26 वर्षांचा IPS, जिन्दादिल शायर भाऊसाहेब पाटणकर आणि इंदिरा गांधींची आणिबाणी..

ही गोष्ट आहे इंदिरा गांधींच्या आणिबाणीच्या काळातली.

गोष्ट वाचताना तुम्हाला यातून खूप काही मोठ्ठ्या गोष्टी कळतील, काही खुलासे होती. एखाद्यावर केलेली टिका वाचायला मिळेल तर तस काहीच या गोष्टीत नाही.. 

म्हटलं तर ही अत्यंत साधी गोष्ट आहे..म्हटलं तर ही लयभारी गोष्ट आहे..यात नेमकं काय आहे ती ही गोष्ट वाचल्यानंतरच तुम्हाला समजेल. 

तर तो काळ होता इंदिरा गांधींच्या आणिबाणीचा.

तेव्हा IPS एस एस विर्क हे अवघ्या २६ वर्षाचे होते. हेच विर्क पुढे जावून पंजाब आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक झाले. विर्क यांच्या सुरवातीच्या काळातला हा किस्सा. एसएस विर्क यांची आणिबाणीच्या सुरवातीला यवतमाळचे SP म्हणून नियुक्ती झाली. 

नुकतीच आणिबाणी लागू करण्यात आली होती व त्यादृष्टीने प्रशासनाला कडक प्रतिबंध लावण्यास सांगण्यात आले होते. वर्तमानपत्राची छोट्यातली छोटी बातमी देखील तपासूनच छापली जात होती. देशभरातल्या विचारवंतांना, चळवळीतल्या लोकांना स्थानबद्ध करण्यात येत होत. तशा सुचना प्रशासनाला होत्या. याची यादी वरूनच येत असे. या यादीतील लोकांना अंतर्गत सुरक्षा कायद्यानुसार स्थानबद्ध करुन कारागृहात पाठवण्यात येत होतं. 

विर्क नुकतेच यवतमाळ जिल्ह्याच्या SP ऑफिसमध्ये रुजू झाले होते.आलेल्या यादीनुसार स्थानबद्धतेचे आदेश काढण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याकडे होती. असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून आल्यानंतर पोलीस प्रमुख म्हणून विर्क यांनी या लोकांना ताब्यात घेणं आणि कारागृहात पाठवण्याची जबाबदारी होती. 

एक दिवस पोलिसप्रमुख विर्क याच कामांचा आढावा घेण्यासाठी यवतमाळच्या पोलीस ठाण्यात पोहचले. यवतमाळचं हे पोलीस ठाणे जुनाट पद्धतीचे होतं. एका बाजूला ठाणे अंमलदारांची खोली आणि दूसऱ्या बाजूला एक खोली अशी त्याची रचना होती. पोलीसप्रमुख विर्क हळुच एका खोलीत जावून कामाचा आढावा घेत होते. तेव्हा बाजूच्याच ठाणे अंमलदारांच्या खोलीतून त्यांना आवाज ऐकू येवू लागला. विर्क त्या आवाजाकडे ध्यान देवून ऐकू लागले. 

पलीकडून एका वृद्ध गृहस्थाचा आणि ठाणे अंमलदाराचा संवाद ऐकू येवू लागला..

ते वृद्ध गृहस्थ ठाणे अंमलदारांना विचारतं होते की मला इथं का आणलय…? त्यावर ठाणे अंमलदारांचा ठरलेलं उत्तर, बाबा थांबा जरा वेळ. मलाही काही माहित नाही… आमचे साहेब आले की तुम्हाला सांगतील.. 

यावर ते वृद्ध गृहस्थांनी विचारलं तुमचे साहेब थेट नियुक्त झालेले आहेत की बढती घेवून आलेले आहेत.

अंमलदार म्हणाले, विर्क म्हणून आहेत नवीनच आलेत थेट आलेत. पण तुम्हाला काय करायचं आहे? 

यावर त्या गृहस्थांच म्हणणं होतं, थेट आले असतील तर मला त्यांच्याशी बोलता येईल पण बढती घेवून आले असतील तर मी काहीही बोललो तरी ते शासनाच्या आदेशाचीच अंमलबजावणी करणार, बोलूनही काही उपयोग होणार नाही. 

विर्क हा संवाद ऐकून थेट पलीकडच्या खोलीत गेले. तिथे पासष्ठीच्या घरातले वृद्ध गृहस्थ बसले होते. दृष्टी थोडी अधू झाली होती. विर्क त्यांच्यासमोर गेले आणि म्हणाले, मीच इथला डीएसपी.. बोला काय बोलायचं आहे ते.. 

खूर्चीतली व्यक्ती उठून उभा राहिली. त्यांनी ओळख करून दिली, मी भाऊसाहेब पाटणकर.. जवळच राहतो. व्यवसायाने वकील आहे. मला काहीही न सांगता उचलून आणलं आहे… 

पाटणकरांकडे पाहून विर्क यांनी त्यांना आपल्या खोलीत बोलवलं तिथे त्यांना बसवून चहा पाणी देवू केलं. दोघांमधला संवाद सुरू झाला. 

पाटणकरांचा म्हणणं होतं माझं वय झालय. दोन दिवसात डोळ्यातल्या मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे. माझं वय आणि माझी स्थिती पाहता मी आत असलो काय आणि बाहेर असलो काय माझ्यासाठी सारखच आहे. आपला समज झालाय की मी उजव्या विचारांचा आहे, प्रतिगामी हिंदू पुढारी आहे पण अस काहीही नाही. तुम्ही ज्या लोकांना स्थानबद्ध करत आहात त्यांच्याशी माझे काही तात्विक मतभेद जरूर आहेत. 

