लोकं म्हणायची पोरगं उकीरड्यात वाया गेलय त्याचं पोराने २५ व्या वर्षी कृषीभूषण घेतला

सबसे बडां रोग क्या कहैंगे लोग.. 

ऐकायला भारी वाटते ही लाईन. अनेकदा नव्या दमाची पोरं ही लाईन व्हॉट्सएप स्टेटस् ला टाकत असतात. लोकं काय म्हणतील आणि चार-चौघ काय म्हणतील या विचारात कित्येक लोकं घरबसल्या संपली असतील. असच शेताच असतं. शेतात तूम्ही एखादं नवं पीक लावायला गेला तर शेजारचा म्हणतो हे काय येड्यागत करतो. तूम्ही रासायनिक खतं कमी टाकायचा विचार जरी केला तरी शेजारचा बांधवाला म्हणतो खुळ्यागत काय करतो? एवढं तर टाकलच पायजे. 

या लोकांच्या म्हणण्यामुळं माणसच नाही तर मातीपण मेली. अशा वेळी शिवराम घोडके भेटतो आणि तो सांगतो,

माती जगली तर माणसं जगतील, माती जगवूया !!!!

शिवराम घोडके बीड जिल्ह्यातल्या लोळदगावचा. एक काळ होता जेव्हा शिवरामचं उदाहरण पंचक्रोशीत फेमस झालेलं. फेमस कशासाठी तर फेल जाण्यासाठी. आईबाप आपल्या पोरांना शिवरामचं उदाहरण द्यायचीत. हे बघ त्याच्यासारखं केलस तर उकीरड्यात जाशील.

बापाची आणि चुलत्याची अशी एकत्रित मिळून ४० एकर शेती तरिही शिवरामचं उदाहरण लोकं फेल म्हणून द्यायची. 

त्याचं कारण होतं शिवराम नेहमीच उकिरड्यात असायचा. कंपोस्ट खत कस करता येईल. सेंद्रिय खत काय भानगड असते. इतकी महान रासायनिक खतं टाकायची गरज आहे का असले प्रश्न त्याच्या डोक्यात असायचे. शिक्षणात तसा सोसो असणारा. पण डोक्यात एक फिक्स होतं आपल्याला जे आवडतं ते करायचं. हेच ठरवून पोराने परभणीच्या कृषी विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं. 

शिक्षणाच्या दरम्यान तो स्वत:च्या शेतीत प्रयोग करु लागला.

कचराकुंडी अर्थात उकीरड्याचा डॉक्टर म्हणून लोकं त्याला ओळखू लागली होती. या वयात सर्वसाधारणं माणसाच्या वयात वेगवेगळे विचार असतात आणि या पोराच्या डोक्यात दिवसरात्र उकीरड्याचा विषय असायचा. सेंद्रिय शेतीचं महत्व गावभर सांगण आणि प्रात्यक्षिक करणं हेच त्याचं जगणं झालं. 

त्यावेळी पी.जी. कुलकर्णी व आर.आर. चांडक असे अधिकारी होते.बायो डायनॅमिकवर हा पोरगा चांगला काम करतोय हे त्यांना समजलं. ज्या उकीरड्याकडे फक्त एक खड्डा काढायचा ते वर्षभर भरायचं आणि उन्हाळ्यात शेतात नेऊन टाकायचं म्हणून शेतकरी बघायचा त्याचं उकीरड्याकडं एका वेगळ्या नजरेतून बघायचं तंत्र शिवराम लोकांना शिकवत होता.

त्यामुळेच चांगली लोकं त्याला सिरीयस घेवू लागली.

शिवराम लोकांना सोप्पेसोप्पे मुद्दे प्रात्यक्षिक सांगून पटवून देवू लागला. जमीनीत खड्डा खोदून शेण टाकत गेला तर ते सडतं, सडणं आणि कुजणं यात फरक असतो तो फरक पटवून देवू लागला. उकिरडा जमीनीच्या वरती असतावा. खत तयार करण्यासाठी काही नियम पाळावेत हे तो पटवून देवू लागला.

