जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि आमच्या फेल झालेल्या गोवा प्लॅनला आज ९ वर्ष पूर्ण झाली

तिचे वडील जावेद अख्तर हे बाॅलीवूडमधले प्रतिभावंत पटकथालेखक आणि गीतकार. तिचा भाऊ फरहान हा हिंदी सिनेमातला नामवंत दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता. सिनेमाचे संस्कर तिच्यावर होतेच. आता ती सुद्धा सिनेमा बनवण्यासाठी उत्सुक होती.

बाॅलीवूडमधल्या झगमगाटाच्या आत बडी मंडळी नेमकी कशी असतात, सिनेमात छोटासा रोल मिळवण्यासाठी हौशी कलाकार किती धडपडत असतात, आणि अचानक आलेल्या यशाच्या धुंदीत नवखे कलाकार लगेच कसे वाहुन जातात, याची गोष्ट तिने ‘लक बाय चान्स’ या पहिल्याच सिनेमातुन उत्तम दाखवली.

ती दिग्दर्शक म्हणजे झोया अख्तर. पहिल्याच सिनेमातुन तिने दिग्दर्शक म्हणुन बाॅलिवूडमध्ये दणक्यात एन्ट्री घेतली.

‘लक बाय चान्स’ नंतर झोया कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणतेय याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. झोयाने नव्या सिनेमाचा विषय निवडला रोड ट्रीप. परंतु तिला काहीतरी सांगायचं होतं. तीन महिने तिने रीमा कागतीसह पटकथेवर काम केलं. पटकथेच्या अनुषंगाने हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरीना कैफ या कलाकारांची निवड झाली.

सिनेमाचं नाव ठरलं ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’. 

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ लिखाणात तर दमदार होता. आता झोयासमोर आव्हान होतं सिनेमा शुटींगचं. पटकथेनुसार स्पेन हा देश सिनेमाच्या केंद्रस्थानी. शुटींगआधी झोयाने एक ते दीड महिना स्पेनमधले शंभर वेगवेगळे लोकेशन निवडले. रोड ट्रीप सिनेमा असल्याने शुटींगचा व्याप मोठा असणार होता. ४० निरनिराळ्या पद्धतीने शुटींगचं वेळापत्रक आखण्यात आलं.

सर्व तयारी करुन कलाकार आणि सर्व सहका-यांसह झोयाने स्पेन गाठलं. शुटींगचा श्रीगणेशा झाला.

फरहान अख्तर सिनेमात इम्रान हि व्यक्तिरेखा साकारत होता. फरहान झोयाचा भाऊ. फरहान अभिनेता उत्तमच परंतु संवादलेखनात झोयाला फरहानची मदत होत होती. स्पेनला गेल्यावर स्पॅनिश लोकांचं भारतीय सिनेमांवरचं प्रेम सर्वांनाच अनुभवायला मिळालं. खुपदा तिथल्या स्थानिक लोकांची स्पॅनिश भाषा उमगायला कठीण जात होतं. थोडंफार स्पॅनिश माहित असल्याने अभय देओलने झोयाला मदत केली.

एकएक करुन सिनेमाचे सीन कॅमेरात बंदिस्त होत होते.

थोड्याच दिवसात, कतरीना कैफचा या तीन मित्रांना स्कुबा डायव्हिंग शिकवणारा सीन शुट होणार होता. स्कुबा डायव्हिंगसाठी कतरीना, हृतिक, फरहान, अभय या चौघांनाही शुटींगच्या आधी मुंबईत ट्रेनिंग देण्यात आलं होतं. स्पेनला ज्या समुद्रात हा सीन शुट होणार होता, तिथे सर्व आले.

झोयाने अंडरवाॅटर शुट करण्याचं सगळं नियोजन केलं. पण कतरीना मात्र घाबरली होती.

स्पेनचा समुद्र फार मोठा होता. अशा समुद्रात उडी मारुन सीन शुट करण्याची कतरीनाला भीती वाटत होती. झोयाने तिला धीर दिला. सिनेमात हृतिकला पाण्याची भीती असते आणि कतरीना त्याला शिकवते. विरोधाभास म्हणजे प्रत्यक्षात हृतिकने त्याच्या आयुष्यात स्कुबा डायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला, त्यामुळे तो यासाठी एकदम तयार होता.

सीन शुट करायच्या थोडं आधी कतरीना गंमतीत सर्वांना म्हणाली कि,

‘जर मी पाण्यातुन बाहेर नाही आली तर हा माझा शेवटचा सिनेमा असेल.’

झोयाने सीन शुट केला. कतरीनाही सुखरुप पाण्याबाहेर आली. थंडगार पाण्यामुळे सगळे कलाकार सुन्न झाले होते. हृतिकचं शरीर इतकं दुखत होतं की त्या दुखण्यातच तो हसत हसत पाण्याबाहेर आला.

हा सीन यथासांग शुट झाल्यावर ‘टोमॅटिना फेस्टिव्हल’ झोयाला दाखवायचा होता.

स्पेनमधील वेलेन्सिया या ठिकाणी हा फेस्टिव्हल होतो. आपण जसं रंगाची होळी खेळतो तसं इथे टोमॅटोचा वापर करुन खेळलं जातं. ज्या जागेवर प्रत्यक्षात हा खेळ घडतो तिथे तोच माहोल निर्माण करण्यासाठी सर्व टीम तयारीला लागली.