विर्क ही आठवण सांगताना लिहतात,

त्यांच्या सच्चेपणाबाबत माझ्या मनात कोणतिही शंका नव्हती. त्यांच वय देखील झालं होतं अशा वेळी त्यांना स्थानबद्ध करणं चुकीच होतं. पण त्यांच्याबद्दल काही जूनं रेकॉर्ड आहे का ते पाहणं गरजेचं होतं. तशा सुचना मी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तासाभरात माझ्या टेबलवर फायली आल्या. त्यात वावगं अस काहीही नव्हत. पाटणकरांच रेकॉर्ड देखील क्लिन होतं. तरिही त्यांच नाव स्थानबद्ध करण्यात येणाऱ्या नेत्यांच्या यादीत होतं याचच आश्चर्य वाटतं होतं. 

विर्क यांनी डॉक्टरांना सुचना केल्या. भाऊसाहेब पाटणकरांचा मेडिकल करुन त्याचे रिपोर्ट मला द्या. ते रिपोर्ट घेवून ते थेट एसडी मस्के या जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. मस्के आणि विर्क यांचे चांगले संबंध होते. पण अशा वेळी एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध करण्याचे आदेश असताना पत्रव्यवहार करण्यावर ते सहमत नव्हते. 

आणिबाणीच्या काळात सरकारशी पत्रव्यवहार करून आदेश न मानने म्हणजे बंड करण्याचा प्रकार समजण्यात आला असता. तस म्हस्के यांनी बोलून देखील दाखवलं. पण विर्क यांच म्हणणं याच्या उलट होतं. अशा व्यक्तीला स्थानबद्ध केलं तर वातावरणं अजून तणावाचं होईल. एका अर्थाने आपण सरकारला मदतच करत आहोत. त्यासाठी हा पत्रव्यवहार करावा अस विर्क यांच म्हणणं होतं.. 

नाही हो यामध्ये म्हस्के तयार झाले. भाऊसाहेबांची तब्येत, त्यांचे जूने रेकॉर्ड याबाबतचा अहवाल अगदी बिनचुक असायला हवा अस म्हस्केंनी सांगितलं. विर्क यांनी तसा अहवाल तयार देखील केला. तसा अहवाल तयार करून एका व्यक्तीमार्फत तो थेट मुंबईला पाठवण्याची व्यवस्था करूनच विर्क पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आले. 

इकडे पाटणकर त्यांचीच वाट पहात होते. विर्क यांनी जे काय घडलं ते पाटणकरांच्या कानावर घातलं आणि आत्ता आपण फक्त शासनाच्या आदेशाची वाट पाहू शकतो हे देखील सांगितलं पण तोपर्यन्त तुम्हाला इथेच थांबाव लागेल हे देखील कळवलं.. 

पाटणकरांचा मुक्काम पोलीस स्टेशनवरच ठरला. तिकडे विर्क यांच्या सुचनेनुसार रात्रीच्याच रेल्वेने संबंधित अधिकारी तो अहवाल घेवून मुंबईत पोहचला. तातडीचे काम म्हणून थेट संबंधित अधिकाऱ्याकडे अहवाल देण्यात आला. 

दोन दिवस गेले अन् तिसऱ्या दिवशी सकाळी वायरलेस वरून विर्क यांना मॅसेज आला. पाटणकरांची फाईल पाहता त्यांच्या स्थानबद्धतेचा आदेश रद्द करण्यात आला होता. विर्क यांनी थेट म्हस्केचं ऑफिस गाठलं. म्हस्के म्हणाले, 

स्थानबद्धतेचा आदेश असताना असा अहवाल पाठवून एखाद्याची स्थानबद्धता रद्द झाल्याचं हे एकमेव उदाहरणं असेल.. 

भाऊसाहेबांनी ही बातमी ऐकली तेव्हा ते म्हणाले, माझी तर कोणाशी ओळख देखील नाही. हे सगळं कस झालं? विर्क साहेब तुम्ही तर चमत्कारच करुन दाखवला.. 

लेखी आदेश आल्यानंतर भाऊसाहेबांना पोलीसांच्या जीपमधून त्यांच्या घरी पाठवण्यात आलं. त्यानंतर भाऊसाहेबांसोबत विर्क यांच्या अनेक मैफिली रंगत गेल्या.

भाऊसाहेब पाटणकर यांच्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करुन वाचू शकता. 

ही आठवण एसएस विर्क यांनी एका वर्तमानपत्रात लिहली होती…

जाता जाता भाऊसाहेब पाटणकर यांचीच एक शायरी… 

आपुल्याच दाती ओठ आपुला चावणे नाही बरे,

हक्क आमुचा आमच्या समोरी मारणे नाही बरे….

मृत्यूची माझ्या वंदता सर्वत्र जेव्हा पसरली,

घबराट इतुकी नर्कलोकी केव्हाच नव्हती पसरली

कफन माझे दूर करुनि पाहिले मी बाजूला

एकही आसू डोळ्यात कुणाच्याही ना मी पाहिला

बघुनी हे माझेच आसू धावले गालावरी

जन्मभर हासूनही मी रडलो असा मेल्यावरी……

भिन्न मद्यांच्या चवी आम्हा क्रमाने चाखतो

पेल्यातली घेवुन आधी ओठातली मग चाखतो

वेगळी कॉकटेल, ऐसी एकत्र ना मिसळायची

सांगतो याची मजा चौघात नाही यायची……

आहो असे बेधुंद आमची धुंदही साधी नव्हे

मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नव्हे… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.