा इतर अनेक युरोपियन देशामध्ये फेमस होता. गोव्याला भारतापासून फोडण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरु होते.  या बद्दलची एक आठवण जेष्ठ पत्रकार महेश जोशी यांनी एकेठिकाणी लिहून ठेवली आहे.   

गोवा प्रदेश काँग्रेसची पुनर्घटना करण्यासाठी, सर्वसंमतीची घडण करण्यासाठी, दिल्लीहून एआयसीसीने शिवशंकर यांना ‘प्रशासक’ म्हणून नियुक्त केले होते. महेश जोशी यांना त्यांचा अधिकृत सहाय्यक म्हणून पाठवण्यात आलं. गोव्यात जवळजवळ सहा महिने ते वावरत होते.

त्यांची मदत करताना साळगावकर, बांदोडकर, ढेपे आदी उद्योगपतींचे सहकार्यही मिळवावे लागले होते. या सर्व गडबडीत एके दिवशी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर महेश जोशी यांना म्हणाले,

‘उद्या आहे मंगळवार. मंगेशीला पोहोचा. दुपारी दोननंतर जेवू आणि बोलू.’

जेवण झाल्यावर भाऊसाहेब म्हणाले,

‘जरा फिरून येऊ’

साधारण चार वाजले होते. थोडी झाडी पाहून आडोसा बरा आहे, असे बघून एका दगडावर भाऊसाहेब बसले आणि दुसऱ्या दगडाकडे बोट करून जोशींना म्हणाले, ‘बसा’

दोन दगडांमध्ये दोन फुटांचेदेखील अंतर नव्हते. जवळजवळ अर्धा तास मुख्यमंत्र्यांनी फक्त जोशींना ऐकू येईल, अशा हळू आवाजात रशियन सरकारच्या गोव्यातील कूटनीतीची माहिती त्यांना दिली. 

त्या दिवशी बांदोडकर यांनी त्यांना आठ दिवसांपूर्वी रशियन राजदूत पोपोव येथे आले होते याची माहिती दिली. या राजदूतांना मुख्यमंत्र्यानी जेवायला बोलवावे, असा सल्ला मोठय़ा हुशारीने, भारतीय परराष्ट्र खात्यामार्फतच देण्यात आला होता. 

बांदोडकर म्हणतात,

 आमचा जेवणाचा कार्यक्रम चाळीस पन्नास मिनिटे चालला. त्यात त्यांनी आश्वासन दिले. आपण होऊन की, ‘गोवा हे हिंदूराष्ट्र म्हणून जाहीर करा आणि भारतातून स्वतंत्र व्हा, आम्ही सर्व मदत तुम्हाला करू. तुम्ही पुढाकार घ्या.

रशियन सरकारचा हा प्लॅन ऐकून मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांना मोठा धक्का बसला. पक्षीय मतभेद असले तरी त्यांचा पंतप्रधान इंदिरा गांधींवर विश्वास होता आणि सर्वात महत्वाचं रशियन सरकारच्या कह्यात येऊन देशद्रोही कृत्य करणाऱ्यातले बांदोडकर नव्हते.

त्यांना काहीही करून ही गुप्त माहिती इंदिराजींच्या कानावर घालायची होती पण चुकीच्या माणसाकडून निरोप दिला तर दगा फटका होण्याचा धोका होता. महेश जोशी यांच्यावर त्यांचा विश्वास होता म्हणूनच त्यांना मंगेशीला बोलावून घेतलं आणि गुप्त संदेश दिला.

महेश जोशी तातडीने दिल्लीला गेले . त्यांनी  पंतप्रधानांची भेट घेऊन तो निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवला आणि परराष्ट्र खात्याशी देखील बोलू नका असं सांगितलं.

महेश जोशी म्हणतात इंदिरा गांधींनी हि माहिती अन्य कोणालाही सांगितली नाही आणि मी तर नाहीच नाही. 

ही घटना आहे १९७२ च्या नोव्हेंबर-डिसेंबरमधील. पुढे लवकरच भाऊसाहेब बांदोडकर यांचं निधन झालं. इंदिरा गांधींनी कोणाशीही न बोलता गोव्यातली परिस्थिती कंट्रोल करण्यास सुरवात केली. 

तो काळ अमेरिका रशियामधील शीतयुद्धाचा होता. या दोन्ही महासत्ता आपल्या ईर्ष्येपायी संपूर्ण जगाला वेठीस धरू पाहत होत्या. दोन्ही देशाचे गुप्तहेर ठिकठिकाणी असंतोष माजवण्याचा प्रयत्न करत होते असं बोललं जातं.

महेश जोशी यांनी लोकसत्ताच्या दिवाळी अंकामध्ये लिहिलेल्या लेखात ही आठवण  सांगितली आहे. ते म्हणतात,     

“इंदिराजींनी आणीबाणीचा जो कठोर निर्णय केला. त्यास जी प्रमुख कारणे होती, त्यातील एक कारण हे होते.”

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.