अनेक ट्रक भरुन टोमॅटो आणले गेले. ते टोमॅटो तिथल्या रस्त्यावर टाकण्यात आले. शुटींगला सुरुवात झाली. टोमॅटोमुळे कॅमेरा सारखी उपकरणं खराब होऊ नयेत म्हणुन प्लास्टिकने सर्व साधनं झाकण्यात आली होती. कलाकारांची टोमॅटो खेळात मस्त धमाल चालली होती. स्पॅनिश नागरीक सुद्धा कलाकारांसोबत मजा करत होते.

यानंतर झोयासमोर आव्हान होतं स्काय डायव्हिंग शुट करण्याचं.

तिला स्वतःलाच जास्त उंचीची भीती होती. स्काय डायव्हिंगसाठी एक आठवडा कलाकारांना ट्रेनिंग देण्यात आलं. पहिल्यांदा पाच हजार फुटांवरुन स्काय डायव्हिंगचा सराव करण्यात आला. इथेही आधीसारखाच विरोधाभास होता. सिनेमात फरहान अख्तरला भीती वाटत असते. परंतु प्रत्यक्षात फरहानने २००७ साली याचा कोर्स केला असल्याने तो प्रशिक्षणादरम्यान एकदम बिनधास्त होता. खरी अडचण होती ती हृतिक आणि अभयची.

स्काय डायव्हिंगचा सीन शुट करण्याची तयारी झाली. तब्बल १५००० फुटांवरुन हे तिघेही आकाशातुन खाली येणार होते. याचा अनुभव हृतिकने सांगीतलाय,’खाली जमीन आणि वर आकाश होतं. ती भीती फक्त त्या विमानातुन उडी मारण्याच्या क्षणाला होती. एकदा उडी मारल्यानंतर स्वतःला झोकुन द्यायचं होतं. याआधी इतकी वेगळी शांतता कधी अनुभवली नव्हती.’

हळुहळु सिनेमाचं शुटींग अंतिम टप्प्यात आलं. शुटींगचं साल होतं २०१०.

शुटींगदरम्यान फुटबाॅलचा फिफा वर्ल्डकप सुरु होता. भारतीय जसे क्रिकेटसाठी वेडे असतात, तसं स्पॅनिशमध्ये फुटबाॅलची संस्कृती असते. झोयासोबत ७०% सहकारी हे स्पॅनिश होते. त्यामुळे जेव्हा स्पेनची मॅच असायची तेव्हा शुटींग लवकर संपवुन सर्व जिथे जमेल तिथे मॅच बघायचे.

जेव्हा स्पेनने त्याचवेळी फिफाच्या अंतिम सामन्यात विजेतेपदावर नाव कोरलं, तेव्हा तर सर्वच स्पॅनिश आनंदाने रडत होते. जल्लोष करत होते. त्यांच्या या आनंदात झोया आणि सर्व कलाकार मनसोक्त सहभागी झाले.

त्याक्षणी भारतीय आणि स्पॅनिश संस्कृतीचं एक अनोखं मिलन झालं होतं.

अशाप्रकारे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चं शुटींग झालं.

२०११ मध्ये १५ जुलैला सिनेमा रिलीज झाला. आयुष्याचा प्रत्येक क्षण किती महत्वाचा आहे, याची जाणीव सिनेमाने करुन दिली. जावेद अख्तर यांनी लिहिलेली गाणी, या गाण्यांना शंकर-एहसान-लाॅय यांनी दिलेलं संगीत दोन्ही लोकप्रिय झालं. त्यावर्षीच्या अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये या सिनेमाला पुरस्कार मिळाले.

‘फिल्मफेयर’ पुरस्कारांमध्ये त्यावेळी ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ साठी हृतिक रोशनला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर कतरीनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे नामांकन मिळालं. फरहान आणि अभयला सहाय्यक अभिनेत्यांच्या वर्गवारीत नामांकन मिळालं. या नामांकनांमुळे ‘परीक्षकांनी या सिनेमाला तीन मित्रांची गोष्ट पाहण्याऐवजी एक प्रेमकथा म्हणुन पाहिलं’, म्हणुन अभय देओल नाराज झाला.

त्याने फिल्मफेयर पुरस्कारावर बहिष्कार टाकला.

आज या सिनेमाला ९ वर्ष पुर्ण झाली आहेत. आयुष्य जगण्याचं आनंदी तत्वज्ञान या सिनेमाने शिकवलं. पण त्याहून अधिक म्हणजे युरोप राहिलं पण मित्रांसोबत गोव्याला तरी जाता यावं हे स्वप्न सिनेमानं दाखवलं. पिक्चरसारखं सगळ्याच गोष्टी घडत नसतात. आमची गोवा ट्रिप कॅन्सल झाली, पण जेव्हा कधी जिंदगी ना मिलेगी दोबारा लागतो तेव्हा आम्ही सगळेच दोस्त मनातल्या मनात गोव्याला जातो.

  • भिडू देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Shivsharan Giram says

    पेज मालकाचे नाव कळेल का…?

Leave A Reply

Your email address will not be published.