पांचजन्य मधून नारा दिला : तुमचा शाहरुख तर आमचा ह्रितिक…

दोन हजार साल उजाडलं तेच 2K चं टेन्शन घेऊन. “देखो २००० जमाना आ गया” गाण म्हणत आमीर खानचा ‘मेला ‘ जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात रिलीज झाला. स्वतःच्या धाकट्या भावाला लॉंच करण्यासाठी आमीरने काढलेला पिक्चर म्हणून त्याच्याकडे सगळ्यांचे डोळे होते. पिक्चर सुपरफ्लॉप झाला. फैझल खानची नौका लॉंच झाल्या झाल्याच बुडाली. या पिक्चरच्या अपयशामूळं वैतागून ट्विंकल खन्नानं फिल्मइंडस्ट्री सोडली आणि अक्षय कुमार बरोबर संसार थाटला.

दुसरा खान शाहरुख त्याचा होम प्रोडक्शनचा पिक्चर फिर भी दिल है हिंदुस्तानी दोन आठवडे गॅप टाकून रिलीज होणार होता. स्वतःच्या ड्रीम्स अनलिमिटेड या कंपनीचा हा पहिलाच पिक्चर म्हणून शाहरुखच्या त्याच्या कडून खूप अपेक्षा होत्या. पिक्चर गाजण्यासाठी लागणारे सगळे मसाले त्यात होते.

पण त्याच्या आधीच्या आठवड्यात एक पिक्चर रिलीज झाला.

संक्रांतीचा दिवस होता. कहो ना प्यार है नावाचा तो पिक्चर. ओळखीचा हिरो हिरोईन नाही म्हणून लोक थिएटर मध्ये जाऊन बघायला घाबरत होते. पण गाणी सुरवातीपासून हिट होती. काही दिवसातच माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर पिक्चर चालू लागला. नुसता चालला नाही तर त्याच्या वादळात सुपरस्टार शाहरुख खानचा फिर भी दिल ही हिंदुस्तानी वाहून गेला.

लोक बोलले शाहरुख संपला.

फिल्म इंडस्ट्रीला नवा अमिताभ बच्चन मिळाला. ह्रितिकची सहा फुट उंची, ग्रीक मॉडेल सारखी परफेक्ट शरीरयष्टी, मॉडर्न डान्स वगैरे मुळे तर पब्लिक वेडी व्हायची बाकी होती. शाहरुख आमीर सलमान हा भूतकाळ झाला. नव्या शतकातला नवा सुपरस्टार म्हणजे ह्रितिक असं मिडियामधल्या क्रिटीक्सनी जाहीर सुद्धा केलं. वरवर पाहता ते खर ही वाटू शकेल अशी परिस्थितीच आली होती.

नंबर वन ला असणारा कायम त्याच्या जागेसाठी इनसिक्यूअर असतो. शाहरुख सुद्धा तसाच होता. एक पिक्चर पडल्यावर आपण सुपरस्टार वरून झिरो होतो हे गणितच त्याला कळत नव्हत. खवळलेल्या शाहरुखने पेप्सीच्या जाहिरातीतून ड्यूप्लीकेट ह्रितिकला घेऊन त्याच्यावर शेरा मारला. पेप्सी आणि कोकाकोला मध्ये जाहिरातवाद सुरु झाला. दोन्ही मल्टीनॅशनल ब्रँड मध्ये वर्षानुवर्षे भांडण होतीच. शाहरुख ह्रितिक मूळ भारतात कोर्टापर्यंत हा वाद जाऊन पोहचला. आता या सगळ्या कट्टा गॉसिपच्या चर्चा. या वादात कोण उडी घेतली माहिती आहे ?

तर खुद्द पांचजन्य या RSS च्या मुखपत्रानं.

आता तुम्ही म्हणालं यात आर.एस.एस. कुठून आली ? अहो हा प्रश्न त्याकाळात सुद्धा सगळ्यांना पडला होता. झालं अस की संघाच अधिकृतरीत्या प्रकाशित होणारं एक साप्ताहिक आहे त्याच नाव पांचजन्य. या पांचजन्य ने त्या आठवड्याची कव्हर स्टोरीच मुळी या वादावर केली होती. चला इथंपर्यंत पण ठीक होत.

पण कहर तेव्हा झाला ज्यावेळी या वादाला धार्मिक रंग देण्यात आला. शाहरुख खान मुस्लीम धर्माचा स्टार आहे. त्याच्या आणि इतर खान मंडळीच्या पिक्चरच्या यशामागे दुबईचा हात आहे. हिंदू कलाकारांचे चित्रपट मुद्दामहून पाडून मुस्लीम कलाकारांचे चित्रपट हिट करायची ही आंतरराष्ट्रीय चाल आहे असं त्यांचा एकंदरीत रोख होता. मुस्लीम कलाकार देशावरच्या राष्ट्रीय आपत्तीवेळी कुठे असतात हा सवाल सुद्धा त्यांनी उभा केला. पुढे शिवसेने सारख्या पक्षांनी देखील या वादात उडी घेतली.

हिंदूंचा हिरो ह्रतिक आणि शाहरुख मुसलमानांचा अशी फाळणी झाली.

हिरोंच्या बरोबर पेप्सी कोकाकोला यांची सुद्धा धार्मिक वाटणी करण्यात आली. पांचजन्यचे संपादक तरून विजय यांना यात काहीच वावगे वाटले नाही. अखेर काही दिवसांनी हे कोक आणि पेप्सीच्या ग्लास मधले वादळ पब्लिकने इंटरेस्ट न दाखवल्यामुळे विरून गेले.

पुढे शाहरुख आणि ह्रितिक यांची दोस्ती झाली. शाहरुख ने परत काही हिट दिले. परत मिडिया तोच सुपरस्टार कसा हे पटवून देण्यात बिझी झाली. ह्रितिक ने सुद्धा काही सुपरहिट पिक्चर दिले पण हळूहळू त्याच्या वरच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली तो दबून गेला. हिंदू डॉन सारखा हिंदू हिरो हे स्वप्न त्याच्याकडून पहायचं बंद केलं. धार्मिक अस्मिता खेळवण्यासाठी नवीन गोष्टी मिळाल्या होत्या.

आज हे सगळघडलेल्या गोष्टीला अठरा एकोणीस वर्ष होत आली. आजही शाहरुख संपला अशी आवई उठत राहते. परत शाहरुख चा दिवाळीमध्ये पिक्चर येतो. त्याचे  चाहते त्याचा तो डोळ्यांतून प्रेम उतू जाणारा अभिनय पाहायला न चुकता जातात. शाहरुख न आवडणारे त्याचा ट्रेलर बघून शिव्या देत राहतात. धार्मिक कोला पिणारे लोक त्याचा पिक्चर बायकोला तो आवडतो या नावाखाली चोरून बघतात. एकंदर काय तर त्याचा पिक्चर परत चालतो. परत मग नवीन वाद . देशभक्ती, पाकिस्तान, स्वातंत्र्यसैनिक, बाप या सगळ्याची उजळणी होते. हे चक्र चालूच राहत. आपल्याला तरी कुठे नवा उद्योग आहे ?

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.