राज्यातले बरेच आमदार बीडच्या या पठ्ठ्याकडूनच कपडे घेतात.

त्याचं नाव आल शेख. पण मंत्रालयात तो आलम ‘पुढारी’ या नावाने प्रसिद्ध आहे. वय फक्त २२ वर्ष. आई वडिल ऊसतोड मजूर. पण या पठ्ठाने संघर्ष करत व्यवसाय उभा केला.

गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर विधानसभा आणि विधानपरिषदचे एकूण ३६६ आमदार आहेत. त्यापैकी अंदाजे ६०+ महिला आणि इतर ५० एक आमदार सोडून दिले तर उर्वरीत साधारण २३० ते २५० आमदार त्याच्याकडून घेतलेले कपडे वापरतात.

आहे कनाय या पठ्ठ्यात दम, ही गोष्ट आहे आलम शेख पासून आलम ‘पुढारी’ या ब्रॅण्डची.

मराठवाड्याचं एक वैशिष्टय म्हणजे इथल्या माणसांना राजकारणाचा लय नाद. बीड तर या राजकारणाची राजधानी. शरद पवार स्वत: म्हणाले होते की, बीडचे राजकारण मला देखील समजत नाही.

अशा बीडच्या पाटोदा तालुक्यातल्या चिखली गावात राहणारा आलम शेख. वडील बशीर शेख आणि आई शहाजानबी हे ऊसतोड मजूर. ऊसतोडणीतून जी मजूरी मिळायची त्यातून घर चालायचं. दरवर्षी रोजगारासाठी पश्चिम महाराष्ट्राचा रस्ता धरलेला असायचाच. अशा परिस्थितीत आलम शेख पाटोद्याच्या महाविद्यालयातून १२ वी झाला.

पुढे काय हा प्रश्न पडला तेव्हा पुढचा मागचा विचार न करता खिशातल्या ५०० रुपयांच्या जोरावर तो २६ डिसेंबर २०१६ रोजी मुंबईत आला.

बीडच्या एखाद्या राजकीय नेत्याकडे नोकरी करू असा सरळ साधा हिशोब त्याने केलेला. पण लवकरच त्याला मुंबई कळाली. दोन दिवसाच्या खाण्यापिण्यात खिशातले पैसे संपले.

तो दिवस १ जानेवारी २०१७ चा होता.

नवीन वर्ष सुरू झालेलं. लोकं ३१ डिसेंबर असा साजरा करतात हे त्यानं पहिल्यांदा बघितलं होतं.
फुटपाथवर झोपलेला आलम जेव्हा सकाळी उठला तेव्हा सार्वजनिक शौचालयात देण्यासाठी पाच रुपये देखील त्याच्याकडे नव्हते. तेव्हा शेवटचा उपाय म्हणून गळ्यातलं सोन्याचं लाॅकेट त्यांना विकलं.

त्या लाॅकेटचे त्याला ३४०० रुपये मिळाले. मिळालेल्या पैशातून त्याने अंघोळ केली. पोटभर जेवला आणि मस्त खादीचे नवीन कपडे घालून थेट मंत्रालय परिसरात गेला. इथे कोणीतरी भेटेल हाताला काहीतरी काम मिळेल या विचारात तो फिरू लागला.

इतक्यात एकाची नजर आलमच्या कपड्यांवर गेली. पांढरे खादीचे कपडे पाहून समोरचा व्यक्ती म्हणाला,

हे कपडे कुठून घेतले. माझ्यामित्रासाठी मला असेच कपडे हवे आहेत.

साधारण माणूस असता तर तो पत्ता सांगून रिकामा आला असता. पण आलम राजकारणाचे धडे गिरवणाऱ्या बीडचा पोरगा होता. क्षणाचाही विलंब न लावता आलम म्हणाला,

हे कपडे आम्हीच विकतो. आमचा कपड्यांचा व्यवसाय आहे.

दूकानाचा पत्ता विचारल्यानंतर बिझनेस मोबाईलवरून होतो अस सांगितलं. त्या व्यक्तिने देखील विश्वास टाकून आलमला कपड्यांचे पैसे दिले. काही वेळात आलम कपडे घेवून आला. आलमला पैसे देणारी ती व्यक्ती एक आमदार होती. या व्यक्तीने लगेच आपल्या वर्तुळातील लोकांना आलमच्या कपड्यांची माहिती दिली. सार्वजनिक शौचालयासाठी पाच रुपये देखील नसणाऱ्या आलमने एका दिवसात ९ ते १० हजारांचा व्यवसाय केला.

कपड्याच्या व्यवसायात दम असल्याचं त्यानं ओळखलं. हळुहळु मंत्रालय परिसरांत त्याने जम बसवला. गावाकडून लक्ष्मण लाड या मित्राची त्याने मारुती कार मिळवली. या गाडीतच आपला माल ठेवून तो व्यवसाय करू लागला. आमदार व अधिकारी वर्गातून आलमच्या कपड्यांची माऊथ पब्लिसिटी होवू लागली.

बघता बघता या धंदा सेट झाला. तत्कालीन मंत्री विनोद तावडे आणि बाबाजानी दुराणी यांनी त्याला शासकीय गाळा भाड्याने मिळून देण्याबाबत प्रयत्न केले.

विनोद तावडे यांच्या हस्तेच त्याने आपल्या दुकानाचं उद्घाटन केलं आणि आमदारांना कपडे पुरवणारा ‘पुढारी’ ब्रॅण्ड जन्माला आला .

आज आकाशवाणी आमदार निवासाखाली पुढारी वस्त्र भांडार हे त्याचं स्वत:च कपड्यांमधले दूकान आहे.

वर्षभरात २०० ते २५० आमदार आलमकडून लिननचे कपडे खरेदी करतात. आपला हा पुढारी ब्रॅण्ड आत्ता जिल्ह्याजिल्हात घेवून जाण्यासाठी तो सज्ज आहे.

आलम शेख पासून आलम पुढारी होण्याचा हा प्रवास पहाता नक्कीच तो येत्या काळात बिझनेसमधला “पुढारी” होईल हे नक्की.

आलम शेख यांचा संपर्क क्रमांक : 8888448867

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.