बाकी सगळं सोडा, महाराष्ट्राला रोजची १ कोटी अंडी कमी पडतायत…

‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’

ही जाहिरात लहानपणी बघितली होती, ऐकली होती आणि गुणगुणली सुद्धा होती. अंडी खाणं हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतं. शरिरातलं गूड कोलेस्ट्रॉल वाढतं, शरिराला आवश्यक असणारी प्रोटीन्सही मिळतात. याशिवाय, दृष्टी अधिक चांगली करण्यासाठी ही अंडी फायदेशीर ठरतात, असं अभ्यासकांचं मत आहे.

आज ही संडे हो या मंडे वाली जाहिरात आठवली त्याचं कारण म्हणजे एक बातमी. महाराष्ट्राला रोज १ कोटी अंडी कमी पडतायत अशी ही बातमी.

महाराष्ट्रात दिवसागणिक इतकी अंडी खाल्ली जात असतील हेच ही बातमी वाचल्यावर लक्षात आलं. एका सर्व्हेनुसार महाराष्ट्रात दररोज जवळपास सव्वा दोन कोटी अंडी खाल्ली जातात. महाराष्ट्रातलं अंड्यांचं उत्पादन मात्र दररोजचं फक्त एक कोटी ते सव्वा कोटी एक कोटी इतकंच आहे. त्यामुळे महाराष्ट्राला अंड्यांच्या बाबतीत इतर राज्यांवर अवलंबून राहावं लागतंय.

सध्या कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमधून अंडी आणली जातायत. तेव्हा कुठं महाराष्ट्राची अंड्यांची गरज भागतेय.

पण हा झाला तात्पुरता उपाय. महाराष्ट्रातलं अंड्यांचं उत्पादन वाढलं तरच ही समस्या कायमस्वरुपी सुटू शकेल. आता त्यासाठीही सरकारने काही उपाय योजना आखल्या आहेत.

पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले,

“उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीकोनातून पशुसंवर्धन विभाग २१,००० रुपयांच्या अनुदानित दराने ५० पांढऱ्या लेघॉर्न कोंबड्या आणि प्रत्येक जिल्ह्याला १,००० पिंजरे देण्याची योजना आखत आहे,”

यात पण विषय असा आहे की, महाराष्ट्राची एकूण गरज ही १ कोटी अंड्यांची आहे. व्हाईट लेघॉर्न कोंबडी साधारणपणे वर्षभरात ३०० अंडी देते. अगदी रोज एक अंडं असा जरी विचार केला तरी, १ कोटी अंड्यांची कमतरता भरून काढण्यासाठी एक कोटी व्हाईट लेघॉर्न कोंबड्यांचं पालन करावं लागणार आहे.

एका कुक्कुटपालकाला ५० कोंबड्या सवलतीच्या दराने याप्रमाणे राज्यभरात दोन लाख कुक्कूटपालकांना या सवलतीच्या दरातल्या कोंबड्या द्याव्या लागतील.

आता हा आकडा गाठण्यासाठी आपल्या पशुसंवर्धन विभागाला किती दिवस लागतायत हे पाहणं गरजेचं आहे. पण, या योजनेप्रमाणे ही गरज भागवण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो असं बोललं जातंय. लवकरात लवकर १ कोटी अंड्यांचा तुटवडा भरू काढायचा असेल तर, या योजनेशिवाय आणखीही काही उपाय योजना कराव्या लागतील असा असा अंदाज वर्तवला जातोय.

परिणाम म्हणून अंड्यांची किंमत वाढली आहे. 

मागणी जास्त आणि उत्पादन कमी असल्यामुळे अंड्यांची किंमत वाढली आहे. मुंबई मधली अंड्यांची किंमत ही सध्या ९० ते १०० रुपये डझन इतकी झाली आहे. तर शेकडा अंड्यांची किंमत ही ५७५ ते ६०० रुपये इतकी आहे.

आताच हा तुटवडा का भासतोय?

मागच्या दोन आठवड्यांपासून हे दर वाढलेले दिसतायत. हे दर आताच का वाढलेत तर, थंडीमध्ये अंडी खाणं हे शरिरासाठी फायदेशीर असतं. शरिराला आवश्यक प्रोटिन्स अंड्यांमधून मिळतात. याशिवाय, शरिराचं तापमान वाढवून ठेवण्यासाठीही अंडी फायदेशीर असतात. त्यामुळे, मागच्या दोन आठवड्यांपासून अंड्यांची मागणी वाढली आहे, तुटवडा भासतोय आणि किंमत वाढली आहे.

आता ही समस्या लहान वाटत असली तरी, पशुसंवर्धन विभागाने पुढे ही समस्या आणखी मोठी होऊ शकते हे लक्षात घेऊन वेळीच उपाय- योजनांना सुरूवात केली आहे. हे उपाय येत्या काळात परिणाम दाखवतील असं बोललं जातंय, पण तसं झालं नाही तर, येत्या काही दिवसात जीमला जाणारी पोरं, डायेट फॉलो करणाऱ्या पोरी किंवा फिटनेस फ्रीक असणाऱ्या मंडळीच्या रोजच्या खाण्यातून अडं गायब होऊ शकतंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.