एका उकीरड्यातून एक लाख किंमतीचं खत त्याने तयार करून दाखवलं आणि हळुहळु का होईना शिवरामचं बोलणं लोकांना पटू लागलं. 

याच दरम्यान बीड कारागृहात त्याला सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी बोलवण्यात आलं. तत्कालीन जेलर इंदोरीकर यांनी त्याच्या खांद्यावर हात टाकला. कैद्यांना सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत तो शिकवू लागला. बघता बघता प्रयोग यशस्वी झाला आणि जेलमधले कैदी शेतकरी खात नाही अशा उच्च दर्जाचं अन्न शिजवून खावू लागला.

बीडच्या कारागृहातील प्रयोगाची माहिती तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना समजली. ते स्वत: बीडच्या कारागृहात भेट देण्यासाठी आले. पोराचं कौतुक केलं आणि पोरगं सुसाट सुटलं. आपल्याकडे एक चुकीचं गृहितकं आहे जोपर्यन्त एखादा राजकारणी हा व्यक्ती बरोबर आहे हे लोकांना सांगत नाही तोपर्यन्त लोकांना ते पटत नाही. 

त्यानंतरच्या काळात तत्कालीन कृषीमंत्री बाळासाहेब थोरात देखील शिवरामच्या शेतावर आले. सेंद्रिय शेतीचं महत्व आणि उकीरड्याचा डॉक्टर आत्ता फेमस झाला होता. वेगवेगळ्या भागातून शेतकरी त्याच्याकडे येत होते. तूमच्या भागातील मातीचा प्रकार व रासायनिक खतामुळे मेलेली माती जिवंत करण्याचं तो काम करु लागला. 

अस म्हणतात की, 

मंजील मिल जाऐंगी भटकते ही सही

गुमराह तो वो हें जो घरसे निकले ही नही… 

हेच वाक्य त्याचं आयुष्य बनवणारं ठरलं. रात्री अपरात्री शिवरामला फोन यायचे आणि तो दूसऱ्यांच्या शेतात जायचा. थेट उकीरड्यात जावून अभ्यास करणारा हा डॉक्टर.

त्याच्या डॉक्टरकीचा फायदा म्हणजे लाखभर रुपयांच खत शेतकरी उकीरड्यातून काढू लागला. 

एक एक करत आज शिवराम सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांसोबत जोडला गेला आहे. सुमारे ६० एक हजार हेक्टर जमीन पून्हा जिवंत करण्याची अचाट कामगिरी त्याने करून दाखवली आहे. जेव्हा उकीरड्याच्या डॉक्टरचं महत्व शासकिय पातळीवर समजलं तेव्हा त्याला कृषीभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं.

ज्या वयात मुलं कुठेतरी नोकरी शोधत फिरत असतात त्याच वयात म्हणजे २५ वर्षाच्या वयात त्याला कृषीभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. 

महाराष्ट्र शासनाने जेव्हा सेंद्रिय शेती धोरण समिती आखली तेव्हा सन्मानाने त्याला या समितीवर घेण्यात आलं. शेतीमाल भाव उपसमितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली,परभणी कृषी विद्यापीठात विस्तार शिक्षण कृषी परिषद सदस्य, दूरदर्शनचे कृषी सल्लागार असा त्यांचा प्रवास झालेला आहे. आजवर ४०-४५ पुरस्कारांनी त्याचा गौरव केला आहे.

इतकच काय तर महाराष्ट्र शासनाने पहिले सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्र सुरू केले ते त्यांच्याच शेतातून. शिवाय नाम फाऊंडेशन पासून ते सह्याद्री देवराई मार्फत त्याने अनेक सामाजिक कामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. 

कालपर्यन्त लोकांसाठी उकीरड्यात वाया गेलेला पोरगा ते कृषीभूषण असा त्याचा प्रवास नक्कीच गौरव करण्यासारखा आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.